दिवाळीच्या सुटीत कुछ खास कर के देखो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 04:38 PM2018-11-01T16:38:31+5:302018-11-01T16:39:02+5:30

दिवाळीची सुटी आहे हाताशी, फराळ-खरेदी तर होईलच; पण अजून काय करता येईल? मिनिंगफुल? एकदम हटके तरीही भन्नाट! ही घ्या लिस्ट

Diwali vacation- try some thing new! | दिवाळीच्या सुटीत कुछ खास कर के देखो!

दिवाळीच्या सुटीत कुछ खास कर के देखो!

Next
ठळक मुद्देठरवलं तर जमतं, सहज जमतं फक्त ठरवून करायला लागलं पाहिजे.

- प्राची पाठक

सणासुदीला, त्यातही दिवाळीसारख्या सणाला नवीन कपडे घेणं ‘मस्टच’ आहे असं मानणारी पिढी आता जुनी झाली. पूर्वी शाळा-कॉलेज सुरू होताना नाहीतर दिवाळीतच नवीन कपडे घेतले जायचे. आता आपल्या पिढीत आवडेल तेव्हा, आवडेल ते आणि आपापला खिसा पाहून आवडेल तितके कपडे घेता येतात. चकाचक मॉल्स खुणावत असतात. ब्रॅण्ड्सने भुरळ पाडलेली असते. आज भलेही नसतील आपल्याकडे तितके पैसे, पण मनात आस तर लागलीच असते की हे घ्यायचं यार एक दिवस. ऑनलाइन साइट्सवर आपण सेव्ह करून ठेवतो अनेकदा, हे घेऊ. ते घेऊ. खिशात असतील पैसे तर लगेच घेऊनही टाकतो. दोन दिवसांत घरपोहोच येतं सगळं.
त्यामुळे कपडय़ांच्या खरेदीचं अप्रूप उरलेलं नाही. शहरी-निमशहरी भागात तरी. सण आणि कपडे खरेदी, हे समीकरण आता पूर्वी इतकं पक्कं नाही. तरी संधी मिळाली म्हणून दिवाळी शॉपिंग करणारे हौशीही काही कमी नाहीत.
त्यात आजकाल ‘डे’ किती असतात वरचेवर. काही ना काही निमित्तानं आपण एकत्र येतोच, भटकतो, मजा करतो. वेळच मिळत नाही यार, असं म्हणतसुद्धा भरपूरच मजा करतो की. त्यामुळे यंदा दिवाळी पारंपरिक खरेदी, झालंच तर दणकून फराळ खाणं, सिनेमे टाकणं हे सालाबादाप्रमाणं झालंच तरी या सुटीचा काही वेगळा विचार करता येतो का, हे जरा बघू..
वेगळा विचार म्हणजे बोअरिंग काम, नो फन असं नाही. तर जरा वेगळा विचार इतकंच. यावर्षीच्या दिवाळीच्या सुटीकडे जरा वेगळ्या नजरेने बघू. एरव्ही अभ्यास, करिअर, रिलेशनशिप्स, स्पर्धा परीक्षा, नव्याने लागलेल्या नोकर्‍या या सगळ्या चक्रात आपण फारच अडकलेलो असतो. नोकरी करून अभ्यास करणारेसुद्धा भरपूर तरुण असतात. या सर्वानाच दिवाळीच्या निमित्ताने सलग अशी जरा तरी सुटी मिळतेच. काहींना कमी, काहींना भरपूर; पण सुटी मिळते. त्यात यंदा तर शनिवार-रविवार लागून आल्यानं अनेकांना किमान चार दिवस तरी हक्काची सुटी मिळावी. तर दिवाळीच्या निमित्ताने मिळालेल्या या सुटीचा उपयोग नेहमीपेक्षा ‘वेगळं’ काहीतरी करायला आपल्याला करता येईल.
तो कसा?
या काही आयडिया.
तुम्ही डोकं लावून पाहा, तुम्हाला याहूनही भारी काही सुचेल.  
कर के तो देखो.. 

1. रोमॅण्टिक पसारा.

घरात आपले कपडेच कपडे साठलेले असतात. फस्ट इम्प्रेशन फार महत्त्वाचं, असं आपल्या मनावर जामच गोंदवून टाकलेलं असतं. कपाटात कपडे ओसंडून वाहत आहेत; पण ऐनवेळी घालायला एक धड वाटत नाही, अशी परिस्थिती जवळपास सर्वांची असते. मग आपण नवनवीन कपडे घेत सुटतो. बटण तुटलं, जरा उसवलं, चेन तुटली, नुसतेच चुरगळले, डाग पडले या आणि अशा अनेक कारणांनी आधीचे कपडे आपल्या प्रेमाची वाट पाहत कपाटात केविलवाणे पडलेले असतात. त्यांच्या ढिगावर नवनवीन कपडे येऊन जुन्यांना वाकुल्या दाखवत असतात. तर या सुटीत जुन्या कपडय़ांना जरा हवा दाखवली पाहिजे.  जरावेळ त्यांना ‘आपलं’म्हणू. काय दुरु स्त्या असतील त्या करून टाकू. असलेल्या कपडय़ाचेच वेगळे सेट्स, विविध कॉम्बिनेशन्स ट्राय करून बघू. आपल्यालाच फ्रेश वाटेल. फार खराब कपडे काढून टाकू. त्यांच्या विविध गोष्टी शिवून टाकता येतील किंवा कुठे देता येतील. या गोष्टीमुळे कपाट आवरलं जाईल, आपल्याला नवीन कॉम्बिनेशन्स मिळतील, असलेले पुरेपूर वापरले जाईल आणि उगाच नव्याची खरेदीसुद्धा वाचेल. पर्यावरण वाचवा वगैरे गप्पा नुसत्याच जोशात ठोकण्यापेक्षा आपल्या कपाटात कोंबून ठेवलेल्या कपडय़ांचा आढावा घेऊनसुद्धा तेच काम होऊ शकेल. तेही घरबसल्या! काम वाचाताना रोमॅण्टिक वाटत नसेल, पण करून पाहा, हे काम भारी रोमॅण्टिक आहे.

2.चालायला लागा!

 फिरणं, मौजमजा तर सगळेच करतो. या दिवाळीत जो वेळ मिळेल, तो जरा वेगळ्या प्रकारे भटकंती करण्यासाठी वापरता येईल. 
लगेच विचारू नका, पैसे कुठेत? कुठं जाणार रिकाम्या खिशानं?
पण फार दूर कशाला जायला पाहिजे?
 आपलं गाव, आपलं शहर, आपलं राज्य आपण धड बघितलेलं नसतं. आपल्या गावापासूनच सुरुवात करायची. पायी अंतरावर जायला कोणती हटके ठिकाणं आहेत? शोधायचं! गूगलबाबाची मदतसुद्धा घेता येईल. आसपासच्या लोकांकडे चौकशी करता येईल. आपलं गाव, आपलं शहर असं टप्प्याटप्प्यानं फिरायला लागायचं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरून बघायची. एसटी झिंदाबाद. शेअर रिक्षा झिंदाबाद. आपल्या आसपासच्या अनोळखी लोकांमध्ये मिसळणं, त्यांचं विश्व जाणून घेणं, पायी फिरणं शरीर-मनाला मस्तं तजेला देणारं असतं.
 हे करायला विशेष काही खर्च नाही. कसला फारसा धोकाही नाही! पर्यावरणस्नेही जीवनशैली अशीच छाटय़ा छोटय़ा प्रयत्नांतून आपण शिकू शकतो. अशानं आपल्या गरजा नीट कळू लागतात. फ्लेक्झिबिलिटी वाढते. नव्यानं कोणताही आव्हानात्मक जॉब करायला आपण एकदम ‘फिट है बॉस’ होऊन जातो! स्मार्टनेस आणखीन वेगळा कशाला शिकायचा मग?

3. छोटा पॅकेट, बडा धमाका.

काहीच करता येत नाही म्हणता.
मग एवढं सहज जमेल.
एकदम छोटं.
1. दिवाळी संपत नाही, तोवर चालू वर्षही संपत आलेलं असतं. दिवाळीचा काळ असतो थंडीचा. बॉडी बिल्डिंग सुरू करायला एकदम उत्तम हवामान. शरीर आणि मनाला झकास सव्र्हिसिंग देण्यासाठी हा काळ वापरता येईल. एकच छोटी गोष्ट ठरवा. तेवढीच करा. चालणं, व्यायाम, वेळच्या वेळी जेवणं. एकावेळी एकच.
2.  एखादी परसबाग लावून बघता येईल. बागेत झाडांच्या वाढीचा फॉलोअप ठेवायच्या निमित्तानं आपल्या कामातलं सातत्यदेखील वाढेल. हेच काम आपले इतर नवे प्रोजेक्ट्स रोज आठवून देण्यासाठी रिमाइंडर म्हणूनसुद्धा वापरता येईल. 
3. अमुक झालं की तमुक करायचं रोज, थोडावेळ तरी, अशी सवय करायची स्वतर्‍ला. हळूहळू फोकस वाढत जातो.  हे तरी सहज जमेल.


 

Web Title: Diwali vacation- try some thing new!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.