भेटा एका पायावर मॅरेथॉन पळणार्‍या जावेद चौधरीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:49 PM2018-10-19T17:49:41+5:302018-10-19T17:50:21+5:30

जावेद चौधरी. मूळचा लोणेरचा. आता पुण्यात असतो. वयाची पंचविशी न पाहिलेल्या या मुलाचा एक पाय अपघातात गेला; पण आता तो एका पायावर जगण्याची मॅरेथॉन पळतो आणि सांगतोय, जगण्याची पाटी कोरी करण्याची संधी मिळाली, त्यावर नव्यानं बेततोय!

Meet Javed Chaudhary running marathon on one leg! | भेटा एका पायावर मॅरेथॉन पळणार्‍या जावेद चौधरीला!

भेटा एका पायावर मॅरेथॉन पळणार्‍या जावेद चौधरीला!

Next
ठळक मुद्देजगानं त्याचा दमसास नुसता झलक म्हणून पाहिलाय, त्याला भेटलं की कळतं, एका पायावर जगण्याची हिंमत त्याला अजून खूप पुढं घेऊन जाणार आहे! 

- नेहा सराफ 

पुण्यात झालेल्या मॅरेथॉनमध्ये एका पायावर 10 किलोमीटर अंतर पळणार्‍या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
एका पायावर कुणी मॅरेथॉन पळू शकतं का, त्याला विचारा, तर कळेल की मॅरेथॉनच काय एका पायावर अक्षरशर्‍ तो जग जिंकायला निघाला आहे. रस्त्यावरची अंतरंच कशाला आयुष्य बदलून टाकणारी एक रेस त्यानं स्वतर्‍शीच लावली आहे आणि एकाच जन्मात दोन जन्म जगल्यासारखा तो नव्यानं आपल्या आयुष्याचा पाया घालतो आहे.  
  ही कहाणी आहे जावेदची. जावेद  रमजान चौधरी. अवघ्या 24 वर्षाचा मुलगा. पण या वयात त्यानं अनुभवलेलं जग मात्न वयापेक्षा कितीतरी मोठं. बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणारचा हा जावेद. घरात ना शिक्षण घेण्यासारखी आर्थिक परिस्थिती होती ना वातावरण. मात्र तरीही दूध विक्र ीचा व्यवसाय करणार्‍या वडिलांनी मात्न त्याला शक्य तेवढं बळ दिलं. तो औरंगाबादला अ‍ॅग्रिकल्चरचं शिक्षण घ्यायला दाखल झाला. सोनं कुठेही गेलं तरी चमकतंच तसा जावेदही कॉलेजचं नाही तर विद्यापीठातही चमकू लागला. 2015 साली तो तिसर्‍या वर्षात होता. प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न अखंड त्याच्या डोळ्यासमोर नाचत होतं; पण नियतीच्या मनात मात्न तिसरंच होत. गावाकडे आलेल्या जावेदला रस्त्यातल्या खड्डय़ांचा फटका बसला आणि  एका भयाण दुपारी तो मेहकर रस्त्यावर अपघाताचा बळी ठरला. 
    अपघात झाला, त्याला औरंगाबादला नेण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याला काही तास तसंच बसवलं आणि उशीर झाल्याच सांगत त्याचा एक पाय काढण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे मुलाला वाचवण्यासाठी घरच्यांनी त्याला पुण्यात ससून हॉस्पिटलला नेलं. तिथं त्याला आपला पाय गमवावाच लागला. 


वयाची पंचविशीही न पाहिलेल्या तरुण मुलाला एक पाय गमवावा लागल्यावर काय वाटलं असेल.
  डिस्चार्ज मिळाल्यावर घरी आल्यावर नातेवाईक यायचे आणि म्हणायचे,  सोने जैसा लडका, मानो मिट्टी हो गया! हे ऐकल्यावर त्याच्या आई-वडिलांचा अश्रूंचा बांध पुन्हा पुन्हा फुटत होता. पण जावेदनं ठरवलं, हे असं रडून नाही चालणार! मला उभं राहायचंय आणि तेही स्वतर्‍च्या पायावर!
 या जिद्दीने जणू त्याला पछाडलं होतं. मग त्यानं हिमतीनं एका पायावर हालचाली करायला सुरुवात केली. हे सोपं नव्हतंच फार वेदनादायी होत. तो मात्न खंबीर होता. जावेद सांगतो,  जे घडायचं ते घडलं होतं, ते बदलता येणं शक्य नव्हतं. आता मला स्वतर्‍ला घडवायचं होतं. आयुष्य फार कमी वेळा आपली पाटी अधेमध्ये कोरी करतं. आयुष्यानं माझी पाटी अशी कोरीच करून टाकली. मागे काही उरलं नाही. मला वाटतं, ती संधी असते, सगळ्यांना कळते असं नाही पण मी मात्न ती उचलली. वाटलं नव्यानं पायावर उभं राहू!’
त्यानं मग या काळात आपले जुने छंद पुन्हा जोपासायला सुरुवात केली. नृत्य आणि गिटार शिकवण्याचे क्लास घेऊन त्यानं घरच्यांना मदत करणं सुरू केलं. दुसरीकडे शिक्षणही पूर्ण केलं. शिकायचं, जग अनुभयाचंय ही इच्छा त्याचा पिच्छा सोडत नव्हती. त्यानं रॅप्लिंग शिकायला सुरुवात केली. दुसरीकडे अशक्य वाटणारे बाइक स्टंट आणि स्विमिंगही तो करत होता. अचानक पुन्हा दिशा बदलली आणि त्याची ओळख खुर्चीवर खेळल्या जाणार्‍या बास्केटबॉल खेळाशी झाली. पुन्हा त्याच मन तरारलं आणि त्यानं चेअर बास्केटबॉल खेळायला सुरुवात केली. या खेळासाठी लागणारी खुर्चीही त्याच्याकडे नव्हती. दुसर्‍याची खुर्ची घेऊन त्यानं खेळ केला आणि थेट मॅन ऑफ दि सिरीज टप्प्याला गवसणी घातली. येत्या 26 नोव्हेंबरला तो लेबनॉनमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. अर्थात, अजूनही त्याच्याकडे व्हीलचेअरसाठी पुरेशी रक्कम नाही पण सराव मात्न जोरदार सुरू आहे.  
तो सांगतो, माझ्याकडे पैसे नाहीत, पण मी स्पर्धेला जाईन आणि पदक घेऊनच येईल.’ हे सांगताना त्याचा चेहरा विलक्षण खुलतो. सध्या जावेद पुण्यात राहतो. मित्न, खेळाडू सहकारी यांच्या पाठिंब्यावर नियतीला झुकवून त्याची वाटचाल सुरू आहे. मुलाखतीच्या शेवटी म्हणाला, परवा घरी गेलो होतो. एक नातेवाईक आला आणि पुन्हा म्हणाला,  सोने जैसा लडका मिट्टी हो गया, पण यावेळी माझे वडील रडले नाहीत. त्याला म्हणाले, मिट्टी नहीं, हिरा हुआ है मेरा जावेद!’
आपल्या अब्बूंचं असं पाठीवर हात ठेवून उभं राहणं या हिर्‍याला खरंच पैलू पाडत आहे. त्यानं मॅरेथॉन पळून एका नव्या प्रवासाची फक्त सुरुवात केली आहे. जगानं त्याचा दमसास नुसता झलक म्हणून पाहिलाय, त्याला भेटलं की कळतं, एका पायावर जगण्याची हिंमत त्याला अजून खूप पुढं घेऊन जाणार आहे! 



 

Web Title: Meet Javed Chaudhary running marathon on one leg!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.