डोंगराच्या पोटात शिरण्याचं हे धाडस देतं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 05:39 PM2019-01-16T17:39:58+5:302019-01-16T17:40:47+5:30

या आठवडय़ात कुठला ट्रेक?. हा प्रश्न तरुण मुलांच्या विकेन्डचा भाग कधी झाला हे लक्षातही आलं नाही. रानोमाळ भटकत डोंगरमाथ्यावर जाण्याची ही क्रेझ काय सांगते?

 Do you dare to enter the mouth of the mountain? | डोंगराच्या पोटात शिरण्याचं हे धाडस देतं काय?

डोंगराच्या पोटात शिरण्याचं हे धाडस देतं काय?

Next
ठळक मुद्देतरुणाईच्या जगात आज ट्रेकिंग म्हणजे परवलीचा शब्द झाला आहे. डोंगरदर्‍यांतील भटकंती त्यांना नवी ऊर्जा देते आहे. 

  समीर मराठे  

ट्रेकिंग. तरुण मुलांना दीवानं करणारी, रानोमाळ भटकण्याची ही नशा काही नवीन नाही. मात्र काळ वेगानं बदलला तरी ट्रेकिंग मागे पडलं नाही, उलट नव्या पिढीलाही ते तितकंच आपलंसं वाटतं. आजही तरुण मुलं दर आठवडय़ाला गड-किल्ले पालथे घालतात. सोशल मीडियात त्यांचे ग्रुप्स ट्रेकिंगविषयी अखंड बोलतात, नवनवीन आव्हानं पेलण्याचं प्लॅनिंग करतात. 
तरुणाईच्या जगात आज ट्रेकिंग म्हणजे परवलीचा शब्द झाला आहे. डोंगरदर्‍यांतील भटकंती त्यांना नवी ऊर्जा देते आहे. 
कॉलेजला सुट्टी आहे, रविवार आहे किंवा अगदी कॉलेज बंक करूनही तरुणाई पाठीला बॅगपॅक लावून डोंगरांच्या दिशेनं जाताना आजकाल दिसतात. 
जवळपासचा, छोटासाच आणि काही तासात पोहोचता-परत येता येईल असा ट्रेक असला तर त्यासाठी फार तयारीही करावी लागत नाही. ग्रुपमधलाच एखादा ‘जाणकार’ पुढाकार घेतो, कट्टय़ावर बसल्याबसल्या निर्णय होतो, जे कट्टय़ावर नाहीत, त्यांच्यासाठी मोबाइलवरून सपासप रिंग जातात, ताबडतोब त्यांना ‘हजर’ केलं जातं, बाइक काढल्या जातात, खिशात जेवढे पैसे असतील त्या प्रमाणात टॅँक ‘फुल’ केली जाते, गरज पडल्यास ‘कॉन्ट्री’ काढली जाते, डोकी मोजली जातात, त्यानुसार डबल किंवा एखाद्या बाइकवर ट्रिपल सीटही टोळकं निघतं गिरीभ्रमणाला, भटकंतीला.
ही भटकंती जर अगदी ऐनवेळची असली तर त्यासाठीची तयारीही अशीच असते; पण मोठय़ा ट्रेकला जायचं असेल, नाइट कॅम्पिंग असेल तर त्याची तयारी मात्र बर्‍यापैकी आधीपासून सुरू होते.
तरुणाईला ट्रेकिंगनं भुरळ पाडलीय, याचं कारण, तुम्ही कुठलेही असा, कुठेही राहात असा, तुमच्या ठिकाणापासून अगदी दोन-पाच किलोमीटर अंतरापासून ते पुढे कितीही लांब, निसर्गाचा हा खजिना आपल्यासाठी खुला आहे. तिथे निवांतपणा आहे, हवाहवासा एकांत आहे, शिवाय ‘वॉच’ ठेवणारा कोणाचा ‘डोळा’ही तिथे भिरभिरत नाहीये!. 
जवळ, तरीही गजबजाटापासून दूर, अशा डेस्टिनेशनच्या मागावर तरुणाई असते. अशा ठिकाणांची माहिती मिळाली की मग तरुणाईच्या त्यावर उडय़ा पडतात. त्यासाठी सह्याद्रीची रांग इतकी समृद्ध आहे की, कुठेही आणि कितीही वेळा तुम्ही तिथं गेलात तरी तुमचं समाधान होणार नाही. 
तरुणांनी अशी अनेक ठिकाणं ‘शोधून’ काढली आहेत. त्यांची पावलं आपोआपच तिकडे वळताहेत. 
अति उत्साहाला आळा घालून निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला, आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत सजगपणे निसर्गाच्या कुशीत शिरलो, तर निसर्गही भरभरून दान देतो, हे सूत्र आता तरुणाईच्याही लक्षात येऊ लागलं आहे. अशी भटकंती करणार्‍यांच्या आयुष्यात  ट्रेकिंगनं  चार चॉँद लावले आहेत..

हे करा.

1. रस्ता माहीत नसल्यास वाटाडय़ा सोबत घ्या. त्याचं ऐका.
2. ऋतुमानाप्रमाणे योग्य कपडे, शूज असायलाच हवेत.
3. अनवाणी फिरणं टाळा.
4. एखादी काठी सोबत अवश्य ठेवा. साप, माकडं, काटेरी झुडपं दूर करण्यासाठी आणि आपल्या गुडघ्यांवरचा अनावश्यक भार कमी करण्यासाठीही काठी खूप उपयुक्त ठरते.
4. विसाव्याच्या ठिकाणी शूज काढून पाय मोकळे करा. सोबत चप्पल असल्यास उत्तम.
5. दिशादर्शक खुणांचा आवजरून वापर करा.
6. पाण्याची बाटली, जेवणाचा डबा सोबत ठेवा.
7. स्वयंशिस्त पाळा. 
8. खाली उतरताना पायांची पकड मजबूत हवी. त्यासाठी टाचेचा भाग आधी टेकवा.
9. उतारावर बॅलन्स सांभाळा.
10. पायाखालची माती, दगड घट्ट आहे, तो निसटणार नाही याची काळजी घ्या.
11. ज्या ठिकाणी आपण जातोय, त्या स्थळाची संपूर्ण माहिती आपल्याकडे अगोदरच असू द्या.
12. आपण कुठे जातोय, कधी येणार, बरोबर कोण कोण आहेत याची माहितीही घरच्यांना आधीच देऊन ठेवा.

हे टाळा.

1. जिथे जाल तिथे कुठेही केरकचरा टाकू नका. फास्टफूड वापरू नका. त्याचा कचरा फार होतो.
2. डोंगर चढता, उतरताना एकमेकांशी बोलणं टाळा. त्यामुळे तोल जाऊन अपघात होऊ शकतो.
3. थ्रिल म्हणून अचाट साहस, माहीत नसलेल्या वाटांनी जाऊ नका.
4. तहान लागल्यास घटाघट पाणी पिणे टाळा. 
5. पुरेसं पाणी सोबत असू द्या आणि पूर्ण ट्रेक संपेर्पयत ते संपणार नाही याची काळजी घ्या.
6. अति उत्साहात धोकादायक ठिकाणी, कडय़ांवर, दरीच्या टोकाशी जाऊन, खाचखळग्यांत उतरून फोटो, सेल्फी काढू नका.
7. नाइट कॅम्पिंगच्या वेळी काळजी घ्या. उगीच इकडेतिकडे फिरू नका. सुरक्षेची काळजी घ्या. 
8. ठिसूळ भागावर भर देऊ नका.
9. कडय़ावरून डोकावून पाहू नका.
10. डोंगरमाथ्यावर वारा फार असतो. कठडय़ांवर उभे राहू नका.
11. तिथल्या शांततेचा भंग करू नका. 
12. पर्यावरणाला, निसर्गाच्या जैवविविधतेला बाधा पोहोचेल असं कुठलंही कृत्य अजाणतेपणानंही करू नका. 

लक्षात ठेवा.


1. ट्रेकिंगला जाताना एक महत्त्वाचं सूत्र कायम लक्षात ठेवा, आवश्यक ते सर्व सामान बरोबर असलंच पाहिजे, पण अनावश्यक ओझं उगाच बाळगू नका.
2. ट्रेकिंगला जाण्यापूर्वीच आपली चेकलिस्ट तयार करा. त्यात अत्यावश्यक औषधं, प्रथमोपचार पेटी, टॉर्च, बॅटरी. यासारख्या वस्तू बरोबर घेतल्या आहेत का, हे तपासल्यानंतरच घरातून बाहेर पडा.
3. ट्रेक हिवाळी आहे, पावसाळी की उन्हाळी, यानुसार आपला पोशाख ठेवा. बरोबर नेण्याची सामुग्रीही त्यानुसारच असायला हवी.
4. फॅशनच्या नादात हाफ पॅण्ट, अध्र्या बाहीचे किंवा बिनबाह्यांचे शर्ट. असे कपडे वापरू नका. आपला पोशाख शक्यतो अंग पूर्ण झाकणारा असावा.
5. डास, किडे, काटेरी झाडांच्या फांद्या बर्‍याचदा आपल्या ट्रेकची मजा किरकिरी करतात. त्यासाठीची तजवीज आधीच करून ठेवा.
6. आपलं वय, आपली शारीरिक क्षमता आणि आपल्याला असलेले आजार, यानुसार आपल्याला झेपेल अशाच ट्रेकला जा.
7. निसर्गाला साजेसा, तिथे एकरुप होईल असाच पोशाख वापरा.
8. ट्रेकला निघण्यापूर्वीच पुरेसे पैसे, अन्न-पाणी आपण बरोबर घेतले आहेत का आणि घरी परत येईर्पयत ते आपल्याला पुरेल याची आधीच खातरजमा करून घ्या.
9. त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांचा सल्ला आणि मदत अवश्य घ्या. 
10. ज्या ट्रेकला जाल, तिथे फळं, फुलं, वनस्पती यांच्या बिया अवश्य रुजवा. 

Web Title:  Do you dare to enter the mouth of the mountain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.