हसाल-हसवाल, तर अंतराळातही जाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:00 AM2019-02-22T11:00:00+5:302019-02-22T11:00:02+5:30

कठीण परिस्थितीतही तुमचा संयम ढळत नाही? हसत-हसवत इतरांचंही मोरल तुम्ही कायम ठेऊ शकता? - तर ‘नासा’ तुमच्याच शोधात आहे..

NASA is looking for 'jokers' to become astronauts | हसाल-हसवाल, तर अंतराळातही जाल!

हसाल-हसवाल, तर अंतराळातही जाल!

Next
ठळक मुद्देअष्टपैलू ‘जोकर्स’ची टीम नासाला हवीय, कारण अडचणीच्या परिस्थितीत हेच जोकर टीमला एकत्र ठेऊ शकतात, त्यांचं मोरल टिकवून ठेऊ शकतात आणि आपल्या ध्येयाच्या मार्गात त्यांना अविचल ठेऊ शकतात.

- सोहम गायकवाड
मंगळावर जाण्याचं माणसाचं स्वप्न आता तसं फारसं धुसर राहिलेलं नाही. किंबहुना येत्या काही वर्षांत माणसानं मंगळावर नुसतं पाऊलच ठेवलेलं नसेल, तर तिथे तो वस्ती करून राहायलाही जाईल.
माणसाला मंगळावर घेऊन जाण्याच्या आणि तिथे त्याला राहायला पाठवण्यासाठीच्या योजना एव्हाना सुरुही झाल्या आहेत. (परत यायला मिळालं नाही तरी) अनेक जण तिथे जायला उत्सुक आहेत.
शास्त्रज्ञांनीही यादृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. ‘नासा’नं त्यात आघाडी घेतली आहे. साधारण २०३०मध्ये माणसाचं पाऊल मंगळावर पडेल यादृष्टीनं त्यांची तयारी सुरू आहे.
साधारण दोन वर्षांची ही मोहीम असेल.
अर्थातच त्यासाठी अत्यंत हुशार अशा तरुण अंतराळवीरांच्या शोधात ते आहेत, जे हे आव्हान पेलू शकतील. अंतराळ क्षेत्रातलं पुरेसं ज्ञान असलेले, या मोहिमेसाठी कितीही कष्ट घेण्याची तयारी असलेले, अनेक दिवस, महिने, वर्षं एकांतात राहू शकणारे आणि तरीही आपलं संतुलन कायम ठेऊ शकणारे असे अंतराळवीर त्यांना ढिगानं मिळतीलही, पण त्यांचं घोडं अडकलंय ते वेगळ्याच कारणासाठी. त्याशिवाय आपल्या मंगळ मोहिमेचं घोडं पुढे सरकणार नाही, असं नासाला वाटतंय.
आश्चर्य वाटेल, पण या मोहिमेसाठी त्यांना हवेत ‘जोकर’. त्यासाठी त्यांनी जगभरात शोधमोहीम सुरू केलीय. असे जोकर, जे या अंतराळवीरांना हसवू शकतील, त्यांचं टेन्शन कमी करू शकतील, दिवसरात्र, महिनोन्महिने एकाकी आणि एकट्यानं काम करीत असताना अंतराळवीरांचं मोरल डाऊन होणार नाही, ते तितकेच उत्साही आणि झपाटलेपणानं काम करू शकतील यासाठी त्यांना मदत करू शकणारे, असे ‘जोकर्स’ नासाला हवेत.
अर्थातच हे ‘जोकर’ तरुण हवेत. त्यांना ‘जोकर’ म्हटलं असलं आणि हसवणं, ताण कमी करणं ही त्यांची प्रमुख जबाबदारी असली, तरी त्यासाठी केवळ तीच एक अट नाही. जोडीला ते इंजिनिअर हवेत, वैज्ञानिक हवेत, अंतराळाचं त्यांचं ज्ञान उत्तम हवं.
अशा अष्टपैलू ‘जोकर्स’ची टीम नासाला हवीय, कारण अडचणीच्या परिस्थितीत हेच जोकर टीमला एकत्र ठेऊ शकतात, त्यांचं मोरल टिकवून ठेऊ शकतात आणि आपल्या ध्येयाच्या मार्गात त्यांना अविचल ठेऊ शकतात.
अर्थात हा ‘प्रयोग’ पहिल्यांदाच होतोय असं नाही. यापूर्वीही
१९११मध्ये रोआल्ड एमंडसननं दक्षिण धु्रवावर पहिली यशस्वी मोहीम केली होती. त्यावेळी त्याच्या टीममध्ये अ‍ॅडॉल्फ लिंडस्ट्रॉम नावाचा एक आचारी होता. तो खूपच गंमत्या होता आणि सगळ्यांना हसवायचा. आपल्या टीमचा आत्मविश्वास कायम ठेवण्यात त्याचा वाटा खूप मोठा होता. स्वत: एमंडसननंही त्याबद्दल त्याचे ऋण व्यक्त केले होते.
थोडक्यात, कोणतीही गोष्ट कमी नसते. निरुपयोगी नसते. जेवढ्या जास्त गोष्टी तुम्हाला येत असतील, त्यात तुमचं कौशल्य असेल, तेवढं चांगलं. @‘जॅक आॅफ आॅल अ‍ॅण्ड मास्टर आॅफ सम’ ही नव्या पिढीसाठी आता नवी म्हण आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी ‘जोकर’ म्हटलं तरी चालेल, पण अंतराळात जाण्याची क्षमता तुमच्यात, प्रत्येकात आहे, ही यातली लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट..

Web Title: NASA is looking for 'jokers' to become astronauts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.