डेंग्यू आणि डिझाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 03:00 AM2018-06-07T03:00:00+5:302018-06-07T03:00:00+5:30

आपल्या कल्पकतेनं डिझाइन क्षेत्रात भरारी घेणाऱ्या एका दोस्ताची गोष्ट.

Dengue and design | डेंग्यू आणि डिझाइन

डेंग्यू आणि डिझाइन

Next

- पार्थ सबनीस
(शब्दांकन : नंदकुमार टेणी)

ऐन परीक्षेच्या काळात डेंग्यू झाला आणि एक वर्ष वाया गेलं. त्या विश्रांतीच्या वर्षाचा उपयोग करत बंगळुरूच्या पार्थ सबनीसने एक भन्नाट घड्याळ बनवलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाची नवीन ओळख निर्माण केली. ते कसं झालं, हे त्याच्याच शब्दात..
खरं तर आज तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायला मिळाल्या म्हणून खूप आनंद होतो आहे. मला कधीचं वाटत होतं, आपण आपला हा टेरिफिक अनुभव शेअर करावा, ती संधी आज मिळाली. सो, थॅक्स टू लोकमत !
तर मी मुंबईत जन्मलो. शालेय शिक्षण माणिक विद्यालयात पूर्ण झालं. माझे आई-बाबा नोकरीसाठी हैदराबादला शिफ्ट झाले, त्यामुळे पुढचं शिक्षण जॉन्सन ग्रामर स्कूलमध्ये मी घेतले. नंतर माझ्या वडिलांनी ग्राफेन सेमिकंडक्टर्स ही कंपनी सुरू केली. त्यासाठी आम्ही सगळे बंगळुरूला शिफ्ट झालो. त्यामुळे माझं माध्यमिक शिक्षण तिथल्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं. दीक्षा सेंटर फॉर लर्निंगमधून मी बारावी पास झालो आणि इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सची पदवी बेळगावच्या के.एल.एस. गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मिळवली. त्यानंतर मी माझी द सायलेंट कॅन्व्हास ही कंपनी सुरू केली. इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ही माझी ग्रॅज्युएशनची स्ट्रीम होती. पण नेमका त्याचकाळात मला डेंग्यू झाला. डॉक्टरांनी विश्रांती सक्तीची केली. या साऱ्यात माझं एक वर्षच वाया जाणार होतो. मी खचलो होतो तेव्हा माझ्या आईनं मला सांगितलं की, तुझ्यापुढे दोन आॅप्शन्स आहेत. विश्रांतीपायी जो वेळ मिळाला त्याचा आयुष्य घडविण्यासाठी क्रिएटिव्ह वापर करायचा नाही तर नशिबाला बोल लावत कुढत कुथत जगायचं. निर्णय तुला घ्यायचा आहे. माझी आई अहल्या, ती बंगळुरूमध्ये बुटिक चालवते. मला तिचं म्हणणं पटलं आणि मी पहिला पर्याय निवडला.
मला लहानपणापासून स्केचिंगचा छंद. मी स्केचिंग करू लागलो. त्या स्केचिंगचंच सायंटिफिक आणि प्रीसिजन रूप म्हणजे डिझाइनिंग होतं. यामध्ये इंडस्ट्रियल डिझाइनिंग आणि प्रॉडक्ट डिझाइनिंग अशा दोन स्ट्रीम होत्या. मी त्यातून प्रॉडक्ट डिझाइनिंग निवडायचं ठरवलं. मग मी इंटरनेटवर डिझाइनिंगच्या जेवढ्या साईट्स होत्या, त्या अभ्यासायला सुरुवात केल्या. मग माझंही काही वर्क मी त्यावर अपलोड केलं. त्यातली एक साइट होती अ‍ॅटो डेस्क. त्यावरील माझं वर्क पाहून ल्यूक्झस मी या वॉच कंपनीनं माझ्याशी संपर्क साधला आणि दोन डायल असलेलं घड्याळ डिझाइन करण्याची आॅफर दिली. यापैैकी एका डायलवरील घड्याळ अँड्रॉइडवर तर दुसरं पारंपरिक डायलवर चालणारं असं हवं होतं. असा प्रयोग आजवर कुठे झाला नव्हता. त्यामुळे मी अहोरात्र तेच घडवण्याचा ध्यास घेतला आणि अवघ्या १५ दिवसांत ते काम पूर्ण केलं.
ही गोष्ट एवढ्यासाठी अवघड असते की मुळात डायलची जागा छोटी आणि त्याच जागेत दोन घड्याळं भिन्न टेक्नॉलॉजीची बसवायची होती. पण मी ते आव्हान स्वीकारलं. या घड्याळाचं नाव स्मार्ट पीडीजी वॉच असं ठेवण्यात आलं. दर दोन वर्षांनी घड्याळाच्या नवनवीन डिझाइनिंगची जागतिक पातळीवर स्पर्धा होते. त्यात आपलं घड्याळ सादर होणं हा मोठा बहुमान समजला जातो. हे घड्याळ साकारण्यासाठी मी अ‍ॅटो डेस्क माया सॉफ्टवेअरचा वापर केला. जवळपास शंभर डिझाइन मी तयार केली आणि माझ्या क्लायंट कंपनीशी चर्चा करून डिझाइन फायनल केली. हे घड्याळ जीपीएचजी या वेबसाइटवर लोड केलं गेलं. जिन्हेव्हा वॉचमेकिंग ग्रँड प्रिक्स स्पर्धेमध्ये ते सादर झालं. त्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वॉच डिझाइनला पुरस्कार दिला जातो. स्त्री, पुरुष आणि स्पोर्ट अशा त्यात कॅटेगरिज असतात. त्यामध्ये तांत्रिक इनोव्हेशन अशीही एक कॅटेगरी असते. त्यात खास ज्युरींकडून दिला जाणारा पुरस्कार असतो. त्या कॅटेगरीत माझं हे घड्याळ सादर झालं.
आपला देश, आपलं राज्य, आपली संस्कृती, आपले आदर्श याच्यासाठी आपल्या कौशल्याचा वापर करावा ही माझी इच्छा होती. त्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची डायल असलेल्या घड्याळाची निर्मिती केली. अशी फक्त ५३ घड्याळं मी साकारणार आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज फक्त ५३ वर्षे जगले होते. एका घड्याळाची किंमत चार ते साडेचार हजार रुपये असून, त्यापैैकी चाळीस घड्याळे यापूर्वीच बुक झाली आहेत. स्वित्झर्लंडमध्ये हे घड्याळ बनविण्यासाठी ७५० डॉलर्सचा खर्च येतो आहे. त्यामुळे मी त्याची निर्मिती भारतातल्या राजकोट अथवा मोरबी यापैैकी एका शहरात केली जावी असा प्रयत्न करत आहे, त्यामुळे त्याची किंमत आणखी कमी होईल असा मला विश्वास आहे. डिझाइनिंगच्या क्षेत्रात एवढे यश मिळाल्यानंतर आपण यात आणखी काही नवीन करावं अशी प्रेरणाच मला या कामानं दिली आहे.
कृत्रिम हात डिझाइन करण्याची संधी
इंटरनेटवरील साइट सर्च करीत असताना एक दिवस इंडिया सोशल हार्डवेअर यांनी जगातील डिझायनर्सना केलेलं आवाहन पाहण्यात आलं. ज्या व्यक्तींना हात नाही किंवा तो गमवावा लागला आहे अशा व्यक्तींसाठी कृत्रिम हात बनवावा, तो हालचाल करता येण्यासारखा असावा असं म्हणत हे आवाहन करण्यात आलं होतं. मला ते खूप आव्हानात्मक वाटलं. मी त्यासाठी अर्ज केला. जगभरातून आलेल्या अर्जातून चार अर्ज त्यात शॉर्ट लिस्ट केले गेले. त्यातून अंतिम निवड माझी केली गेली. त्यांच्याकडे आधीचे काही प्रोटोटाइप होते; परंतु त्यात असंख्य उणिवा होत्या त्यामुळे मला सारं काही नव्यानं डिझाइन करावं लागलं. शरीरशास्त्राचा आणि मुव्हमेंट मेकॅनिझमचा अभ्यास करून नवं डिझाइन करणं आवश्यक होतं.
जयपूर फूट जसा फक्त पायाखाली अडकविला जातो त्याच्या बोटांची हालचाल करणे अपेक्षित नसते तसे या हाताचे नव्हते. त्याच्या बोटांची हालचाल करता यावी अशी अपेक्षा होती. त्यामुळे अंगठा वगळता अन्य चारही बोटे वापरता यावी, वस्तू उचलणं, वस्तू ठेवणं, हलवणं, पकडून धरणं या बाबी त्या हातानं करणं अपेक्षित होतं. त्यानुसार त्यांना मी फायनल डिझाइन बनवून दिले आहे. त्याचा प्रोटोटाइप तयार झाला असून, लवकरच त्याच्या प्रॅक्टिकल टेस्ट सुरू होतील. आता या क्षेत्रात अजून खूप मोठी भरारी घ्यायची आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. माझ्या वडिलांची मायक्रोचिप्स बनवणारी कंपनी आहे, त्यांचाच वारसा मला पुढे चालवायचा आहे.

Web Title: Dengue and design

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.