आदिवासी पाड्यांवरचा डॉक्टर

By admin | Published: June 22, 2017 08:18 AM2017-06-22T08:18:00+5:302017-06-22T08:18:00+5:30

बीएएमएस झालो, पण वाटलं, शहरात काम करण्यापेक्षा आदिवासी भागात जाऊ, तिथं काम करू ! म्हणून गेलो थेट जिवतीला.

Doctor of Tribal Fences | आदिवासी पाड्यांवरचा डॉक्टर

आदिवासी पाड्यांवरचा डॉक्टर

Next

- कुलभूषण मोरे

बीएएमएस झालो, पण वाटलं, शहरात काम करण्यापेक्षा आदिवासी भागात जाऊ, तिथं काम करू ! म्हणून गेलो थेट जिवतीला. गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम आदिवासी भागात‘निर्माण’च्या शिबिरांनी दिलेला ‘कर के देखो’चा मंत्र सोबत होताच,मग कामालाच भिडलो!

माझे वडील गडचिरोली वनविभागात उच्चपदस्थ उपवनसंरक्षक अधिकारी होते. बालपण माझं गडचिरोलीच्या घनदाट जंगलात गेलं. फिरायला म्हणून बाबा आमटेंच्या हेमकलसा येथे आम्ही सुटीच्याच दिवशी भेटायला जायचो. अगदी सहा वर्षांचा असतानापासून बाबा आमटे, प्रकाश आमटे यांचं आरोग्यसेवेचं व्रत मी बघत होतो. त्यावेळपासूनच मला वाटे आपण अशी आरोग्यसेवा करावी. माझे आदर्श, आयडॉल हे बाबा आमटे आणि प्रकाश आमटे. नंतर बीएएमएसची पदवी घेऊन डॉक्टर झालो. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी शहराच्या ठिकाणी गडचांदूरला एक मोठी इमारत आणि पैसे जमा करून ठेवले. मोठं नर्सिंग होम सुरू करणं आणि शहरात वास्तव्य करून संसार करणं हा उद्देश. पण मला माझ्या आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजसेवा करायची होती. एवढ्यातच गोंगपिपरी येथे ग्रामीण रुग्णालयात आयुष वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत झालो. 
आणि त्याच काळात एकेदिवशी लोकमत आॅक्सिजन मध्ये ‘निर्माण’चा लेख वाचला. आणि तेव्हापासून सुरू झाला माझा अर्थपूर्ण जीवनाचा शोध...
निर्माणमध्ये डॉ. अभय बंग, राणी बंग यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग गरीब आदिवासी जनतेच्या आरोग्यसेवेसाठी कसा करता येईल याचं शिक्षण, मार्गदर्शन मिळालं. प्रतिकूल परिस्थितीत खेड्यामध्ये जाऊन आरोग्यसेवा करण्याची प्रेरणा मला ‘निर्माण’मध्ये झालेल्या शिक्षणातून मिळाली.
माझ्या गडचांदूर गावापासून अगदी २५ किमी अंतरावर सुरू होतो डोंगराळ आदिवासी अविकसित जिवती तालुका. लोकसंख्या ४०,००० च्या वर. पण फक्त एकच प्राथमिक आरोग्य केंद्र. या भागाचा अभ्यास म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रुरल डेव्हलपमेण्ट हैदराबाद येथून मी ट्रायबल डेव्हलपमेण्ट विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. हेल्थ स्टेटस अ‍ॅण्ड इश्यूज आॅफ ट्रायबल पिपल इन जिवती ब्लॉग या विषयावर एक संशोधनही केलं. 
हा अभ्यास करताना मला काही धक्कादायक प्रकार आढळले.
या भागात आरोग्य सुविधा नसल्याने बोगस डॉक्टर इथल्या आदिवासी जनतेवर चुकीचे उपचार करतात. त्यांची आर्थिक लूट करतात. एका गरोदर मातेला पहिल्याच महिन्यात चुकीचे इंजेक्शन दिले, तिचा गर्भपात झाला. तिला नागपूरला पाठवावं लागलं. सुदैवानं जीव वाचला. प्रत्येक तापाच्या रुग्णाला रक्त न तपासता मलेरियाच्या गोळ्या देतात. मलेरिया, टायफाइड, त्वचा रोग, कुपोषण, स्त्रीरोग, शुगर, बीपी, कुष्टरोग अशा असंख्य रोगांनी ग्रासलेले हजारो लोक आहेत ज्यांना एकतर आरोग्य सुविधा नाहीत. आणि आहेत तर मग बोगस डॉक्टरांकडून चुकीचा व महागडा उपचार करावा लागेल. हे सारं पाहिल्यावर, अभ्यास केल्यानंतर ठरवलं की, मी शहरात माझा दवाखाना सुरू करणार नाही. माझ्या वैद्यकीय सेवेचा उपयोग जिवती या तालुक्यात करणार आणि येथे आरोग्य स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून प्रयत्न करणार.
‘अर्थ’ ( एज्युकेशन अ‍ॅक्शन रिसर्च इन ट्रायबल हेल्थ) ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. माझं स्वत:चं अर्थ क्लिनिक अर्थात दवाखाना सुरु केला. प्राथमिक उपचार व मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. आदिवासी खेड्यांत जाऊन जागोजागी आरोग्य शिबिरं घेणं सुरू झालं. मोबाइल दवाखाना सुरूझाला. जनजागृती करतो. यामध्ये माझे ‘निर्माण’चे मित्र, जे कुणी दंतरोगतज्ज्ञ, कुणी स्त्रीरोगतज्ज्ञ, कुणी नेत्ररोगतज्ज्ञ मदतीला येतात. इतरही सेवाभावी संस्था मदत करतात. 
रुग्णांना औषधं स्वस्त मिळावीत, योग्य मिळावीत म्हणून जेनेरिक मेडिकल स्टोअर सुरु केलं. यामध्ये रुग्णांना अगदी कमी पैशात औषधं मिळतात. ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यापर्यंत उपचार, औषधं पोहोचवण्याचं मी माध्यम बनतो. 
हे सारं मला फार मोलाचं वाटतं. आपल्या कामाचं समाधान मिळतं ही भावना आनंद देते. या साऱ्यात मोलाची साथ देणारी जीवनसाथी डॉ. नंदिनी मला मिळाली. नंदिनीला आणि तिच्या आईवडिलांना माझं काम अभिमानास्पद वाटलं. तिनेही माझ्यासोबत लग्न करून या भागात आरोग्यासेवा द्यायला सुरुवात केली. अर्थ क्लिनिकला स्त्रीरोगतज्ज्ञ तिच्या रुपानं मिळाली. आमचा संसार आणि हे काम एकत्रच जोमानं सुरू झालं. नंदिनीही माताबाल आरोग्यासाठी काम करतेय.
आता जिवनी तालुक्यातील १२ आदिवासी गावांमध्ये जाऊन आरोग्य स्वराज्य अर्थात ‘आपले आरोग्य आपल्या हातात’ असा उपक्रम सुरू केला आहे. या प्रत्येक गावामध्ये आशा वर्कर व अंगणवाडी सेविका आहेत. प्रत्येक गावात यांच्या साहाय्यानं पाणी, स्वच्छता, आहार व रोग प्रतिबंधात्मक उपाय यासाठी आम्ही शिबिरं घेतो. याचाच परिणाम म्हणजे या १२ गावांतील आरोग्यात पूर्वीपेक्षा खूप सुधारणा झाली आहे. मलेरिया, टायफाइड, त्वचा रोग याचं प्रमाण खूप कमी झाले आहे.
भुरी येसापूर त्या गावात पाण्याची टाकी, पाइपलाइन सगळ्या सोयी होत्या; पण पाण्याचा स्रोत विहीर खूप दूषित होता. त्यामुळे या खेड्यात रोगराई खूप व्हायची. येथील गावकऱ्यांची ग्रामसभा घेतली व ग्रामसेवक यांच्या साहाय्याने शासकीय निधीतून त्या विहिरीतच ३०० फूट बोअर मारली व पाण्याचा शुद्ध स्रोत उपलब्ध झाला. आपण एक डॉक्टर आहोत, पण आपल्या शिक्षणाचा उपयोग केला तर गावकऱ्यांच्या मदतीने त्या त्या गावातील अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला आपण मदत करू शकतो. हे यानिमित्तानं लक्षात आलं. 
आरोग्य स्वराज्य मिशन हेच माझं ध्येय. तीच माझी अर्थपूर्ण जीवनाची वाटचाल. निर्माणमध्ये आम्हाला शिकवलं होतं, ‘कर के देखो.’

- मी माझ्या परीनं करून पाहतोय. प्रश्न खूप आहेत, पण आपण प्रश्नांचा नाही तर उत्तरांचा भाग होतोय, याचा आनंद मोलाचा आहे.  

Web Title: Doctor of Tribal Fences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.