प्रेमच संपवणारे हे कोणते व्हायरस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 06:00 PM2019-02-07T18:00:00+5:302019-02-07T18:00:02+5:30

प्रेम आपल्या समाजात आजही गुन्हाच आहे. प्रेमाच्या नावावर गळे चिरले जातातच; मात्र त्यापलीकडे प्रेमाचे वैरी आपणच पोसतोय, त्यांचं काय?

Love virous- is it killing your love? | प्रेमच संपवणारे हे कोणते व्हायरस?

प्रेमच संपवणारे हे कोणते व्हायरस?

Next
ठळक मुद्देअ‍ॅन्टिव्हायरस सापडेल तेव्हा सापडेल; पण हे सारं काय आपण ओढावून घेतो आहोत, याचा विचार या आगामी प्रेम दिनानिमित्त करायला हवा. 1) बिझी, यू नो!

- अंकुश जोशी

व्हॅलेन्टाइन्स वीक सुरू झाला.
बाजारपेठा सजतील, लालचुटुक फुगे, हॉटेल्स, माध्यमातल्या बातम्या हे सारं सुरू होईल.
हे सारं आपल्या समाजात खरं आहे की नाही? तर आहे. प्यार किया तो डरना क्या म्हणणारं तारुण्य आहे की नाही, तर आहे.
मात्र, प्यार के दुश्मन हजार हे आजही खरंच आहे. वाचतोच आपण बातम्या. प्रेमाची शिक्षा म्हणून भररस्त्यात आजही गळा कापला जातो. त्याच्या बातम्या वाचून, व्हायरल व्हिडीओ पाहून भीती वाटतेच. आजही खेडय़ापाडय़ातच कशाला, शहरातही जातीपाती, खानदान की इज्जत, घरच्यांना फसवलं, पैसाअडका, लोक काय म्हणतील, रंगरूप हे सारे प्रेमात आडवं येतं. ते सारं एका टप्प्यावर इतकं महत्त्वाचं ठरतं की त्यापायी एकमेकांचे जीव घ्यायला लोक कमी करत नाहीत. आणि आपल्यामुळे नको घरच्यांना त्रास म्हणून यश चोप्रा फिल्म स्टाइल मुलंमुली स्वतर्‍च ठरवतात की आपण आपल्या प्रेमाचा त्याग करू, विसरुन जाऊ सारं पण हा जीवघेणा जाच नको. किती मुलंमुली आजही आपलं प्रेम विसरुन, सारं संपवून घरचे म्हणतात तिथं लग्न करून मोकळे होतात. भयंकर असलं तरी हे आजच्या समाजाचं वास्तव आहेच. 
मात्र हे सारे शत्रू कमीच होते म्हणून आधुनिक काळात आणखी काही शत्रू आता प्रेमाच्या जिवावर उठलेत. आणि त्यापायी प्रेमातल्या रोमान्सलाच नाही तर प्रेमालाच चूड लागतोय हे लक्षातही येत नाही. अनेकांना कुठून प्रेमात पडलो असं वाटावं इतका जीव नको करणारी भांडणं सतत होतात. कारण प्रेमाला छळणारे आणि त्यासाठी टपून बसलेले काही शत्रू आपल्याच पिढीनं जन्माला घातले आहेत. त्यांची जाणीव होते तोवर ब्रेकअप होऊन गेलेला असतो. 
ते आहेत नव्या लव्ह स्टोरीतले व्हायरसच.
अ‍ॅन्टिव्हायरस सापडेल तेव्हा सापडेल; पण हे सारं काय आपण ओढावून घेतो आहोत, याचा विचार या आगामी प्रेम दिनानिमित्त करायला हवा.

1) बिझी, यू नो!
प्रेमात पडतात. पण रोज भेटायला अनेकांना वेळ नाही. फोनवर बोललं की भांडणंच होतं. कारण प्रश्नांची सरबत्ती. त्यातून गैरसमज, भांडणं. ते काही संपत नाही.

2) पझेसिव्ह
त्यानं/ तिनं कुणा मित्र-मैत्रिणींशी बोलूच नये. फक्त आपली मालकी याच भावनेतून नात्याला बांधून घालणारे काच बसतात. त्यातून पझेसिव्हनेस भयंकर त्रास देतो.

3) सोशल मीडिया
सोशल मीडिया खरंच शत्रू होतो प्रेमाचा. सतत एकमेकांच्या टाइमलाइन पाहणं, संशय घेणं, सगळं शेअर करणं, इतरांशी जास्त बोलणं, कुणाला लाइक केलं, कुणाला नाही यावरुन वाद. त्यानं सगळंच बिघडतं.

4) अति बोलणं
खाणंपिणं, बोलणं, काम हे सारं एकमेकांना डिटेल सांगत राहाणं आणि समोरच्याकडून तशी अपेक्षा धरणं हे इतकं वाढलंय की हे सतत शेअर करणंच समस्या बनलं आहे.


5) स्पेसची मागणी
पूर्वीसारखं टिपिकल गुलाबी प्रेम आता नसतेच, सतत स्पेसची मागणी. त्यातून कोण कुणाची स्पेस घालवतं, कोण नाही यावरून प्रेमाचा पार चुराडा होतो.

 

Web Title: Love virous- is it killing your love?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.