फिटनेससाठी पळण्याची तरुण सुपरफास्ट गोष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:30 AM2019-01-17T06:30:00+5:302019-01-17T06:30:12+5:30

मॅरेथॉन रनर. या शब्दांना सध्या मोठं ग्लॅमर आलंय. जे कधी बस पकडायला धावले नाहीत, ते आता रोज सुसाट धावतात. पळण्याची ही क्रेझ इतकी का वाढली आहे?

Marathon runners.. why they run for life& fitness? | फिटनेससाठी पळण्याची तरुण सुपरफास्ट गोष्ट!

फिटनेससाठी पळण्याची तरुण सुपरफास्ट गोष्ट!

Next
ठळक मुद्देरनिंग/मॅरेथॉन.... पळा पळा रे!

  समीर मराठे  

ज्यांनी आयुष्यात कधी व्यायाम केला नाही, जिमचं तोंड पाहिलं नाही, अंगमेहनतीची कधी सवय नाही, शाळा सोडल्यानंतर चुकून कधी बस पकडायलाहीा धावले नाहीत, असे अनेकजण आता मॅरेथॉन पळतात. आपण अमुक मॅरेथॉन ‘फिनिशर’ आहोत म्हणून मोठय़ा सन्मानानं फोटो सोशल मीडियात डकवतात. इतर जण त्यांचं कौतुक करतात. मग इतरही काहीजण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पळायला लागतात.
हे पळणं इतकं सुसाट आहे की, अनेकांना वाटतं, आपण पळत नाही म्हणजे काहीतरी मिस करतोय! त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी, फिट राहण्यासाठी बरेचजण पळू लागलेत. पळण्याचा हा फंडा सध्या मोठं ग्लॅमर घेऊन मैदानात उतरला आहे. 
मात्र हा फंडा फक्त न्यूकमर्ससाठी मर्यादित राहिलेला नाही. ‘आता पळालंच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही’ अशा निरुपायानं आणि कंटाळ्यानंही कोणी रनिंगकडे पाहात नाही. उलट पळणं म्हणजे ग्लॅमर, पळणं म्हणजे कॉन्फिडन्स, असा एक नवीनच मामला आहे. 
कुठल्याही शहराच्या कुठल्याही मैदानावर सकाळच्या वेळी एक चक्कर मारा, सारी मैदानं तरुणांपासून तर आबालवृद्धांर्पयत ओसंडून वाहताना दिसतात. तरुणाईला तर या रनिंगचा अगदी चस्काच लागला आहे. नुसतं काही मीटर धावण्यापासून झालेली त्यांची सुरुवात आता चक्क हाफ आणि फुल मॅरेथॉनर्पयत गेली आहे. 
गेल्या तीन-चार वर्षापासून तरुणाईत रनिंगची ही क्रेझ खूपच वाढली आहे. सोशल मीडियावर तर या ग्रुप्सनी अक्षरशर्‍ धुमाकूळ घातला आहे. प्रत्येकजण आपले धावतानाचे फोटो, व्हीडिओज सोशल मीडियावर शेअर करतोय. आपले मित्र-मैत्रिणी जर धाऊ शकतात, तर आपण का नाही? या मानसिकतेतूनही अनेकजण धावायला लागलेत. त्यांच्यात धावण्याची पॅशनच निर्माण झालीय.
अनिरुद्ध अथनी हे नाशिकचे प्रसिद्ध मॅरेथॉनपटू आणि मॅरेथॉन ट्रेनर. आजवर साठपेक्षाही जास्त हाफ आणि फुल मॅरेथॉनमध्ये ते धावले आहेत. अमेरिकेत आणि दिल्लीत सलग चोवीस तास धावण्याचा विक्रमही त्यांच्या नावे आहे. 
अथनी यांना विचारलं, तरुणांमध्ये रनिंग; त्यातही मॅरेथॉनची ही पॅशन आणि क्रेझ इतक्या झपाटय़ानं का वाढतेय?.
अथनी यांचं म्हणणं होतं, कुठलाही गेम घ्या, कुठलीही स्पर्धा घ्या, त्यात कुणीतरी एक विनर असतो आणि बाकीचे लूजर्स! मॅरेथॉन ही अशी एकच स्पर्धा आहे, जी पूर्ण करणारा प्रत्येकजण ‘विनर’ असतो. कारण मॅरेथॉन पूर्ण करणार्‍या प्रत्येकाला ‘फिनिशर’ मेडल मिळतं. हे मेडल त्याच्यासाठी खूपच महत्त्वाचं असतं. ते केवळ त्याला ऊर्जाच देत नाही, तर त्याला कायम प्रेरणाही देतं. शिवाय ही कामगिरी ‘मी माझ्या स्वतर्‍च्या बळावर, माझ्या ताकदीवर, हिमतीवर केलेली आहे’, याचं अपार समाधान त्याला मिळत असतं. हे समाधान, ‘स्व’ची ही जाणीव आणि आपणही काही करू शकतो, हा नव्यानं गवसलेला आत्मविश्वास त्याला धावण्याच्या मैदानावर कायम राहायला आणि इतरांनाही तिथे यायला प्रवृत्त करतो. 
आज मैदानांवर दिसणारी ही गर्दी केवळ हौशी आणि ‘हंगामी’ राहिलेली नाही. केवळ थंडी आली किंवा डॉक्टरांनी सांगितलं म्हणून मैदानावर आलेली नाहीत. या मैदानांकडे ते स्वतर्‍हून येताहेत, मैदानांच्या कवेत शिरताहेत आणि त्यांनाही नवी स्पंदनं पुरवताहेत.
त्यामागे त्यांची पॅशन आहे, मेहनत आहे, जिद्द आहे, आवड आहे आणि ‘स्व’ची जाणीवही! म्हणूनच आज लहान-मोठय़ा शहरांतल्या मॅरेथॉन स्पर्धामध्ये जेव्हा तरुण धावताना दिसतात, तेव्हा रस्तेही तुडुंब भरलेले असतात. धावणार्‍यांबरोबरच या रस्त्यांचे श्वासही आनंदानं फुललेले असतात. हे फुललेले श्वासच आज त्या त्या शहरांची शान ठरताहेत.
अनिरुद्ध अथनी सांगतात, जगातला हा सर्वात सोपा असा व्यायामप्रकार आहे. कोणीही, कुठेही आणि कुठल्याही वयात रनिंगला सुरुवात करू शकतो. त्यासाठीचा खर्चही फार नाही. त्यासाठी कुठलं मशीन लागत नाही, कुठली फी भरावी लागत नाही, एक इच्छा आणि दुसरं म्हणजे रनिंग शूज असले की तुमचं काम भागतं. त्याला पॅशनची जोड मिळाली की मग मैदानांवर आपोआपच पावलांचे आवाज आणि तरुणांचे हुंकार घुमायला लागतात. 
स्वतर्‍च्या हिमतीवर धावणारं वेगाचं हे वेड गावागावातल्या रस्त्यांवर आता वाढत जातानाच दिसणार आहे.

पळायला सुरुवात करण्यापूर्वी.

1. माझा मित्र, मैत्रीण रनिंग करतेय, आजूबाजूचे, बिल्डिंगमधले लोक रनिंग करताहेत, म्हणून अति उत्साहानं रनिंग सुरू करू नका. 
2. रनिंगला सुरुवात करण्यापूर्वी आपलं शरीर त्यासाठी तयार आहे की नाही, आपल्याला कुठला आजार आहे का, आपल्या हृदयाला ते झेपेल की नाही, हे प्रश्न खूपच महत्त्वाचे ठरतात.
3. त्यामुळे रनिंगला सुरुवात करण्यापूर्वी आधी आपल्या डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला जरूर घ्या.
4. बरेच जण काही दिवस झाले की लगेच लॉँग डिस्टन्स पळायला सुरुवात करतात; पण असं करणं धोक्याचं ठरू शकतं. शॉर्ट डिस्टन्स आणि लॉँग डिस्टन्स रनिंगमध्ये खूप फरक आहे. तज्ज्ञांकडून त्यासंदर्भात मार्गदर्शन, योग्य ट्रेनिंग घेऊन मगच लॉँग डिस्टन्सकडे वळा.
5. रनिंगच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पळताना जमिनीवर होणारा आघात. पावलं जोरानं आपटत तुम्ही रनिंग करीत असाल तर तुमच्या गुडघ्यांना नक्कीच दुखापत होऊ शकते.
6. रनिंग करताना शूज कम्पलसरी. पण अनेकांना वाटतं, नुसते शूज घातले म्हणजे झालं. पण त्यासाठी आपल्या पायाची ठेवण कशी आहे हे आधी पाहिलं पाहिजे. आपल्या पायाच्या ठेवणीनुसार घातलेले शूजच उपयोगी ठरतात, अन्यथा त्यामुळेही दुखापती वाढू शकतात. 

पळताना हे विसरू नका. 


1. पळण्यासाठी फक्त पाय लागतात, बाकी काही नाही, असं म्हणणं खूप सोपं आहे; पण प्रॉपर गायडन्स घेऊनच रनिंगला सुरुवात करा. 
2. पळणं ही अगदी साधी, सोपी गोष्ट वाटत असली तरी त्यात तांत्रिक बाबी खूप मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्या समजून घेऊनच रनिंग करायला हवी, नाहीतर दुखापत ठरलेली.
3. अनेकजण उत्साहानं रनिंगला सुरुवात करतात, पण तज्ज्ञांचा अनुभव असा आहे, त्यातले 70 टक्के लोक नंतर रनिंग कायमची सोडतात, कारण दुखापत! त्यामुळे रनिंगची सुरुवातच योग्य आणि शास्त्रोक्त प्रशिक्षणानं केली तर हा केवळ छंद न राहाता तो तुम्हाला आयुष्यभर ऊर्जा देत राहील. 
4. रनिंग सुरू केली की अनेकजण रोज धावतात; पण असं करणं चुकीचं आहे. रिकव्हरीसाठी थोडा ब्रेकही हवा. 
5. काहीजण रॅँडमली पळतात. त्यात पळण्याचंही सातत्य नसतं आणि अंतराचंही. कधी एक किलोमीटर पळतील, कधी दोन, तर कधी एकदम दहा! सोमवारी रनिंग केली, तर काहीजण थेट रविवारी मैदानाचं तोंड पाहतात! आपल्या शरीरासाठी ते घातक आहे. 
6. पळताना आपले सांधे डॅमेज होणार नाहीत, याची काळजी अवश्य घ्या. 
7. रनिंगमध्ये हळूहळू वाढ करा.
8. आपला समविचारी ग्रुप करता आला तर उत्तम. ग्रुपसोबत धावण्याचे अनेक फायदे होतात. आपली सुरक्षितता वाढते, प्रेरणा मिळते आणि इतरांच्या अनुभवातून शिकायलाही मिळतं.

हे टाळणं उत्तम.

1. जे अतिस्थूल आहेत, ज्यांना अगोदरपासूनच सांध्यांचं दुखणं आहे, हृदयविकार, ब्लडप्रेशर आहे, अशांनी शक्यतो रनिंगपासून दूर राहावं किंवा आधी वैद्यकीय सल्ला घेऊन मगच हळूहळू चालायला आणि नंतर धावायला सुरुवात करावी.
2. जास्त पाणी पिऊन धावू नका आणि टॉयलेटला न जाता धावायला सुरुवात करू नये. अशानं पोट दुखू शकतं, ब्लॅडर, ब्रेन सेल्सला सूज येऊ शकते. चक्कर येऊन तुम्ही पडूही शकता.
3. जास्त पाणी पिणं घातक, तसंच अगदीच पाणी न पिणंही घातक. पळतानाही थोडं थोडं पाणी पिणं आवश्यक आहे, अन्यथा डिहायड्रेशन होऊ शकतं. सोडियम आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या कमतरतेमुळे उलटय़ा आणि पोटदुखीही होऊ शकते.
4. जास्त खाऊन धावल्यामुळेही डायजेस्टिक मसल्सवर वाईट परिणाम होतो. त्यानं डायरिया, पोटदुखी आणि उलटय़ाही होऊ शकतात.
5. काहीजण धावायला सुरुवात करतानाच एखाद्याशी स्पर्धा केल्यासारखं किंवा कुत्रं  मागे लागल्यासारखं धावतात. त्यामुळे तुम्ही काही अंतर तर जोरात धावाल; पण प्रचंड थकव्यामुळे लवकरच थांबाल. हृदयावरही त्यामुळे ताण येऊ शकतो.
6. स्ट्रेचिंग, वॉर्मअप करूनच धावायला सुरुवात करायला हवी. तसं न केल्यास पाय लचकणं, आखडणं, क्रॅम्प येणं असे प्रकार होऊ शकतात. 
 

Web Title: Marathon runners.. why they run for life& fitness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.