चिन्मय लेले

जे जग आपल्याला मोजतच नाही, आपल्या कर्तृत्वाला कर्तृत्वही समजत नाही, ज्या जगाच्या लेखी आपलं अस्तित्वच नाही, त्या जगातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्यावर कसं वाटत असेल?
-विचारा देवेंद्र झाझडिया आणि सरदार सिंगला!
-अर्थात बहुसंख्यांना आता असा प्रश्न पडला असेल की हे दोघं कोण?
त्यांना कुठला सर्वोच्च पुरस्कार मिळाला, कशाबद्दल मिळाला? आणि त्यांनाच का मिळाला बाकी कुणी नव्हतं का?
हे प्रश्न हीच तर आपल्या समाजात खरी शोकांतिका आहे गुणवत्तेची आणि आपल्या मानसिकतचेही! आणि हा दोष गुणी माणसांचा नाही, तर समाज म्हणून आपल्या बेफिकीरीचा आणि बेदरकार वृत्तीचा आहे!
झालं असं की, गेल्या आठवड्यात पॅराअ‍ॅथलिट आॅलिम्पिकपटू देवेंद्र झाझडिया आणि हॉकीपटू सरदार सिंग यांना राष्टÑपतींच्या हस्ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला!
देशाच्या क्रीडा क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करणाºया खेळाडूंना या पुरस्कारानं नावाजलं जातं. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणजे देशाच्या पायी सर्वोच्च क्रीडासेवा रुजू केल्याचं प्रमाणपत्रच जणू! तो पुरस्कार एका पॅराअ‍ॅथलिटला मिळणं आणि सर्वार्थानं दुर्लक्षित हॉकी आणि हॉकीपटूस मिळणं, ही खरंतर अत्यंत भूषणावह गोष्ट आहे आणि तितकीच बोलकीही, सूचकही!
आजही आपल्या समाजात एक मोठं ग्लास सिलिंग आहे. म्हणजे काय तर समाजच ठरवून टाकतो अनेकांच्या क्षमतांचं स्वातंत्र्य. आकाशात उंच रेषा मारल्या जातात, समाज सांगतो ही तुमची सीमा, उडा पण इथवरच! यापलिकडे उडण्याचं बळ अनेकांच्या पखांत नाही असं ठरवून टाकण्याचा बेदरकारपणा समाजच करतो. पण काचेच्या दृश्य अदृश्य सीमारेषा तोडूनफोडून आपली स्वप्नं पूर्ण करणं ज्यांना जमतं, त्या साºयांना बळ देणारी अशी ही घटना आहे.
ज्या देशात क्रिकेटपलीकडे अन्य खेळांची आणि त्यातल्या गुणवत्तेची नोंद घेणं आता कुठं सुरू झालं आहे, त्या देशात दिव्यांग खेळाडू, त्यांची स्वप्नं, गुणवत्ता हे सारं कोण मोजणार? त्यांना खेळाडू असं तरी मानतो का आपला समाज?
देवेंद्रचंच उदाहरण घ्या, त्यानं २००४ आणि २०१६ या दोन्ही वर्षी पॅराआॅलिम्पिक स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक आणलं. पण त्या पदकाचं काय मोल, काय कौतुक झालं आपल्या समाजात?
-फारच जेमतेम.
तेच हॉकीचंही!
मात्र हा सारा दुर्लक्षित भूतकाळ मागे सोडून एक नवीन उमेद निर्माण व्हावी, देशात क्रीडासंस्कृतीचं वातावरण खºया अर्थानं रुजावं अशी आशा वाटावी म्हणून यंदा देण्यात आलेल्या या खेलरत्न पुरस्कारांकडे पाहता येऊ शकतेल.
हे पुरस्कार फक्त खेळापुरते मर्यादित नाहीत, बुरसटलेल्या मानसिकतेपलीकडे जाऊन गुणवत्तेचा सन्मान करणं आपल्यालाही जमू शकतं हे आपल्याच समाजाला सांगणारी ही घटना आहे.
म्हणून या पुरस्काराच्या निमित्तानं आपणही देवेंद्र आणि सरदार सिंगला भेटायला हवं.
त्यांच्याकडे असलेल्या दुर्दुम इच्छाशक्तीचं आणि मेहनतीचं इंजेक्शन टोचून घ्यावं जमल्यास स्वत:लाही!
आणि मुख्य म्हणजे कुणाच्याही क्षमतांवर प्रश्नचिन्ह उभे करणारी आपली नजरही त्यातून बदलता आली तर बदलून घ्यावी.