Khadale to Karad It | खटकाळे ते कराड

खटकाळे. सह्याद्रीच्या डोंगररांगांत आणि माणिकडोह धरणाकाठी वसलेलं एक गाव. माझं प्राथमिक शिक्षण पहिली ते दुसरी गावात, तर तिसरी ते चौथी मामांच्या निमिगरी या गावात झालं. माध्यमिक शिक्षण मी जुन्नरला बोर्डिंगमध्ये राहून घेतलं. अनेक अडचणी, समस्या यांना तोंड देत दहावी पास झालो. मुळात अकरावीला कशाला अ‍ॅडमिशन घ्यावं याचा मेळ बसेना. सर्वच सायन्सला जातात म्हणून मी पण सायन्सला जाण्याचा हट्ट धरला. परंतु मला इंग्रजीला मार्क कमी होते. त्यामुळे तुला ते जमणार नाही, असंही सारे सांगत होते. शेवटी सायन्सलाच प्रवेश घेतला. बारावीसुद्धा पास झालो. आता मला तर इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी करायचे नव्हते. मला शेती आणि झाडांची खूप आवड असल्यामुळे अ‍ॅग्रिकल्चरला अ‍ॅडमिशनसाठी फॉर्म भरला. पहिल्या तीन लिस्ट लागल्या परंतु माझा नंबर लागलाच नव्हता. घरचे आता बोलत होते, इकडे बीएस्सीला अ‍ॅडमिशन केलं असतं. आता एक वर्ष वाया जाणार. पण चौथी लिस्ट लागली. माझा नंबर कराड येथील दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, राजमाची येथे लागला. आनंद झालाच.
पैशांची जुळवाजुळव करून आम्ही त्याच रात्री मामाच्या मुलासोबत पुण्याकडे मोटारसायकलवर रवाना झालो. त्यात पाऊस आणि अवसरीच्या घाटात आमची मोटारसायकल बंद पडली. त्यानंतर ढकलत पंक्चर काढून आम्ही रात्री २ वाजता पुण्यात पोहोचलो. कारण मला सकाळी कराडला पोहोचायचं होतं आणि हे मला दुपारी ३ वाजता समजलं होतं. खरंतर मला कसं जायचं तिथवर हे पण नीट माहिती नव्हतं. मामाच्या मुलासोबत पुण्यावरून पहाटे निघून सकाळी आम्ही कराडला पोहोचलो. एसटी स्टँडवर तोंड धुवून मी व माझ्या अ‍ॅडमिशनला आलेले सांगलीचे चुलत चुलते आम्ही कॉलेजला जाऊन अँडमिशन केलं.
कॉलेज आणि हॉस्टेल लाइफ सुरू झालं. ओळखीचं कोणीच नव्हतं. त्यामुळे काही दिवस फक्त वाचन आणि मोबाइल यांच्यात गेलं. हॉस्टेलमध्ये जुन्नरचाच अक्षय आणि धुळ्याचा देवीलाल हे मित्र झाले. एकामेकांबद्दल प्रचंड आपुलकी आहे. माझे आवडते माणिकसर यांच्यामुळे खूप गोष्टी शिकलो. नुस्तं कराडच पाहिलं नाही, तर सातारा शहर, कोरेगाव, पाटण, कराड यांच्या ग्रामीण भागातही फिरलो. तेथील संस्कृती, राहणीमान, जीवनमान, चालीरीती समजून घेतल्या. माणसं जोडत होतो. प्रेमाची. वसतिगृहात राहत असताना तेथील अनेक समस्यांबाबत संघर्ष केला. या दिवसांत मी खूप घडलो.
आज मी कोल्हापूरमधील गव्हर्नमेंट कॉलेजला एमएस्सी करतो आहे. अनेकदा साध्या राहणीमुळे काही लोक नावंही ठेवत. पण त्याचं दु:ख वाटलं नाही. आजही मी साधाच राहतो. कारण मला वाटतं की साधी राहणी आहे, त्यात समाधान आहे. माझ्यासोबत मी जोडलेली जिवाभावाची माणसं आहेत. आत्मविश्वासही आहे. या प्रवासानं मला हेच शिकवलंय..

- नवनाथ हिराबाई गोपाळ मोरे 
मु. खटकाळे, पो. निमिगरी,
ता. जुन्नर, जि. पुणे


Web Title: Khadale to Karad It
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.