बेडूक आणि गरम पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 04:06 PM2018-02-07T16:06:21+5:302018-02-08T08:46:24+5:30

रोबोट किती महाग. किती अवघड काम. कुणाला परवडणार? असं म्हणता म्हणता आपल्याकडेही रोबोट आलेत. आता आपल्या नोकºया ते करू लागले तर..?

Frogs and hot water | बेडूक आणि गरम पाणी

बेडूक आणि गरम पाणी

Next


- डॉ. भूषण केळकर

इंडस्ट्री ४.० या संवादाला वाचकांचा छान प्रतिसाद येतोय. एक जळगावचा मुलगा लिहितो की ‘मला इंडस्ट्री ४.० मध्ये करिअर करायचं!’ दुसऱ्या एका प्रतिसादात एका मुलीने आणि शिक्षकाने इंडस्ट्री ४.० यामुळे काळजी वाटते आहे आणि हा वेग आणि ही क्रांती सर्वसामान्यांना खाऊन टाकेल, अशी भीतीही व्यक्त केली आहे. अजून एका मुलीने लिहिलंय की ‘ही चौथी औद्योगिक क्रांती’ जीवन फार निरस करून टाकेल आणि मानवी भावविश्व कोलमडून पडेल का?’

बरं वाटतं या आणि अशा प्रतिसादामुळे. तुमच्याही डोक्यात विचार सुरू होणं हा या लेखमालेचा मूळ हेतू साध्य होतोय, हे पाहून आनंद वाटला! हे सारे प्रश्न खरंच विचारात टाकणारे आहेत, यात शंकाच नाही. त्याहीपेक्षा चांगली गोष्ट ही आहे की तुम्हाला हे प्रश्न ‘वेळेत’ पडले आहेत! तुम्हाला ती बेडकाची गोष्ट बहुधा माहिती असेल की पाण्यामध्ये आरामात बसलेला बेडूक जसं पाणी हळूहळू गरम होत जातं तसं फक्त चुळबुळ करत राहतो. पाणी गरम होण्याचा वेग कमी असल्याने तो उडी मारू शकत असूनही ती ‘वेळेत’ मारत नाही आणि अखेर भाजून मरतो! औद्योगिक क्रांतीचं हे आपल्याला व्यापणारं पाणी कमी -अधिक वेगानं तापतंय आणि कदाचित आता या क्षणी ते भाजत नसेल; पण २-५-१० वर्षांत आपण योग्य हालचाल केली नाही तर चटके बसणार आहेत हे नक्कीच!’ या इंडस्ट्री ४.० साठी आपण काय करायला हवं हे तर आपण या क्रांतीची कारणं आणि त्याची ‘वेळ’ याचं सूत्र जरा समजून घेऊ.

या क्रांतीच्या सर्वात प्रमुख कारणांमध्ये पहिलं म्हणजे ती आधीच्या तीन क्रांत्यांमुळे झालेली पार्श्वभूमी. एआय, बीग डाटा, इंटरनेट यांची पूरक गतिमान वाढ. अर्थात ही झाली तांत्रिक कारणं, त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रगत देशांमध्ये कमी होत जाणारं मनुष्यबळ. जर्मनी, जपान या प्रगत देशात संपत्तीची निर्मितीे करणारा तरुण वर्ग, लोकसंख्येची घट असल्याने कमी उपलब्ध आहे. त्यामुळे यंत्राकरवी काम करवून घेणं हे ‘जमल्यास उत्तम’ असे नसून ‘अत्यावश्यक व अपरिहार्य’ प्रकारात मोडते! आपण हे जाणतोच की अमेरिका, ब्रिटनचे सरासरी आयुर्मान हे ४० वर्षे आहे, जपानचे तर जवळजवळ ५० आहे आणि भारताचं आहे केवळ २७! त्यामुळे काम करण्यायोग्य मनुष्यबळाची कमतरता हे एक महत्त्वाचं दुसरं सामाजिक कारण आहे. आता हे देश ते मनुष्यबळावर अवलंबून न राहता यंत्राद्वारे व एआय रोबोट, क्लाउड, इंटरनेट याद्वारे संपत्तीचं निर्माण सहज शक्य करत आहेत. कामगार वर्ग म्हटला की त्यांचं समायोजन आलं, त्यांचं नोकरी सोडणं, बदलणं आलं. काही ठिकाणी कामगार संघटना आल्या, रुसवे-फुगवे आले अन् राजकारण आलं. याला पूर्ण फाटा दिला जाऊ शकतो तो या यांत्रिक पद्धतीमुळे!

तिसरं अजून एक कारण म्हणजे की एकदा का मानवी सहभाग कमी झाला आणि यांत्रिक वाढला की स्वाभाविकच गुणवत्तेमध्ये एकजिनसीपणा, शास्त्रशुद्धता आणि अचूकता वाढते. न दमता, न थकता, सुटी आणि ओव्हरटाइमची मागणी न करता, यंत्रं आणि तद्नुषंगिक पूरक गोष्टींची सुसज्ज यंत्रणा, वस्तू आणि सेवा अखंड पुरवू शकतात.
यामध्ये अर्थातच हे गृहीत धरलं आहे की हे सारं होताना, या सगळ्या उलथापालथीमध्ये सामाजिक हादरे बसणार आहेत. विशेषत: रोजगार निर्मिती व रोजगाराच्या संधी आणि कौशल्यं यांची सांगड अत्यंत चमत्कारिक होणार आहे. त्याबाबत आपण पुढे विस्ताराने बोलणार आहोतच.
याच दशकात ही इंडस्ट्री ४.० का उभरते आहे याचं टायमिंग विषयी. उदा. रोबोट. हे आत्ता-आत्तापर्यंत खूप महाग समजले जायचे. प्रोग्रॅम करायला, नियंत्रित करायला अवघड समजले जायचे. धोकादायकसुुद्धा समजले जायचे; परंतु २०११ पासून विशेषत: एआय, क्लाउड, बीग डेटा, सायबल फिजिकल सिस्टीम्स यांची विश्वसनियता व त्यांचे नियंत्रण बव्हंशी सोपे झाले. त्याचबरोबर त्यांच्या किमती आटोक्यातसुद्धा आल्या. उदाहरणार्थ बॅक्स्टर नावाचा रोबोट २५,००० डॉलर्सना (१५ लाख रुपये) मिळू लागलाय! आधी कोटींच्या घरातली ही गोष्ट लाखात आली आहे!!
इंडस्ट्री ४.० च्या काळात या तांत्रिक गोष्टी ‘स्वस्त’ होत जातील; पण त्या आपल्याला ‘मस्त’पण वाटायला हव्यात, त्यासाठी आपण सावध असायला हवं, तयार असायला हवं, ते जास्त महत्त्वाचं आहे.

( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: Frogs and hot water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.