शाहीन भट.
आलिया भटची बहीण. ती रुढार्थानं आलिया इतकी यशस्वी, लोकप्रिय नसली तरी तिच्या करिअरमध्ये ती उत्तम यश मिळवते आहे.
अलीकडेच तिनं एक पोस्ट लिहिली, ती म्हणजे वयाच्या १३व्या वर्षापासून मला डिप्रेशन छळतं आहे. मी जगतेय त्यासोबत. आणि अधूनमधून त्याचा त्रास होतो. पण मला डिप्रेशन येतं हे मी आज उघडपणे मान्य करते आहे. कदाचित दीपिकानं पुढं येत ते मान्य केलं, त्यातून मी हे जगजाहीर लिहिते आहे. माझ्या जवळच्या लोकांना ते माहिती आहे, पण आपल्याला डिप्रेशन हा आजार आहे हे असं मान्य करण्यात मला काही लाज वाटत नाही, कारण आजार हा आजार आहे.
एका तरुण, फेमस मुलीनं हे उघड लिहिणं आणि स्टार असलेल्या तिच्या बहिणीनं ते मान्य करणं हे नव्या डिअर जिंदगीचंच एक रूप आहे. 
आणि डिप्रेशनविषयीची ही उघड चर्चा या वर्षीची एक वेगळी नोंद घ्यावी अशी गोष्ट आहे.
* ही चर्चा खऱ्या अर्थानं जगजाहीर सुरू केली ती गेल्या वर्षी दीपिका पदुकोननं. यंदाही ती वर्षभर त्याविषयी बोलत होती. मुलाखत देत होती. लिहीत होती.
* तिनं सुुरू केलेल्या लिव्ह, लव्ह, लाफ या फाउण्डेशनच्या वतीनं सोशल मीडियात एक ट्रेण्ड चालवण्यात आला. ‘दुबारापुछो’ असं त्याचं नाव. म्हणजेच आपल्या जवळच्या उदास, डिप्रेस्ट माणसांना पुन्हा पुन्हा विचारा, बोला, मदत करा. स्वत: बोला असं सांगणारा हा दुबारा ट्रेण्ड.
* यावर्षीच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार भारतात डिप्रेशनचं प्रमाण वाढत असून अजूनही ३६% भारतीय तरुणांना डिप्रेशनसह मानसिक आजारांविषयी काहीही माहिती नाही.
* मनाच्या आजारांविषयी उघड बोलणारे सेलिब्रिटी आणि सिनेमे हे त्यातल्या त्या या वर्षाचं एक यश.

जीवखाऊ


ट्रोलिंग.
हा शब्द या वर्षी गाजला तो अमेरिकन निवडणुकीमुळे. आपल्याकडेही अनेक सेलिब्रिटी, स्टार्स, राजकारणी, पत्रकार यांना ट्रोलिंगला सामोरं जावंच लागलं. प्रसंगी माफी मागावी लागली.
ट्रोलिंग म्हणजे काय तर इंटरनेटवर अनेक लोकांनी एखाद्या व्यक्तीवर, विधानावर तुटून पडत त्यांचा जीव नको करणं.
आणि अशी जीवखाऊ प्रकरणं या वर्षी बरीच घडली. त्याची जंत्री करत नसली तरी हा ट्रेण्ड फक्त सेलिब्रिटीपुरता मर्यादित नव्हता तर सामान्य यूजर्संही अनेकदा या मनस्तापातून गेले.
* सामान्य तरुणांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. फोटो, कमेण्ट एखादी पोस्ट यावरून अनेकदा दिवसेंदिवस अपमान सहन करावे लागले.
* बॉडीशेमिंगवरून भयंकर मनस्ताप झाले. जान्हवी कपूर या श्रीदेवीच्या मुलीनं तर भलामोठा लेख लिहून या बॉडीशेमर्सना फटकावलं. दिसण्यावरून असं मुलींना छळण्याचे प्रकार अनेक घडले.
* ट्रोलिंगमुळे न्यूनगंड येणं, बुलिंग होणं, रॅगिंग होणं असे प्रकार कॉलेज ग्रुप्समध्ये घडले. त्यामुळे याविषयावर संशोधन बंगलोरच्या प्रतिष्ठित निम्हान्स संस्थेनं सुरू केलं.
* ट्रोलिंगचे बळी इतके की, अनेकजण आपली वास्तव जगातली प्रतिमाच त्यातून हरवून बसतील असं मानसोपचारतज्ज्ञांचं मत आहे. 

सेल्फीआणि पुढे..


सेल्फी.
हे प्रकरण तसं जुनं झालं.
आता गोष्टी त्याच्यापुढे गेल्या.
म्हणजे काय?
तेच तर २०१६नं अधिक स्पष्ट केलं..
* स्वत:चे विअर्ड जागेतले फोटो, खाणंपिणं, खाण्याचे पदार्थ, कुत्र्यांचे-मांजरांचे फोटो हे सारं जितकं विअर्ड म्हणून काढता येतील ते काढण्याचा ट्रेण्ड सध्या आहेच.
* त्यातून जितके म्हणून चित्रविचित्र फोटो काढता येतील, तितके फोटो काढले गेले आणि सेल्फीचे ग्रुपी झाले. ग्रुपीचे ट्रुपी झाले. ट्रुपी म्हणजे टोळक्यांचे फोटो.
* पण हे नुस्तं हौशीनं झालं नाही, तर त्याचं तंत्रज्ञान आणि उपकरणंही बदलली.
* मोनोपॉड नावाची एक गोष्ट आली. म्हणजे त्यातून सेल्फी अजून उत्तम निघू लागले.
* सेल्फी स्टिक्स होत्या, पण बेल्फी स्टिक्स आल्या, त्यानं मागच्या बाजूचाही फोटो काढता येऊ शकला.
* सेल्फी रिंग आल्या, आयफोन आले, त्यातूनही फोटोचा स्तर पुढच्या टप्प्यात गेला.
* सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक ब्यूटिफार्इंग अ‍ॅप्स आले, त्यातून काढलेले फोटो एडिट करून पोस्ट होऊ लागले.