किती भास मारतात..सतत शो-आॅफ करतात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 06:33 PM2017-11-08T18:33:50+5:302017-11-09T11:03:23+5:30

प्रत्येकालाच वाटतं की, ती अमकी, तो ढमका काय भास मारतो. त्याला त्याच्या अमक्या, तमक्या गोष्टीचा गर्व आहे. सगळं कसं नीट आहे त्यांच्या आयुष्यात, वेळ आहे.

How many words do you mean? True show-offs | किती भास मारतात..सतत शो-आॅफ करतात

किती भास मारतात..सतत शो-आॅफ करतात

Next

- प्राची पाठक

काहीजण फार भास मारतात,
सतत शो-आॅफ करतात
असं आपल्याला वाटतं.
म्हणजे खरंच ते भास मारत असतात, की
आपल्यालाच तसं वाटतं?
का वाटतं?
आपण मारतो का कधी भास?
कशासाठी मारतो?
प्रत्येकालाच वाटतं की, ती अमकी, तो ढमका काय भास मारतो. त्याला त्याच्या अमक्या, तमक्या गोष्टीचा गर्व आहे. सगळं कसं नीट आहे त्यांच्या आयुष्यात, वेळ आहे. म्हणून भास मारत फिरतात. याच्या त्याच्या सोबत फोटो काढ. ते सोशल साइटवर टाक. कुठे फिरायला जा, चांगलंचुंगलं खा, महागड्या वस्तू विकत घ्या आणि त्याच्या जाहिराती करत फिरा. थोडं काही यश मिळालं तरी एकदम हरबºयाच्या झाडावर बसतात. सगळ्यांना तेच सांगत सुटतात जणू, दुसरे एकदम फालतू आणि हेच कोणी ग्रेट.
हे असं येतं की नाही आपल्याही मनात. येतंच.
बरेचदा ब-याच लोकांना हे अनेकांबद्दल सतत वाटत असतं. पण हे असं आपल्याला का वाटतं? म्हणजे समोरची व्यक्ती भास मारतेय, असंच सतत आपल्याला का वाटत असावं? आपण का ठरवतो की ते भास मारताहेत हेदेखील जरा तपासून पहायला हवं. कदाचित कोणी अगदी सरळ आणि फॅक्ट म्हणून एखादी गोष्ट सांगत असेल. पण आपण त्याला भास मारणं या एकाच शिक्क्यानं झोडपत बसतो. आपल्याला असं का करावंसं वाटतं तेही बघितलं पाहिजे.
म्हणून या शो-आॅफ करण्याबद्दल काही जाणून, समजून घ्यायला हवं.
समजा आपण नवीन वर्ष सुरू होताना जाहीर करतो की, ‘मी ना आजपासून व्यायाम करणार.’
म्हणजे काहीतरी एक दिवस ठरवून आपण मनात पक्कं करतो, आजपासून हे करणार. आजपासून ते बदलणार. आता असं वागणं बंद. आता ते आपण मनाशीच ठेवलं तर काहीच प्रश्न नसतो. पण अगदी घरात जरी कुणाला सांगितलं तरी ते काय म्हणणार, ‘या, तुझ्याच्यानं काय होतेय?’, ‘नुसतीच बोलाचीच कढी’ , ‘आरंभशूर’, ‘बोलेल तो करेल काय?’, ‘फक्त बोलून भास मारणं. पाहिलेय आजवरचे सगळे प्लॅन्स’ असं बरंच काही बोलून आपलं पार खच्चीकरण होऊन जातं.
मग लोक सांगतात, काय असेल ते सांगत जाऊ नका. आधी करा आणि मग बोला. मुद्दा म्हणून बरोबर असला तरी, काही करणं ही गोष्ट गुप्तपणे करायची गोष्ट आहे, अशी सवय लागते. तिच्याबद्दल मनमोकळे बोललं तर कुणाची नाट लागेल. कोणाची नजर लागेल, कामात अडथळे येतील असंच ते घेतलं जातं. आपण व्यक्त होणे मोजून-मापून-चोरून-लिमिटेड करून टाकतो मग. आपण काहीतरी धडपड करतोय आणि त्याला जशी नजर लागू शकते, हे आपल्या मनात येतं. पण तशीच कोणाची खरोखर चांगली मदत होईल, काही टिप्स मिळतील, हे मात्र आपण लक्षात घेत नाही. ‘फार कुठे बोलू नकोस’, अशीच आपली संवादाची स्टाइल होऊन जाते मग.
‘फार कुठे बोलू नकोस स्वत:बद्दल, आपल्या चांगल्याबद्दल’ याच वातावरणात वाढलेल्या सर्वांना एखाद्यानं त्याच्या त्याच्या आयुष्यातलं काही बरं घडलेलं मांडलं तर आपण ‘भास मारणं’ या अर्थीच आधी घेतो.
‘मी आज अमुक सिनेमा बघितला’, असंही कोणाचं एक्प्रेशन असेल तर काय भास मारतोय असं इतरांना वाटू शकतं. जणू काही यालाच मिळाला सिनेमा बघायला. वेळ दिसतोय भरपूर. आम्हीही बघतो सिनेमे; पण असं दाखवत नाही. याला कसा वेळ मिळाला आणि नेहमी असे महागडे सिनेमे कसे बघतो, शोधलं पाहिजे. सारखा भास मारायचा, हे केलं, ते केलं आणि जगावेगळं कोणी आहोत ते भासवायचं. असं सारं आपल्याच मनात सुरू होतं.
खरं तर मुद्दा किती छोटासा असतो. कोणी सहजच सांगतं, मी अमुक सिनेमा बघितला. पण तो अनेक अर्थांनी घेतला जाऊ शकतो. कदाचित ती एक सहजच सांगितलेली प्लेन फॅक्ट असू शकते की! पण ती आपण भास मारणं या अर्थी घेतो. कधी कधी अजून वेगळंही होतं. सिनेमा बघायला जायचंय असं नुसतं म्हणूनदेखील भास मारतोय असा शिक्का बसू शकतो. म्हणजे समोरचा काहीतरी करतोय आणि त्याला आपण कसं बघतो, का बघतो, या अर्थी हे भास मारणं लक्षात घ्यावं लागतं.
अर्थात हे भास मारणं, तसं इतरांना वाटणं आणि त्यामागची कारणं बरीच आहेत, त्याविषयी पुढच्या अंकात..

शो-आॅफ कशासाठी?
कधी कधी खरोखर काही गोष्टी ‘शो-आॅफ’ या सदरात टाकता येतात. आपल्याला, इतरांना असं का वागावंसं वाटतं त्याची कारणं शोधता येतात. समोरची गोष्ट शो-आॅफ आहे की कसं, आपणही कळत-नकळत तसं वागत आहोत का, हे समजून घेणं तसं महत्त्वाचंच. बरेचदा एखादी जराशी वेगळी गोष्ट आपल्याला करावीशी वाटते. आपल्याला/ इतरांना सुखाची, लै भारी, यशाची वाटेल अशी ती गोष्ट असते.
कधी कधी त्याबद्दल नुसतंच लिहून, बोलून, व्यक्त होऊनदेखील कौतुकाचा भडीमार होऊ शकतो.
म्हणजे, एखाद्याने सांगितले, ‘मी आता अमुक एक नावाजलेला डोंगर चढायला जाणार आहे.’ डोंगर चढणं अजून सुरूदेखील झालेलं नाही; पण केवळ ही घोषणा केल्यानंच इतकं कौतुक होतं की डोंगर चढल्यावर जे कौतुक होणार असतं त्याची बरीचशी झलक केवळ अशा घोषणेनेच मिळून जाते. मग प्रत्यक्ष डोंगर चढायची गरजच काय, करू, बघू-होईल अशी टोलवाटोलवी नंतर होऊ शकते.
असे अनुभव वाढले, तर माणसं अमुक गोष्टीला केवळ आरंभशूर, फोल घोषणा, नुसतंच आश्वासन असं म्हणू, ठरवू लागतात.
तिथूनच सुरू होतो, ‘आधी कर आणि मग बोलून दाखव’ सल्ल्यांचा भडीमार. जो त्या त्या संदर्भात कमी-जास्त प्रमाणात ठीकच असतो. पण एखादी अत्यंत वाईट गोष्ट ‘आधी कर आणि मग बोलून दाखव’, अशा आव्हानानं पुरेसा विचार न करताच घडून जाऊ शकते. म्हणूनच, हे सगळं त्या त्या परिस्थितीत आणि त्या त्या व्यक्तीनुसार बघावं लागतं. सगळे थोर सुविचार, कोट्स, सल्ले एकदम सर्वत्र सर्वांना लागू करता येत नाहीत.

Web Title: How many words do you mean? True show-offs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.