न झालेले भावी अधिकारी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 07:00 AM2019-02-21T07:00:00+5:302019-02-21T07:00:06+5:30

देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न घोकताना आपल्या मायबापाच्या कष्टांचं सकल वार्षिक उत्पन्न कुठं खर्च होतंय याचा त्यांना विसर पडला. आपल्या शिक्षणासाठी मायबापांनी उपसलेल्या कष्टाचा इतिहास आठवणंच पुस्तकातल्या इतिहासात नी सनावळ्यात बंद झालं. कोण आम्ही, विचारा तरी!

Dreams of officers which not comes to true. Why? | न झालेले भावी अधिकारी.

न झालेले भावी अधिकारी.

Next

 

-अनिल माने, बारामती

गावाकडे राहणा-या आमच्या निरक्षर मायबापाने रक्ताचं पाणी करून आम्हाला शिकवलं. त्यांच्या कष्टावर आम्ही शिकलो, वाढलो, घडलो. त्यांचे दु:ख, प्रश्न, समस्या आम्ही जवळून बघितल्या. फक्त बघितल्याच नाहीत, तर अनुभवल्याही. त्या सगळ्याचा त्रास व्हायचा. मन अस्वस्थ व्हायचं. समोरचं चित्न बदलावं असं सारखं सारखं वाटायचं; पण मार्ग माहीत नव्हता. दिशा सापडत नव्हती.

शिकल्यावर माणसाला दिशा सापडते म्हणतात. म्हणून शाळा, कॉलेजात अँडमिशन घेतलं होतं. शिकत असतानाच मोठमोठय़ा क्लासवन अधिका-याची ‘गेस्ट लेक्चर’ ऐकायला मिळाली. मोठमोठी मोटिव्हेशनल भाषणं. यू कॅन डू इट छापाची. ‘इकडं सगळं अगदी सोपं असतं’ अशा आविर्भावतली त्यांची ती भाषणे ऐकून आमच्या भोळ्याभाबड्या भावाबहिणींच्या डोक्यात ‘प्रशासकीय अधिकारी’ होण्याचा किडा वळवळू  लागला. प्रशासनात जाऊन आपले आणि समाजाचे प्रश्न सोडवायचे या विचारांनी मनाचा ताबा मिळवला. हळूहळू हा सगळा गोतावळा ‘स्पर्धा परीक्षा’ नावाच्या एका वेगळ्या अर्थव्यवस्थेत खेचला गेला.

कॉलेजात वाटायचं खासगी नोकरी करून आपल्या एकट्याचं कल्याण करून घेण्यापेक्षा आपण प्रशासकीय सेवेत जाऊन नवा देश, नवा भारत घडवू. मोटिव्हेशनल मेसेज देणारे अधिकारीही तेच सांगायचे. ते इतकं डोक्यात भिनलं की शेताला पाणी देताना असो की घरात भाक-या भाजताना असो, त्याला आणि तिला ‘‘वर्दी’’ची स्वप्नं पडू लागली. 
भाषणं देणारे सांगत होते, मोठी स्वप्नं पहा, त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी जीवतोड मेहनत करा. ती वाक्य डोक्यात असायची, डोळ्यासमोर दिसायची. वाटायचं मार्ग आणि दिशा सापडली. इथून सुरू झाला मग स्वप्नांचा पाठलाग !
अडाणी मायबापाच्या डोळ्यातील भावना मागे ठेवून आणि प्रशासकीय अधिकारी बनण्याची मोठी स्वप्नं डोळ्यात घेऊन हा तरुण वर्ग शहरात आला. मायबापानं कर्ज काढून, दागिने विकून किंवा बचत करून मिळवलेले पैसे त्याच्या हातावर ठेवले. मोठ्ठा अधिकारी करण्याची खात्री देणा-या शहरातल्या जाहिराती पाहून त्यानं मग क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांच्या येण्यानं पुण्यातल्या ‘‘अप्पा बळवंत’’च्या बाजारपेठेत उपलब्ध असणार्‍या दर्जेदार मालाला नवा ग्राहक आणि चांगला हमीभाव मिळाला होता.
मग सुरू झालं रुटीन. सकाळी लायब्ररीत जायला लागल्यापासून डोक्यावर परिणाम झाल्यासारखी मग ही पोरं वागायला लागली. राज्यप्रशासन वाचताना आपणही कार्यकारी मंडळातील प्रतिष्ठित अधिकारी झाल्याचा भास त्यांना होऊ लागला. देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न-जीडीपी समजून घेताना आपल्या मायबापाच्या कष्टाचं सकल वार्षिक उत्पन्न कुठं खर्च होतंय याचा त्यांना विसर पडला. आपल्या शिक्षणासाठी मायबापांनी लहानपणापासून घेतलेल्या कष्टाचा इतिहास आठवणंच या इतिहासात नी सनावळ्यात बंद झालं. 

गावाकडे जिथं बसून परीक्षेचा अभ्यास केला ते आंब्याचं झाड त्याच्या भूगोलाच्या नकाशातून कधीच गायब झालं. ‘टी ब्रेक’ मध्ये चहाच्या घोटांबरोबर रंगणा-या पश्चिम महाराष्ट्र की मराठवाडा, पवार साहेब की मोदीसाहेब या ग्रुप डिस्कशनमध्ये त्याचा सहभाग वाढला. लायब्ररीत बसून देशाचं राजकारण, अर्थकारण, इतिहास, भूगोल अभ्यासणार्‍या वर्गाचा देशात घडणा-या प्रत्येक घटनेकडे बघण्याचं पर्सेप्शन ग्रामीण ते शहरी असं बदलत चालला.

एकंदर असंच काही निवांत सुरू असताना अचानक प्री अँड आली. सगळा समाज खडबडून जागा झाला. फॉर्म भरले. प्री दिली. मेन्स दिली. इंटरव्ह्यूही दिले. नंतर रिझल्टची वाट बघण्यात दिवस निघून गेले. रिझल्ट लागला. 

अपेक्षित होतं, यशच मिळणार, पण यश मिळालं नाही. अभ्यास कमी पडला असं समजून, पुन्हा मोटिव्हेशनल भाषण ऐकून आमचा आशावादी तरुण परत पुढच्या वर्षीच्या तयारीला लागला.
 मात्र पुढच्या वर्षीही तेच. पंचवार्षिक योजना पूर्ण झाली तरी हातात काय?
-काही नाही. 
हे चित्र  दरवर्षीचंच.
शेवटी वय वाढलेलं असतं. खिशात पैसे नसतात. लग्न जमत नाही. नोकरी मिळत नाही. व्यवसायाला भांडवल नाही. घरच्यांना काय उत्तर द्यायचं. पाहुणेमंडळी काय विचार करतील. गावात लोक काय म्हणतील. एवढं अपयश हातात घेऊन हे न झालेले भावी अधिकारी जेव्हा गावाकडे येतात तेव्हा त्यांच्यात प्रचंड नैराश्य असतं. 
हौसले थे कभी बुलंदी पर.
ते ही आता सोबत नसतात.
असते फक्त निराशा. हतबलता.
स्पर्धापरीक्षा तयारी करणा-या उमेदवारांच्या या नुकसानीला जबाबदार कोण ? त्याची कारणं काय? दरवर्षी स्पर्धकांची संख्या वाढते आहे, पण जागा वाढत नाहीत. स्पर्धा परीक्षार्थींच्या पैशांवर क्लासेस, पुस्तक लेखक, विक्रेते, झेरॉक्सवाले, होस्टेल, लायब्ररी, हॉटेल, चहावाले, मेसवाले, रद्दीवाले एवढंच कशाला आयोगसुद्धा श्रीमंत होत आहेत. 
पण उमेदवारांना काय मिळतं? 

देशाच्या लोकसंख्येच्या विस्फोटावर पानभर निबंध लिहिणा-या तरुण वर्गाला बेरोजगारीच्या विस्फोटाची चाहूल एवढय़ा उशिरा का लागते? महाराष्ट्रातील फार मोठी बेरोजगारी स्पर्धापरीक्षा या क्षेत्रानं लपवून ठेवली आहे. हे कुणी सांगणार, बोलणार की नाही? 
स्वप्नातून वास्तवात तरुण मुलं येणार की नाही?

----------------------------------------------------------------------------------

एक्झामवाले 

तुम्हीही देताय स्पर्धा परीक्षा?
अधिकारी व्हायचं स्वप्न
तुमच्यामागे धावतंय?
त्या चक्रातून सुटायचंय
की त्यातून सुटकाच नाही
असं वाटतंय तुम्हाला?
लिहा- तुमची गोष्ट.
कॉम्पिटीटीव्ह एक्झामच्या
चक्रव्यूहात अभिमन्यू
होतोय तुमचा तो कसा?
पत्ता- पान 4 वर तळाशी.
इमेल तर करताच येईल.
oxygen@lokmat.com

-----------------------------------------------------------

स्वप्नांचं गॅस चेंबर
 
यूपीएससी क्रॅक करण्याच्या ध्यासाने झपाटून तारुण्य जाळणार्‍या मुला-मुलींच्या  अखंड धास्तावलेल्या, अगतिक आणि चोहीकडून लुटल्या जाणा-या आयुष्याची  दिल्लीच्या कुबट, गजबजत्या गल्ल्यांमध्ये कोंबून भरलेली चित्तरकथा
मुक्काम ओल्ड राजिंदरनगर 
आणि मुखर्जीनगर, दिल्ली 
: शर्मिष्ठा भोसले

‘लोकमत दीपोत्सव’ -2018 या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख. यूपीएससी करणार्‍यांचं जग उलगडून सांगणारा. तो वाचायचा.
तर मग क्लिक करा. 
www.lokmat.com/oxygen

Web Title: Dreams of officers which not comes to true. Why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.