किसान मंडी, स्टार्टअपचे दोन स्टार!

By namdeo kumbhar | Published: March 1, 2018 09:42 AM2018-03-01T09:42:27+5:302018-03-01T09:42:27+5:30

एमबीए झालेले दोन तरुण. त्यांनी ठरवलं शेतमालाची ऑनलाइन विक्री हाच आपला व्यवसाय का नाही होऊ शकत? त्यांनी ठेचा खाल्या; पण ऑनलाइन विक्रीचं कामही सुरू केलं..

Kisan Mandi | किसान मंडी, स्टार्टअपचे दोन स्टार!

किसान मंडी, स्टार्टअपचे दोन स्टार!

Next

टमाट्यांचा भाव एवढा कोसळला की शेतातून काढून तो बाजारात नेण्यापेक्षा रस्त्यावर फेकलेला बरा म्हणून शेतकºयांनी टमाटे रस्त्यावर ओतले, सगळीकडे टमाट्यांचा लाल चिखल या अशा बातम्या आपण सर्रास वाचतो. कांदाही शेतकºयाला असाच रडवतो. त्यात शेतमालाला भाव नाही, दलाली जाते, भाडेखर्चसुद्धा निघत नाही, हे सारंही आपण वाचतो, अनुभवतो. विषण्ण होतो.

मात्र दोन तरुणांनी ठरवलं नुस्ती हळहळ करून काही उपयोग नाही, आपण काहीतरी प्रयत्न करून पाहू. त्या दोस्तातला एक दुष्काळग्रस्त मराठवाड्यातून आलेला, दुसरा पुण्याजवळच्या खेड्यातला. श्रीकांत कोठावळे आणि विशाल टाके. दोघंही उच्चशिक्षित. एमबीए झाल्यानंतर नोकरी न करता एक नवा बिझनेस करायचं ठरवलं. कॉलेजमध्ये असल्यापासून श्रीकांतची नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काही जणांशी ओळख होती. तेव्हापासूनच फळं-भाज्या आॅनलाइन विकायचं स्वप्न त्याच्या मनात होतं. २०११ साली त्यानं आॅनलाइन भाज्या विकायला सुरुवात केली. पहाटे ४ वाजता उठून भाज्या आणण्यापासून ते घरोघरी भाज्या डिलिव्हर करेपर्यंत सगळी कामं तो स्वत:च करू लागला. सुरुवातीला ऑनलाइन मिळणाºया फळांवर लोकांचा विश्वास बसेना. त्याला अपेक्षित यशही चटकन नजरेस पडेना. एक लाखापेक्षा अधिकचा तोटाही सहन करावा लागला. घरचेही थोडी कुरकुर करायला लागले; पण तो मागे हटायला तयार नव्हता. तीन महिन्यांनंतर त्यानं पुन्हा एकदा धाडस केलं. यावेळी त्यानं आपल्या मित्रांकडून पैसा उभा केला. कसेबसे सत्तर हजार जमविले. आधीच्या चुकांचा अभ्यास केला. धंद्याला मोठं रूप दिलं. थेट ग्राहकांना माल देण्यापेक्षा मॉल्स, विक्रेते, पादचारी विक्रेते, हॉटेल्स यांना माल पुरवठा करायला सुरुवात केली. दोन वर्षे हे सुरू होतं; पण अपयशाचा विंचू त्याला पुन्हा एकदा डसला. १५ लाख रुपयांचा फटका बसला. हे सारं सांगतानाही श्रीकांत अस्वस्थ होतो. तो सांगतो, ‘धंदा बसणं म्हणजे काय हे तेव्हा कळलं. त्यातच लग्नाचं वय झालेलं होतं. किमान लग्नानंतर तरी पोरगं मार्गी लागेल अशी त्यांची अपेक्षा असते. तेच माझ्याही घरी सुरू होतं. काय करावं त्याला काही सुचत नव्हतं. शेवटी मारुती सपकाळ यांच्याकडे त्यानं ४० हजार रुपये प्रतिमहिना नोकरी करायला सुरुवात केली. दोन वर्षांत अर्धी उधारी चुकती केली. नोकरी होती त्यामुळे लग्नही ठरलं. मात्र त्याच्या डोक्यातला कीडा काही शांत नव्हता. त्यानं अखेर घरी आई-बाबांना न सांगता एक मोठा निर्णय घेतला. पुन्हा त्याच व्यवसायात जायचं. त्यानं ही युक्ती आपल्या बायकोलाही सांगितली. तिनंही साथ दिली. नोकरी करताना विशाल टाकेशी ओळख झाली होतीच. दोघांचं व्यवसायावर आधीच बोलण झालं होतं. मग दोघांनी व्यवसायाला सुरुवात केली. यावेळी श्रीकांत पूर्णपणे तयारीनिशी मैदानात उतरला होता.

आता विशालही सोबत होता. दोघांनी चुका टाळून काम सुरू केलं. सुरुवातीला वाशीच्या मार्केटमधून अवघ्या १६ हजार रुपयांचे आंबे उधारीवर खरेदी केले आणि आपल्या नव्या इनिंगची मुहूर्तमेढ रोवली. यातून त्याला एका दिवसामध्ये चार हजारांचा नफा मिळाला. मग एक गुदाम भाड्यानं घेतलं. हळूहळू सोलापूरमधील सांगोला, पुण्यातील सासवड, अहमदनगर मधलं श्रीगोंदा आणि सांगलीतलं तासगाव येथे कलेक्शन सेंटर्स सुरू केलं. आज त्यांची ‘किसान मंडी’ भारतासह मलेशिया, थायलॅँड, ओमान, कतार, दुबई, इंडोनेशिया अशा देशांत फळं निर्यात करते. ते वॉशिंग्टनमधून सफरचंद आयात करतात.
‘किसान मंडी’ नावानं आज त्यांच्या व्यवसायानं, स्टार्ट अपनं नाव कमावलंय. ३३ हून अधिक जणांच्या हाताला काम मिळालं आहे. एवढ्यावरच दोघं थांबले नाहीत तर त्यांनी इतर तरुणांना व्यावसायिक म्हणून घडवलं. श्रीकांतने स्वत:चा वर्गमित्र सचिन जुगदर याला सांगोल्याचं कलेक्शन सेंटर सुरू करून दिलं, तर सासवडला एका शेतकºयाला स्वत:सोबत घेऊन कलेक्शन सेंटर चालवण्यासाठी मार्गदर्शन केलं.जे स्वप्न पाहिलं ते आता आकार घेताना दिसतं आहे. 

किसान मंडीच्या माध्यमातून छोटे उद्योजक तयार करण्याचा आमचा विचार आहे. भविष्यामध्ये आणखी दहा-पंधरा कलेक्शन सेंटर सुरू करणार आहोत.
- श्रीकांत कोठावळे

भविष्यात आम्ही प्रोसेसिंग युनिट तयार करण्याचा विचार करत आहोत. यातून शेतकºयांच्या प्रत्येक मालाचा योग्य तो उपयोग केला जाईल. आम्ही आमच्या फायद्यापूर्वी शेतकºयांच्या मालाचा विचार अधिक करतो. कारण त्यांची शेतातील मेहनत आमच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे.
-विशाल टाके

किसान मंडी शेतकºयांना खतं, कीटकनाशके पुरवतात. त्यांना शेतीविषयी मार्गदर्शन करतात. फळशेतीविषयी माहिती देतात. श्रीकांत कोठावळे सोबत विशाल टाके, सचिन जुगदर, नागेश कोठावळे हे सारे अवघ्या तिशीतले तरुण किसान मंडीला नव्या बाजारपेठेशी जोडत आहेत.
 

Web Title: Kisan Mandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.