- श्रीधर मनोहर गायकवाड, सोलापूर

मी बारावी नंतर मित्रांना फॉलो करत इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. प्रथम वर्षाला थोडंफार बर वाटलं; पण जसजसे दिवस जात होते, मला माझी चूक कळत होती. आपली आवड कशामध्ये आहे आपल्याला काय जमतं याचा आपण विचार न करता, मित्रांच्या मागे लागून, मित्रांचं ऐकून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. जे मित्र स्वत: दोन-तीन वेळा इंजिनिअरिंगच्या प्रत्येक वर्षाला नापास झाले ते म्हणायचे अरे, इंजिनिअरिंगला खूप स्कोप आहे, आर्ट्स, कॉमर्सच्या भानगडीत पडू नकोस.
कॉलेजचे दिवस सुरू होते, हळूहळू इंजिनिअरिंगचा अभ्यासक्र म डोक्यावरून जाऊ लागला, विषय मागे राहू लागले. माझी पण दोन वर्षे वाया गेली. पण, यात चूक मित्रांची नाही, तर माझी होती. मला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्याच क्षेत्रात जर मी शिक्षण घेतलं असतं तर, कदाचित मी खूप पुढे गेलो असतो.

मी इंजिनिअरिंगला तीन वर्षे दिली; पण आपली गाडी काय पुढे जाईना, म्हणून कंटाळून मी माझा कॉलेजमधील प्रवेश रद्द केला. मला दिग्दर्शन व अभिनय क्षेत्रामध्ये खूप आवड. पण त्यासाठी करायचं काय, पर्याय काय आहेत याबद्दल पुरेशी माहिती नव्हती. मी यातच करिअर करणार असं घरच्यांना ठणकावून सांगण्याची मुभाही नव्हती. कारण, सोलापूर सारख्या शहरात कलाक्षेत्राला पुरेसा वाव नाही. घरची परिस्थिती पण बेताची. मी पुणे गाठलं आणि नंतर मुंबई, खूप फिरलो. प्रत्येक फिल्मसिटी, स्टुडिओ आणि नाट्यमंदिरे. घरून आणलेले पैसे पुरणार नाहीत म्हणून दिवसभर चालत चालतच हिंडायचो; पण काही उपयोग झाला नाही. पुण्या- मुंबईसारख्या शहरांमध्ये राहायचं तर पैसा पाहिजे. शेवटी घरी आलो.

इकडे आल्यावर माझी आवड मला गप्प बसू देत नव्हती. असंच एकदा एका पेपरमध्ये वाचलं होतं की जर दिग्दर्शक व्हायचं असेल तर ‘लघुपटा’पासून सुरु वात करा. अगदी, कमी खर्चात व स्व-लिखित कथांवर आधारित लघुपट तयार करता येतात. म्हणून, मी लघुपटांबाबत माहिती गोळा करायला सुरु वात केली. स्वत: कथा लिहिण्याची आवड निर्माण केली. हळूहळू दिग्दर्शन क्षेत्रातील माहिती होत गेली. कॅमेरा कोणता वापरायचा, पटकथा, संवाद कसे लिहायचे हे हळूहळू जमू लागले. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. घरच्यांचा विरोध, मित्रांची मस्करी, आर्थिक चणचण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं.

मनाशी एक पक्की गाठ बांधली, की पुणे, मुंबईला जाऊन संधी शोधण्यापेक्षा आपल्या गावी सोलापुरातच राहून आपण आपली संधी निर्माण करायची. सुरु वातीला मी एकटा होतो, मोबाइल घेऊन शूट करायचो. मग हळूहळू माझ्यासारखी आवड असणारी चार मुलं आली. माझे मोठे बंधू देवा चिंचोळीकर यांच्या सहकार्याने मी ‘देव प्रोडक्शन सोलापूर’ या ग्रुपची निर्मिती केली. हळूहळू ग्रुप वाढत गेला आकाश जाधव, कालिदास पोतदार, संतोष माने, ध्रुव गायकवाड, संघपाल काकडे यांसारखी मित्र मला भेटली. माझ्या टीमच्या जोरावर मी स्वयंलिखित कथांवर ‘ब्रिफकेस’, ‘गुलाम’ आणि ‘गिफ्ट’ नावाच्या लघुपटांची आम्ही निर्मिती केली. स्वच्छ भारत मिशनवर आधारित असणाऱ्या माझ्या ‘गिफ्ट’ या लघुपटास जिल्हास्तरीय द्वितीय क्र मांक मिळाला आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
आता, मी ठरवलंय, याच क्षेत्रात जगायचं. ही तर सुरुवात आहे. अजून दिल्ली खूप दूर आहे. दिग्दर्शक होणं सोपं नाही; पण आता माघारी फिरणं नाही..


अनाउन्समेण्ट

छोटीशी गावं. त्यापेक्षा मोठी; पण छोटीच शहरं. या शहरात राहणारी जिद्दी मुलं. आपल्या स्वप्नांचा हात धरून, संधीच्या शोधात मोठ्या शहरांकडे धावतात. काय देतात ही मोठी शहरं त्यांना? कसं घडवतात-बिघडवतात? आणि जगवतातही..? - ते अनुभव शेअर करण्याचा हा नवा कट्टा. तुम्ही केलाय असा प्रवास? आपलं छोटंसं गाव, घर सोडून मोठ्या शहरात गेला आहात शिकायला? मोठ्या शहरात? दुसऱ्या राज्यात? परदेशातही? काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला? काय अनुभव आले? कडू-वाईट? हरवणारे-जिंकवणारे? त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीत बदलली का? दृष्टिकोन बदलला का? त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला? तुम्ही त्या शहराला? की संपलंच नाही उपरेपण? या साऱ्या अनुभवाविषयी लिहायचंय? तर मग ही एक संधी ! लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट.

१. लिहून पाठवणार असाल, तर पाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा. सोबत तुमचा फोटो आणि पत्ता-फोन नंबरही जरूर लिहा.. पत्ता- संयोजक,ऑक्सिजन, लोकमत भवन, बी-3,एम.आय.डी.सी, अंबड, नाशिक-422010

२. ई-मेल-oxygen@lokmat.com