meet aarti pingale. PSi daughter of Shepherd | मेंढपाळाची पीएसआय लेक! भेटा, कोल्हापूरच्या आरती पिंगळेला!
मेंढपाळाची पीएसआय लेक! भेटा, कोल्हापूरच्या आरती पिंगळेला!

ठळक मुद्देएकटी आरतीच पीएसआय झाली असं नाही तर तिनं आपल्या अवतीभोवतीही शिक्षणाची आणि प्रगतीची स्वप्न पेरलेली दिसतात.

नसिम सनदी

‘घरातली वडीलधारी माणसं मेंढय़ा घेऊन रानोमाळ उन्हातान्हात भटकायचे. त्यांच्यासोबतच मेंढय़ांबरोबर चार-चार महिने घरापासून लांब कुठंतरी पाऊस न पडणार्‍या रानावनात मेंढय़ा चारायला जायचं. ऊन म्हणायचं नाही की रात्र, थंडी-वार्‍याची पर्वा नाही. मेंढय़ांच्या सोबतीनंच महिनोमहिने राहायचं. हेच मेंढपाळाचं आयुष्य  असतं. तेच जगत मी लहानची मोठी झाले. मनात तेव्हाच कुठंतरी होतं की, आपण शिकायचं. मोठी अधिकारी बनायचं. घरच्यांना परिस्थितीच्या चक्रातून बाहेर काढायचं. ती जिद्द मनात होती, तिनंच अधिकारी हो म्हणत मला शिकायला लावलं. घरच्यांनीही मुलगी म्हणून कधी अडवणूक केली नाही. जे करायचं म्हटलं ते कर म्हणाले. त्यातून शिकत गेले, घडत गेले. आता एक टप्पा झाला, अजूनही खूप पल्ला गाठायचा आहे..’
आरती सांगत असते. तिच्या नजरेतला आत्मविश्वास आणि शेजारी बसलेल्या तिच्या माणसांच्या नजरेतला अभिमान आपल्याला खूप काही सांगत असतो. तो म्हणत असतो, जिद्दीनं पुढं व्हा, ठरवलं की शोधता येतेच आपली वाट.

त्या जिद्दीचंच एक रूप म्हणजे आरती सुरेश पिंगळे. पीएसआय परीक्षेत ती भटक्या विमुक्त प्रवर्गातून राज्यात दुसरी आली. कोल्हापुरातील कसबा बावडा येथे धनगर गल्लीत राहणारी ही आरती. ती राज्यात गुणवत्ता यादीत आली म्हटल्यावर भल्या सकाळीच तिचं घर गाठलं तर तिचं कौतुक करणार्‍यांची प्रचंड गर्दी. तिच्या जवळच बसलेली आजी. नातीचं यश पाहून भारावून गेलेली. आई, वडील, चुलते, चुलती, बहीण, भावंडं सारीच येणार्‍या-जाणार्‍यांच्या सराबराईत दंग. त्यातून जरा बाजूला करत आरतीला बोलतं केलं.

आरती सांगते, आमचा पारंपरिक व्यवसाय मेंढपाळाचा. मला तीन चुलते. माझे वडील मेंढपाळ म्हणून काम करायचे. आता मात्र सर्व जबाबदारी भाऊ रमेश याच्या खांद्यावर देऊन ते एमआयडीसीत वॉचमन म्हणून काम करतात. आणखी एक चुलते मुख्याध्यापक, तर दुसरे पोलीस आहेत. एकत्र कुटुंब आहे. घरात आम्ही 17 जण राहातो. आजीची एकूण 7 नातवंडं.  यापैकी मी सर्वात मोठी. सर्वात जास्त शिकलेली आणि नोकरी करणारीदेखील मी पहिलीच मुलगी. ’

ती सांगत असताना तिच्या नजरेत तिचा भूतकाळ दिसतो. भटकंती करून उदरनिर्वाह करणारं हे कुटुंब. आपण जे कष्ट उपसले ते आपल्या पुढच्या पिढीला सोसावे लागू नये म्हणून घरच्यांनी तिला शिकवलं.  आरतीच्या घरातही आता थोडी समृद्धी नांदत आहे, यावर विचारले तर ती सर्व श्रेय चुलते रमेश पिंगळे यांना देते. रमेश शाळेत हुशार असतानाही सातवीतच शाळा सोडली आणि मेंढरं हातात घेतली, ती आजर्पयत सुरूच आहेत. या मेंढराच्या जिवावर त्यांनी सर्वाना शिक्षण दिलं. शिक्षणातूनच समृद्धी आली. आज आरतीच्या पावलावर पाऊल ठेवून घरातील मुलं स्पर्धा परीक्षांचा नेटानं अभ्यास करू लागली आहेत. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेत आहेत. एक दिवस अधिकार्‍यांचं घर म्हणून नावारूपास आणण्याचे या भावंडांचं स्वप्न आहे.

आरती गेल्या चार वर्षापासून जिल्हा परिषदेत महिला व बाल कल्याण विभागात संरक्षण अधिकारी म्हणून काम करत होती. पण मोठी अधिकारी व्हायचं स्वप्न असल्याने तिनं नोकरी करत करतच अभ्यास सुरू केला. नुसतीच घोकंमपट्टी करण्यापेक्षा नेमक्या अभ्यासावर भर दिला. अशा प्रकारची परीक्षा पास झालेल्यांना भेटून त्यांचे अनुभव समजावून घेतले. या सर्वाचा परिणाम होऊन तिला पहिल्याच प्रयत्नांत यश मिळालं. एवढय़ावरच न थांबता ‘क्लास वन अधिकारी’ होण्याचं तिचं स्वप्न आहे. 

तिचे आईवडीलही सांगतात, ‘आमची काही आडकाठी असणार नाही, तिला जे करायचं ते तिनं करावं! आज या पोरीमुळेच आम्हाला कौतुकाचे दिवस पाहायला मिळत आहेत.’ 

एकटी आरतीच पीएसआय झाली असं नाही तर तिनं आपल्या अवतीभोवतीही शिक्षणाची आणि प्रगतीची स्वप्न पेरलेली दिसतात.


 


Web Title: meet aarti pingale. PSi daughter of Shepherd
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.