- डॉ. राजन भोसले

मुलांच्या हाती मोबाइल-कम्प्युटर असतात. ते काही माहिती गूगल करत असतात, यूट्यूबवर अभ्यासाचे व्हिडीओ शोधत असतात. आणि त्याच्या खालीच ‘तसल्या’ काहीतरी लिंक हलताना दिसतात. उत्सुकता कुणाला वाटत नाही? आणि या मुलांना तर ती स्वाभाविकपणे वाटतेच. मग ती ते क्लिक करतात. पाहतात. हरखून जातात. घाबरून जातात. किळस करतात. एन्जॉय करतात. मग मित्रांना सांगतात. सगळे मिळून पाहतात. चर्चा करतात. पुन्हा पाहतात. चक्र सुरू होतं.. टेक्स्ट दॅट यूआरएल!

 

‘पोर्न? म्हणजे ‘त्या तसल्या’ अश्लील क्लीप्स? आमच्या घरी असं काही नाहीच, शक्यच नाही, त्याला ‘तसलं’ काही उपलब्धच होऊ शकत नाही, हिंमत काय त्याची..’ - क्लिनिकमध्ये आलेले आईबाबा हे असं खात्रीने सांगत असतात तेव्हा कळत नाही, त्यांना कसं समजावणार? कारण जे त्यांना माहिती नाही, त्यांच्या कल्पनेतही नाही ते त्यांची मुलं रोज करत असतात, पाहत असतात. एन्जॉय करत असतात.
एक साधा एसएसएस, व्हॉट्सअ‍ॅपवरचा मेसेज, त्यात एखादी लिंक, मुलांच्या शब्दात ‘यूआरएल टेक्स्ट’ केली जाते. आणि आपल्या मित्रानं जे पाठवलंय ते काही मिण्टात मुलांनी पाहून अनेकदा डिलिट किंवा फॉरवर्डही केलेलं असतं!
हे सारं तपशीलवार सांगत अशी अनंत उदाहरणं मी देऊ शकतो, पण ती मी देत बसत नाही.
एकच सांगतो, प्रचंड प्रमाणात मुलांच्या, अगदी शाळकरी वयातल्या मुलांच्याही अवतीभोवती पोर्न अव्हेलेबल आहे. 
आज तिशीत असलेल्या तरुण पिढीला तरी वयात येताना पिवळी पुस्तकं, चावट मासिकं, सीडी, सिनेमे, ब्लू फिल्म्स हे सारं मिळवावं, चोरून पाहावं लागलेलं आहे.
आज शाळेत जाणाऱ्या मुलांनाही हे सारं ‘चोरून’ करायची गरज उरलेली नाही, ते ‘मिळवावं’ लागत नाही. ते उघड, उपलब्ध आहे! सहज मिळतं. फुकट मिळतं. फोनवरच मिळतं. त्यामुळे ‘खासगी’ही असतं.
म्हणून मी एकच गोष्ट ठळकपणे पुन्हा सांगतो, पोर्न प्रचंड उपलब्ध आहे, हे मान्य करा.
आणि दुसरी गोष्ट, जे उपलब्ध आहे, त्याचं आपण काहीच करू शकत नाही; हे मान्य करा!
मुलांवर नियंत्रण, संस्कार, कण्ट्रोल केलेले इंटरनेट अवर्स ही सारी पालकांची समजूत आहे; जे उपलब्ध आहे त्याचं आपण काहीच करू शकत नाही हे पालकांनी, शिक्षकांनी आधी मान्य करायला हवं!
होतं काय, चला पोर्न साइट्स पाहू असं ठरवून काही सारीच मुलं तसल्या साइट्स पाहायला जात नाहीत. सुरुवात कशी होते तर मुलांच्या हाती मोबाइल-कम्प्युटर असतात. ते काही माहिती गूगल करत असतात, यूट्यूबवर अभ्यासाचे व्हिडीओ शोधत असतात. आणि त्याच्या खालीच ‘तसल्या’ काहीतरी लिंक हलताना दिसतात. उत्सुकता कुणाला वाटत नाही? आणि या मुलांना तर ती स्वाभाविकपणे वाटतेच. मग ती ते क्लिक करतात. पाहतात. हरखून जातात. घाबरून जातात. किळस करतात. एन्जॉय करतात. मग मित्रांना सांगतात. सगळे मिळून पाहतात. चर्चा करतात. पुन्हा पाहतात. चक्र सुरू होतं..
आणि हे सुरू झालेलं चक्र मग उलटं फिरवणं इतकं सोपं नसतं!
धाक दाखवला, तक्रार केली, फटके दिले म्हणजे पोर्न पाहणं मुलं थांबवतात हा पालकांचा, शिक्षकांचा भ्रम आहे. कारण हे प्रश्न मुळात हाताळतात कसे हेच कुणाला कळलेलं नाही. ‘असं होऊच कसं शकतं, हे चूक आहे, अनैतिक आहे, धक्कादायक आहे’ या प्रतिक्रियांपलीकडे जाऊन आता हे प्रश्न सोडवायला हवेत, हे अजून आपल्याकडे पालकांना, शिक्षकांनाच काय एमडी झालेल्या अनेक मानसोपचारतज्ज्ञांनाही माहिती नाही.
माझ्याकडे शाळकरी मुलांना घेऊन काही पालक येतात. किंवा शाळा ‘समज’ द्यायला म्हणून बोलावून पालकांना झापतात आणि आमच्याकडे पाठवतात. ‘तुमचा मुलगा तसलं काही पाहतो आहे, त्याला शाळेतून काढून टाकू’ अशी धमकी पालकांना देतात आणि म्हणून मग पालक घाबरेघुबरे होत आमच्याकडे येतात. त्यांना मुलगा (किंवा मुलगीही) पोर्न पाहतो या धक्क्यापेक्षाही त्याला शाळेतून काढून टाकतील याची भीती जास्त वाटलेली असते. तिकडे आपल्या शाळेची बदनामी झाली तर त्यापेक्षा हे सगळं पालकांवर ढकललेलं बरं म्हणत शिक्षक-प्रिन्सिपल घाबरलेले असतात. मुलांना रागावण्यापलीकडे ते दुसरं काहीच करत नाहीत.
काही शाळेत कौन्सिलर असतात. पण त्या कौन्सिलरला हेच कळत नाही की, या मुलांचं कौन्सिलिंग कसं करायचं? त्यांना या विषयातल्या कौन्सिलिंगचं काही प्रशिक्षणच नाही. त्यातलं स्किल नाही. साधे डिप्लोमा कौन्सिलर कशाला, अनेक मानसोपचारतज्ज्ञांनासुद्धा या लैंगिक प्रश्नांसंदर्भात एवढं घोर अज्ञान असतं की, तेच अनेक बेसिक शंका विचारतात. त्यांच्याकडे आलेल्या १२-१४ वर्षाच्या पोर्न पाहणाऱ्या मुलांचं ते कसं कौन्सिलिंग करणार?
कौन्सिलिंग तर सोडाच, अतिरेकी पोर्न पाहणारी जी मुलं असतात त्यांना ट्रिटमेण्ट काय द्यायची हेच अजून डॉक्टर्स, मानसोपचारतज्ज्ञ यांना उमगलेलं नाही.
हे वास्तव एकीकडे आणि सेक्स चॅटसह पोर्न पाहायला सरावलेली शाळकरी आणि कॉलेजात जाणारी तरुण मुलं दुसरीकडे. आपण कल्पना करतो किंवा कल्पनेतही नाकारतो त्यापेक्षा या वयात पोर्न पाहण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. इतकं प्रचंड की, ते व्यसन सुटणं हे आव्हान आहे. 
त्यामुळे मुलांना काही समुपदेश करण्याआधी मी पालकांना हेच सांगतो की, तुम्ही मुलांच्या हातात मोबाइल, नेट, कम्प्युटर दिला आहे, तेव्हाच मान्य करा की त्याला ‘तसल्या’ साइट्स उपलब्ध आहेत, तो पाहू शकतो. पाहत असणार..प्रश्न मान्य केला, तर आपण उत्तरांच्या दिशेनं पुढं जाऊ शकतो.
आणि आजच्या घडीला प्रश्न अत्यंत गंभीर आहे..

गुड पोर्न, बॅड पोर्न...? हे एक नवीन समीकरण सध्या काही डॉक्टर्स, पालकांच्या डोक्यात आहे. म्हणजे काही संदर्भात मुलामुलींनी अशा पोर्न साइट पाहणं हे हेल्दी आहे, असं ते मानतात. हेच सर्वथा चूक आहे. दहशतवाद चांगला आणि वाईट असा जसा नसतो, तो दहशतवाद असतो तशी पोर्न ही अत्यंत भयाण, वाईटच गोष्ट आहे. त्यात गुड-बॅड असं काही नाही. मुलांना तस्लं काही दाखवणं आणि त्याचं समर्थन करण्यापेक्षा त्यांना शास्त्रीय लैंगिक शिक्षणाची, त्यासंदर्भात मोकळेपणानं बोलण्याची गरज आहे. पोर्नच्या भयाण जगात चांगलं म्हणत मुलांना सोडणं हेसुद्धा भयानक घातक आहे.

पोर्न पाहण्याचे दुष्परिणाम

१) पोर्न पाहण्याचे शारीरिक दुष्परिणाम लगेच असे काही दिसत नाहीत. त्यामुळे कोण पोर्न पाहतंय हे कळायला मार्ग नाही, कारण एरवीचं वर्तन अत्यंत संयत, सभ्यच असू शकतं. मुलांच्या संदर्भातही हेच घडतं.

२) फक्त एकदाच पोर्न पाहिलं असं घडत नाही. ते मादक द्रव्यासारखं आहे. एकदाच दारू प्यालो असं घडत नाही. ती वारंवार प्याली जातेच. तसं एकदा पोर्न पाहिलं की ते वारंवार पाहिलं जातंच. प्रमाणाची चर्चाही चूक. कारण ते व्यसन लागतंच. आणि ते एकदा लागलं की कमी जास्त व्यसन असं काही उरत नाही.

३) मुलं पोर्न पाहून प्रचंड एक्साईट होतात, त्यांची एक्सायटमेण्ट लेव्हल वाढवण्यासाठी ते पुन्हा पुन्हा अधिक पोर्न पाहत राहतात. त्यासाठी जास्तीत जास्त वेळ देतात.

४) काहीजण आपल्या संदर्भात तसंच घडेल अशा अपेक्षा ठेवतात. लहान वयात ते करून पाहण्याची संधी मिळाली तर ती शोधतात. तसं करून पाहतात. कधी स्वेच्छेने, कधी सक्तीने.

५) डोळ्यांना चष्मे लागणे असं सर्रास दिसलं तरी एकदा पोर्न पाहण्याची शंका तपासून पाहावी इतका आपापला स्मार्टफोन जवळ घेऊन मुलं पांघरुणात दडून पोर्न पाहतात. एकेकट्यानं पाहतात.

६) सहसा रात्री पाहतात, त्यामुळे तब्येतीवर, झोपेवर परिणाम होऊन वारंवार तब्येत बिघडलेली दिसते.

७) त्यातच मन गुंतून राहिल्यानं अभ्यास, खेळ यातली प्रगती कमी होऊन एकलकोंडे, घुमे होतात.

८) सगळ्यात महत्त्वाचं हे सारं पालकांना कळतच नाही, आणि कळलं तरी मुलं ते पाहणं सोडत नाहीत.

९) पोर्नपायी दिवसागणिक अनेक शाळकरी, कॉलेजातल्या मुलांचे काही तास खर्ची पडत आहेत.

(लेखक लैंगिक प्रश्नांचे जाणकार आणि प्रख्यात सेक्सॉलॉजिस्ट आहेत.)