तोंडाला कुलूप; कसं कराल योग्य डाएट ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:01 PM2017-09-21T12:01:20+5:302017-09-21T12:02:46+5:30

उपवास करण्याचीही क्रेझ असते, वजन कमी करण्यासाठी सर्रास वाट्टेल ते डाएट केले जातात. पण, त्यानं आपण आपलंच शरीर पोखरतोय हे लक्षात येतं का?

Locks the mouth; How do you know? | तोंडाला कुलूप; कसं कराल योग्य डाएट ?

तोंडाला कुलूप; कसं कराल योग्य डाएट ?

Next
ठळक मुद्दे नवरात्राचे दिवस. अनेकांना या दिवसांत उपवास करायची हुक्की येते. कारण धार्मिकच असतं असं काही नाही; पण हल्ली फॅट लॉस, डिटॉक्स, बॉडीवॉश वगैरे नवनवी नावं वापरून जुन्याच परंपरेचा नव्यानं उपयोग करून घेतला जातो. . गरब्याचा जसा फिटनेससाठी उपयोग केला जातोय, त्यासाठी त्यात झुम्बा नि साल्सा कालवला जातोय तसाच विचार डाएटच्या बाबतीतही करणारे अनेकजण आहेत.

-निशांत महाजन

   नवरात्राचे दिवस. अनेकांना या दिवसांत उपवास करायची हुक्की येते. कारण धार्मिकच असतं असं काही नाही; पण हल्ली फॅट लॉस, डिटॉक्स, बॉडीवॉश वगैरे नवनवी नावं वापरून जुन्याच परंपरेचा नव्यानं उपयोग करून घेतला जातो. गरब्याचा जसा फिटनेससाठी उपयोग केला जातोय, त्यासाठी त्यात झुम्बा नि साल्सा कालवला जातोय तसाच विचार डाएटच्या बाबतीतही करणारे अनेकजण आहेत.
त्यात एक नवीन ट्रेण्ड म्हणजे लिक्विड डाएट. अनेकजण केवळ पाणी किंवा फळांचे रस पिऊन राहतात आणि १० दिवसांत ५ किलो कमी करण्याची स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं वाईट नाही, पण आपले असे डाएटचे प्रयोग आपल्या जिवावर बेतू शकतात याची अनेकांना कल्पनाही नसते. पण फॅड असंच असतं. दोस्त करतात, मैत्रिणी भरीस घालतात या नादानं असे क्रेझी डाएट्स केले जातात, तर यंदा तुम्ही असे काही क्रेझी डाएट्स करणार असाल तर ते सुरू करण्यापूर्वी ही माहिती हाताशी ठेवा.

   ती अर्थात अमेरिकन अभ्यासातली आहे; पण हल्ली अमेरिकेत जे येतं तेच आपल्याकडे खरं मानायची एक रीत झाली आहे, म्हणून तिकडच्या अभ्यासाचा संदर्भही हाताशी असलेला बरा.
खरं तर नवरात्रीचे उपवास आपल्याकडे नक्तभुक्त म्हणजेच एकवेळ जेवून केले जात, अनेकजण विशिष्ट भाज्या आणि धान्यफराळ करत. खरं तर उपाशी राहण्यापेक्षा आहार बदल, पचनाला हलके पदार्थ उपवासाला खाणं अपेक्षित होतं. आपण ते सारं फराळी पदार्थांच्या नावाखाली दडपून टाकलं. आणि स्वीकारलं डाएटच्या नावाखाली भलतंच काही. म्हणून तर अमेरिकेन सरकारनेच अलीकडे एक आकडेवारी जाहीर केली    आणि लोकांना सांगितलं की, या काही भयानक, वाईट सवयी तुमच्या जिवावार उठल्या आहेत. विशेषत: तरुण मुलांसाठी त्या घातक आहेत. त्या सोडा आणि खाण्याच्या चांगल्या सवयी स्वीकारा.

   काय सोडा आणि काय खा, असं जे सांगितलं आहे ते वाचून आपल्याला वाटेल की हा काय आचरटपणा आहे, हे तर आपल्याकडे घरातली म्हातारी, अडाणी माणसंही सांगतात. पण तरीही ते अमेरिकन सरकारला सांगायची वेळ आली आहे. कारण वाढतं वजन, हृदयरोग, गुडघेदुखी, श्रमशक्तीवर परिणाम हे सारं आता तरुणांच्या वाट्याला येणं सुरू झालं आहे. या साऱ्याला आपल्याकडचे तरुणही अपवाद नाहीत. आपण धावत-पळत जे खात सुटतो ते आपल्या आरोग्यावर दीर्घ परिणाम करणारं आहे, हे लक्षात येत नाही.
एक साधं उदाहरण पाहा - अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल रिसर्च यांनी नुकतंच जाहीर केलं की, फ्रेंच फाईज खाणं हे आरोग्याला घातक आहे. त्यावरून त्यांची सोशल मीडियात यथेच्छ टवाळी झाली. लोकांनी टिंगल केली, कुणी म्हणे मरू; पण तेच खाऊ. कुणाला वाटलं की, काहीही अभ्यास करतात आणि सांगतात. सोशल मीडियानं जरी टवाळी केली तरी हा अभ्यास ठाम राहिला आणि सांगत होता की, सतत इतका बटाटा, तेलकट खाणं हे शरीरासाठी अपायकारक आहे.
   

   हे सारं आपणही करतोच. जंक फूडवरून आपल्याकडे उदंड चर्चा रंगतात; मात्र त्यावर गांभीर्यानं कुणी विचार करत नाही. तरुण मुलं तर नाहीच नाही. मात्र आता जागतिक आरोग्य संस्थाही तरुण मुलांना आव्हान करते आहे की, आपल्या खाण्याकडे लक्ष द्या. चुकीच्या सवयी सोडा आणि हेल्दी, आरोग्याला पोषक असं अन्न खा!
   जगभरातल्या तारुण्याविषयी चिंता वाटावी असाच हा विषय आहे. आपल्यालाही ही सारी माहिती असावी आणि पिझ्झा, बर्गर, पॅक्ड फूड, प्रोसेस्ड फूड खात आपण घरी केलेल्या भाजीपोळीला नाकं मुरडत असू तर आपलं काहीतरी चुकतं आहे, हे समजून घेऊन लक्षात ठेवलेलं बरं!

३ वाईट सवयी सोडा,
४ चांगल्या सवयी स्वीकारा!
अमेरिकन अभ्यास तरुण मुलांना सांगतो की, फार अवघड नाही पोषक आहार घेणं. आहाराच्या सवयी बदलणं. त्यासाठी या ३ सवयी सोडा. आणि ४ चांगल्या सवयी स्वीकारा.

तीन वाईट सवयी
१) कोल्ड्रिंक पिणं बंद करा.
२) मीठ कमी खा, खारवलेले पदार्थ कमी खा.
३) प्रोसेस्ड पॅकबंद मासांहार शक्यतो टाळा.

चार चांगल्या सवयी स्वीकारा
१) फळं खा. रोज.
२) भाज्या भरपूर खा.
३) कडधान्य खा.
४) धान्य खा, धान्याचा आहारात समावेश करा.

डाएट करताय?
डाएट करणं चूक नाही; पण आपण ते कसं करतो किंवा खरं तर करू नये त्यासाठी ही काही पथ्यं.

१) आपण डाएट करतोय हे फेसबुकवर जाहीर करायची काहीच गरज नाही. ते न करताही मुकाट्यानं केलं तर कुणी आपल्याला चिडवत नाही.
२) छोटे आहार बदल करा, एकदम मोठे बदल करू नका.
३) एखादा आवडीचा पदार्थ कायमचा बंद करू नका, वाटलं तर घासभर खा.
४) डाएट केलं की लगेच वजन कमी होणं धोक्याचं ते हळूच झालं पाहिजे.
५) फ्रुट डाएट, लिक्विड डाएट, क्रेझी क्रॅश डाएट असे वाट्टेल ते डाएट करू नका.
 

 

Web Title: Locks the mouth; How do you know?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.