- सतीश डोंगरे


नाशिकचा एक तरुण
आंतरराष्ट्रीय स्तरावर
ट्रायथलॉन नावाचं आव्हान पेलतो
आणि जिंकतो एक
मानाचा किताब.
गंगाघाटावरच्या तरुणानं
कसं पेललं हे समुद्राचं आव्हान?


अम्मार मियाजी.
त्याचं नाव. नाशिकचा. नुकतीच त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावरची ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण करत आयर्न मॅन या किताबावर नाव कोरलं. 
या स्पर्धात क्वालिफाय करणंच अवघड, ती पूर्ण करणं हे दिव्यच.
मात्र अम्मारने ते स्वप्न पूर्ण करून दाखवलं. त्याला गाठलंच नाशकात आणि विचारलं की, आयर्न मॅन होण्याचं हे स्वप्न पाहिलं कसं, आकार कसा दिला त्याला?
त्याच्याशी गप्पा सुरू झाल्या आणि कळलं की, शाळेत असल्यापासून तो टेबल टेनिस खेळत होता. बारावीपर्यंत अनेक स्पर्धांत सहभागी व्हायचा. त्यानंतर मात्र त्यानं फार्म हाउसच्या बिझनेसकडे लक्ष दिलं. आणि कामाला लागला. पदवीचं शिक्षण बाहेरून सुरू झालं. मात्र व्यवसाय सांभाळताना त्याला फिटनेसकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं. तो नियमित सायकलिंग करायचा. आज एक किलोमीटर, उद्या दोन किलोमीटर असं करत करत तो दररोज नाशिक ते कसारा व कसारा ते नाशिक असे जवळपास १५० किलोमीटरचे अंतर सहज पार करू लागला. दरम्यान, वयाच्या २४ व्या वर्षी त्याचा विवाह झाला. मात्र व्यवसाय आणि कुटुंबाच्या जबाबदारीसह व्यायाम, सायकलिंग, रनिंग आणि पुढे स्विमिंग हे सारं तो नेमानं करतच होता.
सायकलिंगच्या वेडाविषयी विचारलं तर तो सांगतो, सायकलिंगमध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे वेध मला लागले होते. त्याची सुरुवात नाशिक सायकलिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेतून झाली. १५० किलोमीटरचं अंतर त्यानं नियोजित वेळेत पूर्ण केलं. पुढे त्याने पुणे येथे आयोजित केलेल्या २०० किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर मग चिखली ते मुंबई ही ३०० किलोमीटर आणि मुंबई ते धुळे ही ६०० किलोमीटरची सायकलिंग स्पर्धाही नियोजित वेळेत पूर्ण केली. त्याकाळात हे आयर्न मॅन स्पर्धेचं स्वप्न समोर दिसू लागलं. पण ते सोपं नव्हतं..’
मात्र त्या स्पर्धेच्या दिशेनं एक पाऊल म्हणून अम्मारनं पुणे-बंगळुरू-पुणे ही एक हजार किलोमीटरची स्पर्धा ५८ तासांत पूर्ण केली. त्याचबरोबर पुणे ते गोवा व्हाया सातारा, महाबळेश्वर, कित्तुर, बेळगाव, चोरला घाट असा ६८० किलोमीटरचा अतिशय खडतर समजला जाणारा प्रवास केवळ ३२ तासांतच पूर्ण केला. आणि त्याला खात्री वाटू लागली की, आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपण चांगली कामगिरी करू शकू. 
म्हणून मग त्यानं आॅस्ट्रीया येथे आयोजित केलेल्या १५०० किलोमीटरच्या सायकलिंग स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे यात आतापर्यंत एकाही भारतीय सायकलपटूनं सहभाग घेतलेला नव्हता. त्यामुळे अम्मार मियाजी हा या स्पर्धेत भाग घेणारा पहिलाच भारतीय सायकलपटू ठरला आहे. ही स्पर्धाही त्यानं नियोजित वेळेत पूर्ण केली. 
पण केवळ सायकलिंग उत्तम येतं एवढ्यानंच आर्यन मॅनचं स्वप्न पूर्ण होणार नव्हतं. सायकलिंगबरोबरच पोहणं आणि धावणं यातही निष्णात असणं गरजेचं होतं. ‘आयर्न मॅन’ किताबासाठी घेण्यात येणारी ‘ट्रायथलॉन स्पर्धा’ खुल्या समुद्रात पोहण्याचं आणि वेगात धावण्याचं आव्हानही देतेच. पण प्रश्न होता नाशिकसारख्या शहरात उपलब्ध सुविधांचा. 
त्याचं काय केलं असं विचारलं तर अम्मार म्हणतो की, ‘जर तुम्हाला ‘आयर्न मॅन’ व्हायचं असेल तर सोयीसुविधांच्या नावे बोटं मोडण्यात अर्थ नाही. आहे त्या परिस्थितीतून जो मार्ग काढतो तोच खरा ‘आयर्न मॅन’ असतो.’ अम्मार स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा सराव करीत होता. मात्र तरणतलावात अन् खुल्या समुद्रात पोहणं यात प्रचंड अंतर असतं. खुल्या समुद्रातील लाटांवर स्वार होत नियोजित वेळेत लक्ष्य गाठणं हे काही तसं सोपं नव्हतंच.
माहितीसाठी त्यानं इंटरनेटचा आधार घेतला. स्पर्धेबाबतची इत्थंभूत माहिती जाणून घेत सराव करण्यास सुरुवात केली. आपल्या लाइफस्टाइलमध्येच बदल केला. त्यानुसार दिवसाआड १०० किलोमीटर सायकलिंग, ४ किलोमीटर पोहणं आणि १५ किलोमीटर धावणं असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. सहा महिने सतत तो हा सराव करत होता. स्पर्धेसाठी स्वत:ला पूर्णत: तयार केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत आयोजित केलेल्या ‘ट्रायथलॉन’ स्पर्धेत तो सहभागी झाला. जगभरातील २५ देशांमधील तब्बल २१०० अ‍ॅथलेटिक्सनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात भारतातील १४ अ‍ॅथलेटिक्स होते.
४ एप्रिल रोजी झालेल्या या स्पर्धेसाठी जेमतेम दोन दिवस अगोदरच अम्मार दक्षिण आफ्रिकेत पोहोचला. त्यामुळे त्याला खुल्या समुद्रात हवा तसा सराव करता आला नाही. मात्र जिद्द होतीच मनात. स्विमिंग पूल ते थेट खुल्या समुद्रात पोहण्याचं त्याच्यासमोर आव्हान होतं. ३.८ किलोमीटरचे समुद्रातील अंतर त्याला २ तास २० मिनिटांत पूर्ण करायचं होतं. विशेष म्हणजे, २१०० स्पर्धक दर सात सेकंदाच्या अंतराने समुद्रात उतरणार असल्याने त्यांच्याशी स्पर्धा होतीच. अम्मारने हे अंतर केवळ १ तास ४५ मिनिटांतच पूर्ण केलं. त्यानंतर लगेचच त्याला सायकलिंग करत १० तासांत १८० किलोमीटर अंतर कापायचं होतं. सायकलिंगमध्ये निष्णात असलेल्या अम्मारने हे अंतर केवळ ६ तास ३० मिनिटांत पूर्ण केलं. अखेरच्या टप्प्यात त्याला ४२ किलोमीटर धावायचं होतं. हे अंतर त्याने ५ तास ३० मिनिटांत पूर्ण केलं. एकूण १६ तास ४५ मिनिटांची ही स्पर्धा अम्मारने १५ तास ६ मिनिटांत पूर्ण करून ‘आयर्न मॅन’चा किताब पटकावलाच.
केवळ जिद्द आणि ध्यास या दोन गोष्टींच्या साथीनं एक मोठं स्वप्न त्यानं साकार केलं!(सतीश लोकमतच्या नाशिक आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)

महिला-पुरुष एकाच ट्रॅकवर
या स्पर्धेत भाग घेणाऱ्या अ‍ॅथलेटिक्सचा शारीरिक क्षमतांचा जबरदस्त कस लागतो. खुल्या समुद्रात पोहणं हे या स्पर्धेतील सर्वाधिक अवघड आव्हान. वेट सूट परिधान करून समुद्रात उडी घेतल्यानंतर ते अंतर पूर्ण करून बाहेर येताच लगेच तो वेट सूट फाडून जर्सीमध्ये सायकलवर स्वार व्हावं लागतं. आणि ते पूर्ण करताच लगेच काही सेकंदांमध्ये शूज बदलावे लागतात आणि धावणं सुरू होतं. 
सोपं कसं असेल ते, कल्पना करा!
जगभरातून महिला आणि पुरुष स्पर्धक यांत सहभागी होतात आणि जिवाच्या आकांतानं स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.