मॅकदादा

By अोंकार करंबेळकर | Published: April 5, 2018 07:53 AM2018-04-05T07:53:12+5:302018-04-05T09:51:06+5:30

लहानपणी त्याला निसर्गात भटकायला आवडायचं, प्राणी आवडायचे. आता तेच सारं तो छोट्या दोस्तांसाठी करतोय..

Inspirational story of Makarand Ketkar and his unique carrier | मॅकदादा

मॅकदादा

Next

ओंकार करंबेळकर

अमुक टक्के पडले की या शाखेला जायचं, तमुक टक्के पडले की तमक्या अभ्यासक्रमाला जायचं. आवड-निवड काहीही असली तरी एक ठरावीक नोकरी असलीच पाहिजे, त्या नोकरीनेच स्थैर्य येईल असा साचेबद्ध विचार सर्वत्र केला जातो. त्यात एखाद्या मुलाने नवा विचार मांडलाच तर तो हाणून पाडला जातो किंवा त्याच्यामागे उभं राहायला फारसं कोणी तयार होत नाही. मकरंद केतकरनं पण स्वत:बद्दल असाच वेगळा विचार केला. एखाद्या सॉफ्टवेअरसारखी त्याच्या अंगा-डोक्यात झाडांची, प्राण्यांची आवड सेट झाली होती. तो त्याला डिफॉल्ट सेंटिंग म्हणतो.

मकरंदचा जन्म, शिक्षण आणि पुढची काही वर्षे मुंबई आणि ठाण्यासारख्या मोठ्या शहरातच गेली. इतर पोरांसारखं बुद्धिबळ, पत्ते, क्रिकेट असं खेळायचं सोडून या पठ्ठ्याला आवड लागली ती झाडांची, प्राणी-पक्ष्यांची. तोल सावरता येतोय हे लक्षात आल्यावर त्यानं झाडांवर चढून पक्ष्यांची घरटी पाहायला सुरुवात केली. त्याचं निरीक्षण करणं हाच त्याचा छंद झाला. इतर लहान मुलं-मुली कुत्रे- मांजरांना हात लावायला घाबरायची तेव्हा हा त्यांना अगदी मायेनं जवळ घ्यायचा. खेळण्यांच्या बाबतीतही त्याची पहिली पसंती प्राण्यांच्या प्रतिकृतींना असे. शाळा सुटल्यावर मासुंदा तलावात मासे पकडणं टीव्हीवर प्राण्यांच्या डॉक्युमेंटरीसुद्धा पाहात बसणं त्याला आवडायचं, अभ्यासातही बायोलॉजी म्हटलं की त्याचं डोकं वेगानं चालू लागायचं. थोडक्यात, त्याच्या लक्षात आलं की आपलं मन प्राणिपक्षी- झाडांच्याबाबतीत जोडलं गेलेलं आहे.


या सगळ्यावर आईबाबांची काय प्रतिक्रिया होती असं विचारल्यावर तो म्हणतो, 'तसं पाहिलं तर माझे आई-वडील हे तत्कालीन मध्यमवर्गीय दाम्पत्याप्रमाणेच नोकरी, स्थैर्य, सणवार यामध्ये रमणारे होते. त्यांना माझ्या आवडीचं निश्चितच कौतुक होतं. मात्र त्यांचा एक मोठा प्रश्न होता, 'भविष्यात याचा काय उपयोग आहे?' माझं कुतूहल शमवण्यासाठी पुस्तकं आणून देणं, घरात पोपट, मासे वगैरे पाळू देणे इ. त्यांना शक्य होतील तितके उपाय त्यांनी करून पाहिले. मात्र या कुतूहलाला दिशा देऊ शकेल अशी जाणती व्यक्ती तेव्हा आयुष्यात नव्हती.’


दहावीची परीक्षा झाल्यावर त्यानं कॉमर्स शाखेला प्रवेश घेतला आणि तो अक्षरश: सुटलाच. डोंगरभटक्या, ट्रेकर्सचे ग्रुप हाताशी लागले आणि त्याची निसर्गभ्रमंतीची गाडी वेगानं पळायला लागली. जे जे नवं दिसेल ते डोळ्यात, डोक्यात साठवायचं एवढा एककलमी कार्यक्रम सुरु झाला. हे सगळं सुरू असताना करिअर वगैरे काय करायचं असे प्रश्न त्याच्या पाच वर्षांच्या कॉलेज जीवनात डोक्यात आलेच नाहीत. मित्र म्हणताहेत म्हणून त्यानं आयटा हा पर्यटनाशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केला. एका आंतरराष्ट्रीय पर्यटन कंपनीत तो नोकरीला लागला. नोकरी लागली. मकरंदनंही इथं सलग सहा वर्षं नोकरी केली. लग्नही ठरलं. सारं तसं चारचौघांसारखं सुरू झालं.
मकरंदचा मनस्वी स्वभाव मात्र त्याला गप्प बसू देत नव्हता. लग्नाच्या केवळ आठ दिवस आधी पठ्ठ्यानं नोकरी सोडून दिली. गदारोळ झाला. लग्नानंतर नवीन नोकरी शोधण्याची धडपडही सुरू झाली. लवकरच त्याला पुण्यात नोकरी लागली आणि तो पुण्यात राहायला गेला. एक-दोन नोकऱ्या झाल्यानंतर जंगलांमध्ये सफारी, सहली आयोजित करणाºया एका कंपनीत त्याला नोकरी मिळाली. मकरंदला सर्वाधिक गती याच विषयात होती. त्यामुळं या नोकरीचा पर्याय मोठ्या आनंदाने स्वीकारला.


इथून त्याच्या वेगळ्या प्रवासाची सुरुवात झाली. २०१३ पासून तो मुलांना निसर्ग ओळख करून देण्याची शिबिरं आयोजित करतो. यामध्ये निसर्गाबद्दल कुतूहल असणारी अनेक मुलं त्याला भेटतात. त्यातल्या दोन मुलांबद्दल तो आवर्जून सांगतो. २०१४ साली शुभंकर देशपांडे आणि तनय देवधर ही शाळकरी मुलं त्याला या शिबिरात भेटली. शुभंकरला सापाबद्दल जबरदस्त आकर्षण आणि कुतूहल होतं. शिबिरानंतर त्याच्याशी झालेल्या संवादामुळे याची आवड सापामध्येच असल्याचं मकरंदच्या लक्षात आलं; पण शुभंकरचे आई-वडिल मात्र या आवडीवर काळजीत पडले होते. पण, त्यांच्याशी बोलणं झाल्यावर मुलाच्या आवडीप्रमाणे करिअर करणं आवश्यक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आता शुभंकर बारावीत आहे. तनयचा प्रकार यापेक्षाही वेगळा होता. तो जन्माला आला होता तोच मुळी साप-पालींची आवड घेऊन. या त्याच्या असल्या विचित्र आवडीमुळे तो शाळेत त्याची थट्टा होऊ लागली, त्याच्या आईबाबांनाही या असल्या आवडीमुळे चिंता वाटू लागली; पण तनय या सगळ्यांपुढे गेला होता. वन्यजीव संशोधन संस्थेतर्फे किमान दहावी पास असणाºया लोकांना बेसिक कोर्स इन हर्पेटोलॉजी हा सरपटणाºया प्राण्यांची ओळख करून देण्याचा कोर्स घेतला जातो. पण अजून शाळा शिकत असणाºया तनयने हा अभ्यासक्रम प्रत्येक लेक्चरला बसून पूर्ण केला आणि त्यानं सर्टिफिकेटही मिळवलं. मग मात्र त्याचं शाळेत चांगलंच कौतुक झालं.


गेली सहा-सात वर्षे हे निसर्गशिबिरं भरवणं, भ्रमंती सुरू असताना तनय, शुभंकरसारखी अनेक मुलं त्याला भेटतात. मुलांनाही तो आवडतो. आता तो त्यांचा निसर्गात भटकायला नेणारा मॅकदादा झाला आहे.


मकरंद म्हणतो, 'जेव्हा तुमची पॅशन हेच तुमचं प्रोफेशन होतं, तेव्हा तुम्हाला काम नाकारायची संधीच मिळत नाही. कामाचा कंटाळा, थकवा, टाळाटाळ आदी कारणांमुळे कामाच्या ठिकाणी होणारी मानहानी तुमच्या वाट्याला येत नाही. कदाचित सुरुवातीला अडचणी येतील, पण तुमच्या ध्येयाचा चिकाटीने पाठलाग करून यश मिळालेल्या समाधानाची तुलना कशाशीच होऊ शकणार नाही. तुमच्यावर होणाºया टीकेला 'रिझल्ट' हेच खणखणीत उत्तर असेल.


(लेखक लोकमत ऑनलाइनमध्ये उपसंपादक आहे.)
onkark2@gmail.com 

 

Web Title: Inspirational story of Makarand Ketkar and his unique carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.