-  वसुंधरा देवधर

मेडिकलमध्ये आईस्क्रिम चॉकलेट मिळत असेलही पण म्हणून औषधांची खरेदीही
आईस्क्रिम चॉकलेटसारखीच करून कशी चालेल?

औषधांच्या दुकानात हल्ली कॅडबरी आणि आईस्क्रिम घ्यायलाही लोकं जातात. कारण आता मेडिकल म्हणजे नुसती औषधांची दुकानं नसून ती ‘मेडिकल आणि जनरल स्टोअर्स’झाली आहेत. पण तरीही इतर दुकानांमध्ये आणि मेडिकल स्टोअर्समध्ये फरक असतो. तसेच इतर वस्तू घेणं आणि औषध खरेदी करणं यातही फरक आहे. हा फरक नीट लक्षात घेतला तर औषध खरेदी ही किती डोळसपणे करायला हवी हे लक्षात येईल. 
मेडिकल स्टोअर्स म्हणजे औषध विक्रीचा व्यवसाय करण्याचा परवाना. तो असा कोणालाही मिळत नाही. त्यासाठी फार्मसी म्हणजे औषधनिर्माणशास्त्रातील निदान पदविका तरी असावी लागते. ही पात्रता असेल त्याच व्यक्तीला औषधं विकता येतात. इतकंच नव्हे, तर मेडिकल स्टोअरमध्ये ते सकाळी उघडल्यापासून रात्री बंद करेपर्यंत फार्मासिस्ट हजर असलाच पाहिजे, असा नियम आहे. याचं मुख्य कारण असं की सर्वसामान्य ग्राहकाला/ रुग्णाला/त्याच्या नातेवाइकाला औषध खरेदी करताना काही शंका असेल, ते कसं घ्यावं याबाबत जर अडचण आली तर तिचं निवारण फार्मासिस्टनं करणं अपेक्षित असतं. औषधांची नावं, त्यावरील माहिती, ते कसं द्यावं, कधी घ्यावं/ घेऊ नये याबाबतची माहिती ग्राहकाला समजेल अशा भाषेत सांगणं, ही फार्मासिस्टची जबाबदारी असते. मात्र आपण अशी माहिती औषधाच्या दुकानात विचारू शकतो हेच अनेकांना माहीत नसतं. ज्यांना हे माहीत आहे, त्यापैकी कुणी ‘इथे फार्मासिस्ट कोण आहे?’असा प्रश्न केल्याक्षणी सर्वसामान्यपणे तीव्र प्रतिक्रिया येते. त्यामध्ये ‘तुम्ही कोण?’ ‘कशाला हवाय फार्मासिस्ट’, ‘जेवायला गेलाय/चहाला गेलाय,’ ‘औषध मिळालं ना?’ अशी अनेक उत्तरं ऐकायला येतात. ‘फार्मासिस्ट मी आहे’, असं उत्तर क्वचितच एखाद्याला मिळतं!
फार्मासिस्टची सेवा मेडिकल स्टोअरमध्ये असायलाच हवी, याबाबत ग्राहक आग्रही सोडा, जागरूकही नाहीयेत. आपण जी औषधे खरेदी करतोय त्यांच्या किंमतीत या सेवेचं मूल्य अंतर्भूत आहे, हे पण ग्राहकांना माहीत नसतं. म्हणजे वर्षानुवर्षे ग्राहक या सेवेचं मूल्य देतोय पण सेवा मागत नाही. ती द्यायला आपण बांधील आहोत, याची जाणीवही बहुतांश मेडिकल स्टोअरच्या चालकांना नसते. 
पण एक जागरूक ग्राहक म्हणून आपण औषध खरेदी केली तर या क्षेत्रातील बेजबाबदारपणाला खूपच आळा बसेल. त्यासाठी एक ग्राहक म्हणून आपणच आपल्याला काही प्रश्न विचारले आणि आपणचं आपलं वर्तन तपासलं तर?

१) डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनपेक्षा वेगळं, पण तसंच (असं दुकानदारानं सांगितलं म्हणून!) औषध आपण विना तक्रार का घेतो?
२) औषध विकत घेतल्यावर आपण बिलाचा आग्रह का धरत नाही. एखाद्या ग्राहकानं बिल मागितल्यास दुकानदार ताटकळत उभे का ठेवतो? 
३) जुन्या प्रिस्क्रिप्शनवर औषधं विकणं चुकीचं आहेच, तरी दुकानदार देतात. आपण ग्राहकही तसं करण्यास दुकानदाराला का भाग पाडतो?
४) औषध घेताना त्यावरची एक्सस्पायरी डेट बघतो का? दुकानदारानं दिलेलं औषध प्रिस्क्रिप्शननुसारच आहे ना याची खातरजमा आपण करतो का?
५) पॅकिंग व्यवस्थित आहे ना, ते खराब झालेलं नाही ना हे आपण तपासून बघतो का?
६) तीव्र परिणाम करणारी औषधं स्टिरॉईड्स इ. प्रिस्क्रिप्शनशिवाय मागणं, आपण स्वत:च विकत घेणं हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं याची जाणीव आपल्याला असते का?
७) आरोग्य सेवा आणि औषधांच्या किमती वाढत असल्यानं डॉक्टरांकडे न जाता औषधाच्या दुकानात जाऊन त्यांना आपला आजार सांगून औषधाच्या दुकानातून थेट औषधे घेणं हे योग्य की अयोग्य?