धुळे ते चेन्नई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:59 PM2017-07-19T16:59:06+5:302017-07-19T17:16:44+5:30

धुळ्यासारख्या लहानशा शहरातूनपुण्यात गेले.तिथून शिक्षणासाठी थेट केरळलाआणि तिथून पुढं आयआयटी चेन्नई.

Dhule to Chennai | धुळे ते चेन्नई

धुळे ते चेन्नई

Next

 - केतकी पूरकर


धुळ्यासारख्या लहानशा शहरातून
पुण्यात गेले.
तिथून शिक्षणासाठी थेट केरळला
आणि तिथून पुढं आयआयटी चेन्नई.
किती वेगवेगळ्या रूपांत
भेटला भारत नावाचा देश मला..

धुळे. उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच खान्देशात वसलेलं लहान असं शहर. बालवाडीत रिक्षावाल्या काकांसोबत सकाळी देवाची गाणी म्हणत शाळेत जाण्यापासून ते मॅट्रिक पास पर्यंतचा सगळं प्रवास इथल्या शाळेतच झाला. 
बारावीनंतर प्रवेश परीक्षांची गर्दी संपून निकाल लागले आणि पुण्याच्या महाविद्यालयात अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळाला. धुळ्याशी तुलनाच करता येणार नाही इतकी पुण्यातली लांबची अंतरं, सिटी बसेसची गडबड, गजबजलेली पुण्यातली खास ठिकाणं, रात्री उशिरापर्यंत वाहत असलेलं पुणं. आणि पुण्यातलं अविस्मरणीय कॉलेज आणि हॉस्टेल लाइफ. टेक्निकल इव्हेंट्सपासून ते प्रसिद्ध नाट्यस्पर्धा, सामाजिक उपक्रमांपर्यंत सारं इथं अनुभवायला मिळालं. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले लोक, त्यांच्या बोलण्यातल्या लकबी, महाविद्यालयीन तरुणांच्या नेहमीच्या वापराचे शब्द हे सारं हळूहळू सवयीचं झालं. प्रेमळपणापासून ते ताठरपणापर्यंत सारं काही अनुभवायला मिळालं. सुंदर, सुरक्षित आणि मोकळ्या अशा त्या शहराने मनातली भीड मात्र चेपली. कायम सोबत करणारे हक्काचे दोस्त गवसले. पुण्यातल्या साऱ्याच अनुभवांनी व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडवून आणला. पुढील आयुष्याला सामोरं जायला सिद्ध केलं.
पुढील शिक्षणासाठी केरळमधल्या तिरुवनंतपुरमला जायची संधी मिळाली. महाराष्ट्राबाहेर, राष्ट्रीय पातळीवरच्या महाविद्यालयात शिकण्याचा पहिलाच अनुभव. आता आजूबाजूच्या माणसांचं वर्तुळ अजून विस्तारलं. त्यात देशभरातून आलेल्या व्यक्तींचा समावेश झाला. स्थानिक मल्याळम भाषेशी थोडंफार जुळवून घेत मुख्यत्वे हिंदी, इंग्रजीत संवाद सुरू झाला. इंग्रजीत सतत बोलण्याची फारशी सवय नव्हती तरी हळूहळू करत नंतर आरामात इंग्रजीत गप्पा मारणं कधी सुरू झालं कळलंच नाही. दक्षिण भारतातल्या साऱ्या भाषा कानावर पडल्या तरी त्यातला फरक ओळखणं अजूनही कठीण जातं. उत्साहानं काही भाषा शिकण्याचा प्रयत्न केला तरी काही वाक्यांपलीकडे मजल गेली नाही. प्रयत्न मात्र अजून चालू आहेत. प्रत्येक जण आपल्या भाषेच्या उच्चारातील बारकावे समोरच्या व्यक्तीला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करत असला तरी समोरच्याला सगळे उच्चार सारखेच वाटत. आणि त्यामुळे समोरच्याने केलेले उच्चार मूळ भाषकाला काही केल्या पटत नसत. हे वेगवेगळ्या भाषांमधले शब्द, उच्चार शिकता- शिकवताना मोठी गंमत आली. भारतात भाषांमध्ये केवढी विविधता आहे याची जाणीव झाली आणि नकळत मराठीबद्दलचं प्रेमही वाढत गेलं. 
मग हळूहळू वेगवेगळ्या भाषांमधल्या गाणी, चित्रपटांची माहिती होत गेली. स्थानिक लोकांशी बोलताना थोडी अडचण आली. किमान तोडक्या मोडक्या हिंदी, इंग्रजीत बोलणारे भेटले तरी ते स्थानिक भाषेलाच प्राधान्य देताना दिसले. आणि मग या अनुभवातून गेल्यावर, बाहेरून महाराष्ट्रात आलेल्या लोकांशी आपणही मराठीचा अभिमान जरा बाजूला ठेवून बोलायला हवं असं वाटून गेलं. आपल्याच भाषेला धरून बसणारे भेटले तसे आपल्या गाडीत बसलेल्या माणसांकडून उत्साहाने थोडं थोडं हिंदी शिकणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरसारखे, बदलांशी जुळवून घेणारे लोकही भेटले. केरळमधल्या वास्तव्यात तिथला प्रसिद्ध ‘ओणम’ सण अनुभवायला मिळाला. फुलांच्या पाकळ्यांच्या नयनरम्य रांगोळ्या, पारंपरिक वेशभूषा, वाजतगाजत महाबली राजाच्या प्रतीकाची काढलेली मिरवणूक, ओणमसाठीचा खास जेवणाचा बेत ‘ओणम सद्या’ हा साऱ्यांचं मिश्रण असलेला, जात-धर्मांच्या पलीकडे जाऊन त्या राज्याचं ऐक्य दाखवणारा हा सण. एक सण वेगवेगळ्या राज्यात कसा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो हे कळलं. शिवाय एखादा नवीन पदार्थ चाखताना ‘हा तर आपल्याकडच्या या पदार्थासारखाच लागतोय की...’ असं वाटून भारतातला सारखेपणाही जाणवला. केरळच्या सुंदर निसर्गाची सवय झाली होती ती वेगळीच.
पुढे चेन्नईच्या आयआयटीत शिकायची संधी मिळाली. दक्षिण भारतातीलच अजून एक राज्य. गजबजलेली मेट्रोसिटी आणि त्या शहरात असलेलं सर्व सुविधांयुक्त जंगल म्हणता येईल असा आयआयटीचा परिसर. हरणं, माकडांचा मुक्त संचार तर हॉस्टेलमध्येही विद्यार्थ्यांची तारांबळ उडवणारा. इथेही वेगवेगळ्या राज्यांतून आलेले मित्र-मैत्रिणी मिळाले आणि त्यांनी सांगितलेल्या आपापल्या ठिकाणच्या वर्णनामुळे बऱ्याच ठिकाणांना भेट देण्याची इच्छा निर्माण झाली.
एकूणच विविध ठिकाणच्या या वास्तव्यामुळे देशातल्या कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही साधनानं एकटं फिरण्याची हिंमत आली. क्वचित काही प्रसंगामुळे खबरदारीचे उपायही शिकायला मिळाले. घरातल्या प्रेमाच्या उबेची आठवण आल्यावर घरीच राहावं असं कधी वाटून जातं. पण मग जाणीव होते की बाहेर पडलो नसतो तर आपल्या माणसांच्या गोतावळ्यात आणि अनुभवाच्या शिदोरीत इतकी भर पडलीच नसती. आयुष्याच्या या प्रवासात पुढे अजून कोणते मुक्काम येतात बघू..
 

Web Title: Dhule to Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.