वर्षभराची एमओशिप आणि पुढे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 10:05 AM2017-11-16T10:05:06+5:302017-11-16T10:05:14+5:30

डॉक्टर म्हणून आपलं फक्त एक वर्ष मागतोय समाज, तेवढंही द्यायची तयारी नाही, काय हा स्वार्थ?

Doctor : MOShip and more? | वर्षभराची एमओशिप आणि पुढे ?

वर्षभराची एमओशिप आणि पुढे ?

Next

- डॉ. मनवीन कौर

मी बॉण्ड साइन केला. ५ फेब्रुवारी २०११ ची गोष्ट. तो बॉण्ड साइन करतानाच मी वचन दिलं. सेवा करण्याच्या वचनावरच खरं तर सही केली. त्या बॉण्डपूर्तीसाठी ‘अ‍ॅडिशनल टाइम पिरीअड’ असं काही त्या बॉण्डवर स्पष्ट लिहिलेलं नव्हतं. पण बॉण्ड पूर्ण नाही केला तर सरकारला आर्थिक परतफेडीचा उल्लेख मात्र स्पष्ट केलेला होता. आता तेच सरकार बॅकट्रॅकिंग करण्याचा विचार करत आहे. ज्या लोकांनी बॉण्ड केले त्यांनी ते पूर्ण केले का, याचा विचार करत आहे. पण काही विद्यार्थ्यांना मात्र ती आपली फसवणूक आहे असं वाटतं आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आॅनलाइन पिटीशन दाखल करणं सुरू केलं आहे. मी शेवटचं तपासलं तेव्हा त्या पिटीशनला १७०० वगैरे सह्या समर्थनार्थ मिळाल्या होत्या; पण विचार करा, ६ कोटी लोकांनी सह्या करून जर पिटीशन दाखल केली तर? समजा, कुणी अशी पिटीशन दाखल केली की मला मलेरिया झाला, मला लांबच्या दवाखान्यात पोहचणंही शक्य झालं नाही, कुणी पोचवूच शकलं नाही म्हणून मी हकनाक मेलो, तर? समजा कुणी अशी पिटीशन दाखल केली की मला तिसºया स्टेजचा कॅन्सर झाल्याचं कळलंय, पण निदान फार उशिरा झालं कारण माझ्या जवळपास प्राथमिक आरोग्य केंद्रच नाही, तिथं निदान होण्याच्या सोयीच नाही, तर? समजा, ६ कोटी ग्रामीण माणसांनी उद्या पिटीशन दाखल केली की, आमच्यापासून आरोग्य केंद्र ५० ते २०० किलोमीटर लांब आहे. साधी तापाची गोळी आम्हाला लवकर मिळणं मुश्किल, निदान प्राथमिक आरोग्य सुविधा तरी आम्हाला द्या. आणि मग सांगा की, देशात सर्वाधिक डॉक्टर्स महाराष्टÑात तयार होतात. उद्या कुणी अशी मागणी केली की, असे डॉक्टर द्या की ज्यांच्यावर कायदेशीर बंधनच असेल. आमच्यावर इलाज करण्याचं, त्याचं कर्तव्यच असेल ते. पैसा नाही म्हणून आम्हाला उपचार नाकारले जाणार नाहीत, तर?
पण अशा पिटीशन दाखल होत नाहीत. कारण ही माणसं बोलत नाहीत, आवाज उठवत नाहीत. आॅनलाइन पिटीशन ज्या वेबसाइटवर दाखल होतात किंवा जे जीआर निघतात ते सारं त्यांच्यापर्यंत पोहचतच नाही. जिथं साधं वर्तमानपत्र पोहचणं मुश्किल, तिथं व्यवस्थेची सहानुभूती तरी कशी पोहचेल? आणि डॉक्टर ते तरी कुठं पोहचतात?
डॉक्टर होऊ पाहणारे अभ्यासक्रमाच्या दीर्घ कालावधीसाठी तक्रार करतात हे तर फार दयनिय आणि खरं तर आचरट, ओंगळ आहे. म्हणजे एकीकडे उच्चशिक्षण स्वस्त हवं, सरकारनेच सगळं मोफत दिलं तर उत्तम आणि त्याउपर कसले बॉण्ड नकोत, बांधिलकी नकोत हे म्हणजे तर अतीच म्हणायला हवं! मला वैद्यकीय शिक्षणातल्या काही त्रुटी मान्य आहेत; पण याचा अर्थ असा नाही की साडेपाच वर्षांच्या प्रशिक्षणानंतरही वैद्यकीय ग्रॅज्युएट पुरेसे ‘ट्रेण्ड’ नसतात. हा आक्षेपच मला मान्य नाही. वैद्यकीय आणि प्रशासकीय कामांची जबाबदारी घेणं हे २३-२५ वर्षांच्या मुलाला सहज शक्य असतं आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी ट्रेनिंगची गरज नाही असं म्हणणं कितपत रास्त आहे? म्हणजे, मला उच्चतम सुविधा हव्यात, विविध प्रकारच्या रुग्णांवर उपचारांची संधी हवी, त्यासाठी अभ्यासक्रमाची फीदेखील कमीच हवी (खासगी कॉलेजच्या तुलनेत तर फारच कमी) आणि या साºया बदल्यात जर मला समाजासाठी काही वेळ, सेवा दे म्हटलं की मी ते नाकारणार, मला सरकारनं फसवलं म्हणणार, हा काय आचरटपणा? बरं समाजाची सेवा म्हणजे मोफत किंवा तुटपुंज्या पैशात करा असंही सरकार म्हणत नाही. त्यासाठी उत्तम पैसा सरकार देतं आहे. बाकीच्या जगात पाहा, अमेरिकत जर तुम्हाला फिजिशियन व्हायचं असेल तर १४ वर्षांचं ट्रेनिंग आहे, बहुतांश युरोपिअन देशांत एमबीबीएसचा अभ्यासक्रम ६ वर्षांचा आहे. करा तुलना आता, आणि मग बोला!
आता माझं सांगते, मी ग्रामीण भागात जाऊन बॉण्ड सर्व्ह केला. तो अनुभव समृद्ध करणारा होताच. समाजाकडे पाहण्याची नजर बदलली. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मी जास्त जबाबदारीनं वागू लागले. रुग्णांचे आजारच नाही त्या आजाराभोवतीची परिस्थितीही मला दिसू लागली. आजारी माणसांवर उपचार करताना माझ्या प्रतिसादाची पद्धत बदलली. अधिक जबाबदार, अधिक पॉझिटिव्ह झाली. आणि मुख्य म्हणजे माझा पीजीचा थिसीस अधिक उत्तम लिहिण्याच्या टप्प्यापर्यंत मी पोहचले. समाजाचे प्रश्न मी अधिक वेगळ्या दृष्टिकोनानं आणि वैद्यकीय व्यवसायानुरुप मांडू शकते असं वाटलं. आणि हा बॉण्ड पूर्ण करायचं हे जे मी ठरवलं त्यानं अनुभव, आनंद आणि सामाजिक भानही दिलं. याकाळात मी जे काम केलं, त्यापेक्षा जास्त मला मिळालं. एक वर्ष गेलं, वर्षभरानंतर मला पीजी करावं लागलं, ते करणं शक्यच होतं; पण वर्षभर मी जे काम केलं त्यानं मला जो समाजाप्रती काम करण्याचा, वैद्यकीय व्यवसायाप्रतिचा दृष्टिकोन दिला तो मात्र मला जन्मभर पुरेल, माझ्यासोबत आयुष्यभर राहील. हल्ली डॉक्टर फार लवकर बर्नआउट होतात अशी चर्चा आहे. माझ्या पिढीत तर ही चर्चा फार वेगाने जोर धरते आहे. ग्रामीण भागात जाऊन काम करणं हे डॉक्टरांसाठीही उत्तम लसीकरण ठरावं.
म्हणून हा बॉण्ड महत्त्वाचा आहे.
आज जरी तो वादाचा विषय झाला असला तरी भविष्यात त्याचं मोल फार महत्त्वाचं ठरेल.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सारं आपण नक्की कुणासाठी करतो आहोत, आपण कुणाच्या बाजूचे आहोत याचं भानही ज्यानं त्यानं ठेवलं पाहिजेच!

- डॉ. मनवीन कौर
( औरंगाबादच्या जीएमसी वैद्यकीय महाविद्यालयांतून उत्तीर्ण झाल्यावर मनवीन आता गडचिरोली जिल्ह्यात कॅन्सर रजिस्ट्रार म्हणून काम करते आहे.)
 

Web Title: Doctor : MOShip and more?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.