तंत्रज्ञान.
झपाट्यानं आपलं आयुष्य बदलतं आहे, असं टिपीकल वाक्यं ठोकून देण्याचे दिवस किती भुर्रकन उडून गेले. याची एक झलकच २०१६नं मावळता मावळता दाखवून दिली. एका रात्रीत हातातला मोबाइल अनेकांच्या आर्थिक व्यवहाराचं एक साधन बनला. अर्थात, हा बदल काही कुणी चटकन स्वत:हून स्वीकारला नाही तो लादलाच गेला. पण त्यानिमित्तानं तंत्रज्ञानाचं एक वेगळं रूप सामान्य माणसाला पहायला मिळालं...
मात्र तरुण मुलांच्या संदर्भात तंत्रज्ञानाचे काय ट्रेण्ड या वर्षात दिसले हे एका वाक्यात सांगायचं तर काहीजण व्हिज्युअल रिअ‍ॅलिटीच्या मागे धावले, तर काही पोकेमॉनच्या. काहींनी लाइव्ह व्हिडीओ अनुभवले, तर काहींनी याच तंत्रज्ञानाच्या अतिवापरानं आपलं मनस्वास्थ्य बिघडवून घेतलं...
त्यामुळे सकारात्मक-नकारात्मक बदल काय झाले याची तुलना व्यक्तिपरत्वे वेगळी आहे, पण एक नक्की हातातला मोबाइल यंदा हाताइतकाच महत्त्वाचा अवयव बनला. आणि त्या अवयवात शिरलेल्या व्हायरसमुळे भेज्यातही बरेच किडे वळवळले!
त्याच काही किड्यांची ही साधारण अशी वळवळ...

१) स्ट्रिमिंग व्हिडीओ
खरं तर हा सोशल मीडियाचा भाग; पण तो तंत्रज्ञानामुळे साधला त्यामुळे त्याला तंत्रज्ञानाचीच कमाल म्हटली पाहिजे. आपण आपल्या फेसबुक पेजवर स्वत:च सेलिब्रिटी होऊ शकतं हे नवीन भान तरुणांना या स्ट्रिमिंग लाइव्ह व्हिडीओनं दिलं. कुणीही म्हणजे अगदी कुणीही लाइव्ह असूू शकतं, बोलू शकतो, आपण सारे ग्रुप करून गप्पा मारू शकतो ही सारी मजा या स्ट्रिमिंग व्हिडीओनं दिली. त्यामुळे या वर्षीचा सगळ्यात मोठा तंत्रज्ञानाचा ट्रेण्ड म्हणून या स्ट्रिमिंग लाइव्ह व्हिडीओंना मार्क द्यावे लागतील.
२) ए. आर., व्ही. आर. आणि पोकेमॉन
व्हिज्युअल रिअ‍ॅलिटी, जरा जड जातो हा शब्द पचायला. लांबचा वाटतो. त्यात फेसबुकच्या झकरबर्गने त्याचं लॉँच केलं इत्यादि बातम्या झळकल्या पण त्यात काही कुणाला फार हॉट वाटलं नव्हतं. व्हिज्युअल रिअ‍ॅलिटी पहिल्यांदा आयुष्यात आली ती ‘पोकेमॉन गो’चा हात धरून. तेव्हा पहिल्यांदा कळली नीट ही व्हिज्युअल रिअ‍ॅलिटीची भानगड. १० कोटी लोकांनी हा पोकेमॉन गो आॅफिशियली डाउनलोड करून घेतला. आणि अक्षरश: स्मशानात पाट्या लावायची वेळ आली की, इथं पोकेमॉन शोधू नयेत. या गेमनं तंत्रज्ञानाच्या, व्हिज्युअल रिअ‍ॅलिटीच्या एका नव्या टप्प्याला यंदा सुरुवात केली.
३) आर्टिफिशियल इण्टिलिजन्स
अर्थात, कृत्रिम बुद्धिमत्ता. या शब्दाची मोठी चर्चा झाली आणि ते वास्तव दूर नाही याची झलकही या वर्षानं दाखवून दिली. जी कामं रोबोट करू शकणार नाही तीच कामं भविष्यात माणसाला रोजगार म्हणून उरतील अशा चर्चांनी या वर्षी जोर धरला. अमेरिकेत ड्रायव्हरलेस ट्रक धावू लागल्या. येत्या काही वर्षांत माणसाइतकी बुद्धिमत्ता असलेले मशीन्स तयार करण्यात माणसाला यश येईल, अशा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी यंदा घडल्या.