पुरुषोत्तम जिंकणारा अहमदनगरचा पीसीओ

By साहेबराव नरसाळे | Published: September 6, 2018 06:00 AM2018-09-06T06:00:00+5:302018-09-06T06:00:00+5:30

एरव्ही पुण्यात, पुणेकर तारुण्यानं ही स्पर्धा जिंकणं नवीन नाही. पण गेल्या वर्षी अहमदनगरमधील न्यू आर्ट्स कॉलेजच्या ‘माइक’ एकांकिकेनं ‘पुरुषोत्तम’ करंडक पटकावला आणि यंदा पीसीओनं पुरुषोत्तम करंडक जिंकत आपला ठसा उमटवला.

meet Purushottam winner Ahmadnagar's Young PCO team! | पुरुषोत्तम जिंकणारा अहमदनगरचा पीसीओ

पुरुषोत्तम जिंकणारा अहमदनगरचा पीसीओ

Next
ठळक मुद्देपीसीओवरून अर्थात सार्वजनिक टेलिफोनच्या ऑफिसमधून जग जवळ आणण्याची ती प्रक्रिया होती़; पण त्यातून माणूसपण दुरावल्याची एक कहाणी जन्माला येते. त्या कहाणीचंच नाव पीसीओ़

- साहेबराव नरसाळे

पुरुषोत्तम करंडक़ कॉलेजात शिकताना अभिनयाचा कीडा ज्यांच्या डोक्यात वळवळतो त्यापैकी प्रत्येकाला मोहात पाडणारी ही ट्रॉफी़ आपण पुरुषोत्तम करतोय हे सुद्धा अनेकजण अतीव अभिमानानं सांगतात. ही स्पर्धा एकदातरी जिंकायचीच म्हणून नाटकवेडे तरुण अक्षरश: नाटक जगतात़ एरव्ही पुण्यात, पुणेकर मंडळींनी ही स्पर्धा जिंकणं नवीन नाही. पण गेल्या वर्षी अहमदनगरमधील न्यू आर्ट्स कॉलेजच्या ‘माइक’ एकांकिकेनं ‘पुरुषोत्तम’ करंडक पटकावला अन् या स्पर्धेतील पुणेकरांची सद्दी संपुष्टात आणली़ त्याचवेळी सारडा कॉलेजची ‘ड्रायव्हर’ ही एकांकिकाही अंतिम फेरीत पोहोचली होती़ विजयापासून एक पायरी दूर राहिलेल्या ‘ड्रायव्हर’ या एकांकिकेचं दिग्दर्शन करणारा विनोद गरूड आणि लेखन करणारा अमोल साळवे हे दोघंही जिगरी याऱ त्यांनी यावर्षी पुन्हा नव्यानं उभारी धरली. नवीन ऊर्मी, नवी टीम, नवी संहिता घेऊन पुन्हा पुरुषोत्तममध्ये एण्ट्री मारली आणि स्पर्धा जिंकलीसुद्धा़ ‘पीसीओ’ असं त्यांच्या यावर्षीचा पुरुषोत्तम जिंकणार्‍या एकांकिकेचं नाव़ 
तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय़ पण माणूसपण दुरावत चाललंय, ही या एकांकिकेची वनलाइन थीम़ ही एकांकिका प्रेक्षकांना 1990च्या दशकात घेऊन जात़े त्यावेळी दूरसंचार क्षेत्रात क्रांती होऊ घातली होती आणि गावागावात पीसीओचं एक जाळं तयार झालं होतं़ पिवळे खोके सर्वत्र दिसू लागले. त्या पीसीओवरून अर्थात सार्वजनिक टेलिफोनच्या ऑफिसमधून जग जवळ आणण्याची ती प्रक्रिया होती़; पण त्यातून माणूसपण दुरावल्याची एक कहाणी जन्माला येते. त्या कहाणीचंच नाव पीसीओ़
पीसीओ ही एकांकिका अमोल साळवे याने लिहिली आणि दिग्दर्शन विनोद गरूडनं केलं. टेलिफोनवरच्या संवादातून पीसीओ या एकांकिकेचा पडदा उघडतो़ अत्यंत आनंद देणारा तो संवाद असतो़ पण नंतर जग अधिकाधिक जवळ आणण्याच्या प्रक्रियेत संवाद कसा मुका होतो, हे सहज साध्या प्रसंगातून अमोल साळवे यांनं या एकांकिकेत मांडलं आह़े या एकांकिकेचे लेखन करताना 90च्या दशकातील संवाद, उत्सुकता आणि त्यातून होणारा विनोद प्रेक्षकांना पोटधरून हसायला लावतो़ हसतहसत पीसीओचा शेवट गंभीर वळणावर येऊन पोहोचतो आणि प्रेक्षकांना अंतमरुख करतो़ 
पुण्यातील भरत नाटय़मंदिरमध्ये ही एकांकिका पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सादर झाली. हिप हिप हुर्ये, अऱे़़ आवाùùùज कुणाचा़़़़़ नगरचा़ आवाùùùज कुणाचा़़़ सारडा कॉलेजचा़ अशा घोषणा दुमदुमल्या आणि पुण्यात नगरकरांच्या घोषणांनी पुन्हा एकदा करंडक जिंकला. त्या आनंदी जयघोषाचं, नगरकर तारुण्याचं हे सलग दुसरं वर्ष. 
पीसीओची कथा कशी सुचली, असं अमोल साळवेला विचारलं तर तो सांगतो, आम्हाला ही कथा सुचलीच नव्हती़ आम्ही धर्म आणि पैसा या दोन गोष्टींवर चर्चा करीत होतो़ ही चर्चा करत असताना सध्याचं सोशल मीडियातलं वातावरण आम्हाला थेट त्या पीसीओर्पयत घेऊन गेलं. मग आम्ही त्यातले बारकावे शोधायला सुरुवात केली़ वाचन केलं. जुन्या लोकांशी चर्चा केली़ तो काळ कसा होता, हे जाणून घेतलं आणि मग लिहायला बसलो़ एकांकिका लिहून झाली़ विनोद दिग्दर्शन चांगलं करतो म्हणून त्यालाच पुन्हा दिग्दर्शन करायला सांगितलं. त्यानं टीमची जुळवाजुळव केली़
या टीमची तर खासियत आहेच. पुणेकर गर्दीत एरव्ही  लिंबू-टिंबू आणि एकदम साधारण, खेडूत वाटावीत अशी यातली अनेक पोरं़ त्यांची निम्मी टीम खेडय़ातलीच आह़े खेडय़ातून येऊन शहराला रुळलेली आणि नुकतीच शहरात घुसलेली अशी पीसीओच्या टीमची सरमिसऴ 
म्हणून विनोद गरूडला विचारलं की दिग्दर्शक म्हणून तू या टीमचा ताळमेळ कसा बसवला? तेव्हा विनोद सांगू लागला, ‘आम्ही सलग महिनाभर प्रॅक्टिस करत होतो़ गेल्या वर्षीचा अनुभव सोबत होताच़ ‘ड्रायव्हर’ या गेल्या वर्षीच्या एकांकिकेनं आम्हाला खूप शिकवलं. यावर्षी आम्ही पुन्हा ऑडिशन घेतली़ त्यातून खूप सारं टॅलेंट पुढं आलं; पण सर्वानाच आम्ही घेऊ शकत नव्हतो़ मग आम्ही त्यांना टास्क दिली़ ती टास्क पूर्ण करणार्‍यांना आम्ही सिलेक्ट केलं. त्यातून 15 जणांची टीम तयार झाली़ ही 15 जणांची टीम रोज सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेर्पयत तालमीत दंग असायची़ मोबाइल वापरण्यास कलाकारांना बंदी घालण्यात आली होती़ खूप अजर्ट असेल तरच मोबाइलचा वापर करायचा़ हा वापरही कॉलिंगपुरताच मर्यादित होता़ सोशल मीडियापासून प्रत्येक कलाकाराला दूर ठेवलं होतं. रिक्षा किंवा मोटारसायकलही वापरण्यास सुरुवातीला बंदी केली होती़ फक्त सायकल वापरण्याची मुभा होती़ त्यानुसार कलाकारांनी काही दिवस सायकल वापरलीही़ पण ते फार काळ टिकलं नाही़ त्यामुळे वाहन वापराची अट रद्द करण्यात आली़ प्रॅक्टिस संपल्यानंतर प्रत्येकानं आपल्या वडिलाधार्‍यांशी जाऊन चर्चा करायची़ पीसीओत जाऊन फोन करण्याच्या दिवसांविषयी बोलायचं, त्यांच्या आठवणी ऐकून घ्यायच्या़ शक्य झाल्यास त्यांना ते संवाद विचारायचे, त्या संवादातील गमती जाणून घ्यायच्या आणि त्यांची नक्कल करायची, असा एक टास्क प्रॅक्टिसदरम्यान कलाकारांना देण्यात आला होता़ त्यामुळे या एकांकिकेतील प्रत्येक कलाकारांना 90च्या दशकाशी सुसंगत संवाद साधता आला़ तो काळ अनुभवता आलेला नसला तरी वडिलधार्‍यांच्या अनुभवातून तो काळ पुन्हा जिवंत करता आला़ त्याचा आम्हाला फायदा झाला़’
अशा अनेक लहान-मोठय़ा गोष्टींतून त्यांनी तो काळ उभा केला. जगवला. जागवला.
आणि मग एक क्षण असा आला, की पुण्यात या पीसीओचा असा दणका उडाला की हातात मानाचा, झळाळता पुरुषोत्तम करंडक घेऊनच हा संघ अ. नगरला परतला.
आता पुरुषोत्तम करंडक जिंकण्याच्या मानाच्या कथेत त्यांचीही नावं कायम घेतली जातील. 

****
 

पीसीओत जीव ओतून काम करणारे कलाकार 


विनोद गरूड,  मोनिका बनकर, विशाल साठे,  गौरी डांगे, आविष्कार ठाकूर, रेवती शिंदे, निरंजन केसकर, आश्लेषा कुलकर्णी, सोहम दायमा. 
बॅकस्टेज आर्टिस्ट - अमोल साळवे, स्वराज अपूर्वा (प्रकाश योजना), श्रुता भाटे (संगीत), आविष्कार ठाकूर (नेपथ्य), वैष्णवी लव्हाळे, अनीष क्षीरसागर (रंगमंच व्यवस्था)़


अमोल साळवे - लेखनातला हिरो

अमोल साळवे हा नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील रहिवासी़ सर्वसामान्य कुटुंबातला़ अमित बैचे यांच्या नाटय़लेखन कार्यशाळेत त्यानं सहभाग घेतला होता. तेथून त्याच्या एकांकिका लेखनाचा प्रवास सुरू झाला़ या कार्यशाळेत वेश्याव्यवसायावर लिहिण्याचं टास्क त्याला देण्यात आलं होतं़ त्यात त्यानं वेश्याव्यवसायातील एका मुलीवर कथा लिहिली़ या कथेवरच त्यानं ‘कोंडवाडा’ ही एकांकिका लिहिली़ त्यानंतर त्याने ‘सांगड, ड्रायव्हर, अर्धागिनी, खटारा, एका लेखकाचा मृत्यू, पीसीओ अशा एकांकिका लिहिल्या़ यातील खटारा हे दोन अंकी नाटक आह़े ड्रायव्हर, खटारा (दोन अंकी नाटक), कोंडवाडा, पीसीओ यांना अनेक स्पर्धाना पारितोषिके देऊन गौरविण्यात आलं आह़े लेखनासाठी त्याला अनेक पारितोषिके मिळालेली आहेत़ सामाजिक भान असलेला उभरता लेखक म्हणून त्याचा गौरव होत आह़े गेल्या वर्षी नगरच्या न्यू आर्ट्स कॉलेजची ‘माइक’ व सारडा कॉलेजची ‘ड्रायव्हर’ या एकांकिका पुरुषोत्तम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या़ यातील ‘माइक’ने करंडक पटकावला होता, तर ‘ड्रायव्हर’मधील हरिष बारस्कर याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं होतं.विशेष म्हणजे ‘ड्रायव्हर’ ही एकांकिका अमोल साळवे यानंच लिहिली होती़ 

विनोद गरूड नाटकवेडा दिग्दर्शक

विनोद गरूड हा सर्वसामान्य घरातला तरुण़ तो नगरमधील पेमराज सारडा कॉलेजमध्ये एम़ ए़ (मराठी) चं शिक्षण घेतोय़ नाटकाची पॅशन घेऊन जगतोय़ सारडा कॉलेजमध्ये तो अमोल साळवे या हुरहुन्नरी कलाकाराला भेटला अन् नाटकाच्या प्रेमातच पडला़ मागील वर्षी सारडा कॉलेजची ‘ड्रायव्हर’ ही एकांकिका पुरुषोत्तम स्पर्धेत अंतिम फेरीर्पयत पोहोचली होती़ यंदा त्यानं पीसीओ एकांकिकेचे दिग्दर्शन करतानाच श्याम ही भूमिकाही साकारली.  तो गेल्या चार वर्षापासून नाटक करतोय़ या चार वर्षात त्यानं अनेक बक्षिसे मिळविली़; पण पुरुषोत्तम जिंकण्याची इच्छा अपुरी होती, ती यंदा पूर्ण झाली़ विनोदला पुरुषोत्तममध्ये दिग्दर्शनाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं.
 

मोनिका बनकर 
शेतकर्‍याची मुलगी ते अभिनेत्री


मोनिक बनकर ही नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई येथील शेतकर्‍याची मुलगी़ सर्वसामान्य कुटुंबात वाढलेली़ सारडा कॉलेजमध्ये झालेल्या नाटकाच्या ऑडिशनमधून ती पुढे आलीय़ गेल्या तीन वर्षापासून तिने विविध नाटकांमधून अभिनयाची छाप सोडलीय़ मागील वर्षी शाहू मोडक एकांकिका स्पर्धेत तिने ‘ट्रॅफिक’ या एकांकिकेचं लेखन आणि दिग्दर्शन केलं. ‘पीसीओ’मध्ये तिनं राधाची भूमिका केली आह़े तसेच सध्या ती ‘कट्टी-बट्टी’ या टीव्ही मालिकेत सोनालीची भूमिका करतेय़ पुरुषोत्तममध्ये मोनिकाला स्त्री अभिनयाचं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं आह़े

आविष्कार ठाकूर, हसरा अभिनेता


आविष्कार ठाकूर हा नगरमधील लेखिका ऋता ठाकूर यांचा मुलगा़ सांस्कृतिक वातावरणात वाढलेला़ हसमुख चेहरा़ म्हणूनच त्याला नाटकातही हसरे हे पात्र देण्यात आलं. त्यानं ते उत्तम वठवलं. त्याला पुरुषोत्तममध्ये अभिनयाचं उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं आह़े


(साहेबराव लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
 

Web Title: meet Purushottam winner Ahmadnagar's Young PCO team!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.