Industy 4.0, a new revolution that breaks career | Industy 4.0, करिअर उलटपालटं करणारी एक नवी क्रांती
Industy 4.0, करिअर उलटपालटं करणारी एक नवी क्रांती

- भूषण केळकर

अगदी अलीकडेपर्यंत आपण कॅमेऱ्याचे रोल ‘धुवायला’ द्यायचो.. ते संपलं. पीसीओ वरून फोन करायचो...ते बंद झालं. तुम्ही कधी विचार केला का, की जे कॅमेºयाचे रोल धुवायचे, पीसीओ चालवायचे, त्यांची कामं अशी एकाएकी संपूनच गेल्यावर त्यांचं काय झालं असेल?
आता तर कोर्टात केस लढवण्यासाठी ब्रीफ्स तयार करायची असो, किचकट ऑपरेशन करायचं असो, शॉप प्लोअरवर नवी गाडी असेम्बल करायची असो किंव टॅक्स रिटर्न फाईल करायचं असो, कालकालपर्यंत माणसांसाठी असलेली अशी एकेक कामं आता यंत्रं आपल्या ताब्यात घेऊ लागली आहेत.
जग किती वेगाने बदलतं आहे आणि माणसांसाठीची कामं किती पटापट नष्ट होऊ / बदलू लागली आहेत, याचा विचार केलात का तुम्ही कधी?करा.- कारण हे बदल आता तुमचं करिअरही पार उलटंपाल़टं करायला निघाले आहेत.हा विचार करायचा तर त्यासाठी तुम्हाला मदत हवी. मुळात ही भानगड काय आहे, हे कुणीतरी समजून सांगायला हवं.
- त्यासाठीच ही खास जागा आहे.
या लेखमालेचं नाव आहे -  'Industy 4.0' ‘इंडस्ट्री फोर पॉईंट ओ’म्हणजे काय?
सोप्या शब्दात सांगायचं तर आधुनिक यंत्र-तंत्र युगाचा चौथा टप्पा ज्यात आता जग प्रवेश करतं आहे. चाकाचा शोध, वाफेचा शोध, आणि यंत्रयुगाच्या उत्तरार्धात उदयाला आलेली संगणक क्रांती- हे झाले पहीले तीन टप्पे. ( त्याबद्दल तपशीलाने आपण पाहूच नंतर)
आणि आता त्यापुढचा चौथा टप्पा. 'Industry 4.0' 
जागतिकीकरण, प्रचंड स्पर्धा, जगाच्या एका भागातील बदलांचा दुसऱ्या अत्यंत दूर असणाºया भागावर होणारा परिणाम आणि या सगळ्याचाच वेग ही या युगाची लक्षणिय वैशिष्ट्य.
या Industy 4.0' पण भाग झालेलोच आहोत; त्यामधे आपण आपलं करिअर नीट विचार करुन, जाणीवपूर्वक फुलवायचं कसं याचा विचार आपण या लेखमालेत करणार आहोत.
- ते आवश्यक का आहे त्याची दोन उदाहरणं तुम्हाला देतो. पहिलं म्हणजे एक आंतरराष्ट्रीय अहवाल असं सांगतो की आता जी मुलं-मुली नववी-दहावीमधे आहेत, त्यांनी विचारपूर्वक करिअर आखलं नाही तर ही मुलं ज्या पदवी/ पदव्युत्तर शिक्षणासाठी शाळा/ कॉलेज करतील, त्या नोकऱ्यांपैकी ६०% नोकऱ्या नजीकच्या काळात नष्ट होणार आहेत!
दुसरं- अगदी आजचा म्हणजे ४ जानेवारी २०१८ चा अहवाल असं सांगतो की बव्हंशी कंपन्या आणि तब्बल ९७% आयटी कंपन्या असं म्हणत आहेत की त्यांच्या मनुष्यबळाला  re-training/re-skilling आवश्यक आहे!
मार्शल गोल्डस्मिथ याचं एक वाक्य फार फेमस आहे.What got you here, will not take you there! मला वाटतं की आता शाळा/ कॉलेजमधे असणाºया विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनीही हे समजणे जरुरी आहे की आतापर्यंत ज्या गृहीतकांवर आपण यशस्वी झालोय ते यापुढे पुरेसे ठरणार नाहीत.
पूर्वी बहुतांश क्षेत्रात ३-४ वर्षाची पदवी केली की पुढील ३० वर्षे त्यात नोकरी करणे शक्य होते. ते आता झपाट्यानं बदलतय 2 punch and 1 lunch म्हणजे कामावर आल्यावर ‘पंच’, कामावरुन निघतानाचा ‘पंच’ आणि या दोन्ही मधला ‘लंच’ आता सरळधोपट मार्ग सुद्धा वेगानं बदलतोय. किंबहुना यापुढील करिअर तुम्हाला मोबदला देईल तो ‘वेळेचा आणि माहितीचा नसेल तर ‘कौशल्य आणि उत्पादकतेचा’ असेल.
करिअर ठरवताना, घडवताना आपल्याला या  Industy 4.0' चेच नव्हे तर अनेक बदलते आयाम लक्षात घ्यावे लागतील. तू मोठेपणी ‘कोण होणार’ यापेक्षा मला वाटतं की तू मोठेपणी ‘कसा’ होणार आणि त्याहीपुढे जाऊन ‘का’ होणार हे प्रश्न अधिक महत्वाचे ठरणार आहेत.
करिअरसाठी शाळा किंवा विद्यापीठ यावर संपूर्ण: अवलंबून राहणे हे माझ्या दृष्टीने आत्मघातक ठरणार आहे. शाळा- कॉलेज- विद्यापीठ हे गणिती भाषेत बोलायचं तर आवश्यक आहे पण पुरेसे नाही necessary but not sufficient !!
आणि म्हणूनच, जी मुलं-मुली आता आठवीत किंवा त्यापुढील विद्यार्थीदशेत आहेत, त्यांनी नेमकं काय करायला हवं, स्वयंअध्ययन- लवचिकता आणि सातत्यपूर्ण बहुआयामी डिजिटल शिक्षण कसे घ्यावे, याची पायाभरणी करण्याबद्दल आपण हा संवाद साधू.
शास्त्र, विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवस्थापन, वैद्यकीय इत्यादि अनेक शाखा-उपशाखा; त्याचबरोबर भारत व जगातील बदल, नोकरी व स्वयंरोजगार- या दोन्हीमधील बदलती व्यापारातील व बाजारातील प्रारुपे या सर्वांसाठी आपण आतापासून काय तयारी करायला हवी ते पाहू.
नाहीतर होईल काय की, आपण गृहीत धरू खेळपट्टी संथ आहे आणि आपली तयारी ‘टेस्ट मॅच’ ची चालू आहे; पण जगाची आणि उद्याची अपेक्षा ही ‘जलद खेळपट्टी’ आणि ‘ टी-२०’ ची आहे!
आता, हे कसं परवडेल?


Web Title: Industy 4.0, a new revolution that breaks career
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.