प्रिय, मी जे सांगतेय, ते पोहोचेल ना तुझ्यापर्यंत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:34 PM2018-08-10T13:34:30+5:302018-08-10T13:35:11+5:30

तूच म्हणतोस ना, आपण सगळ्या प्रकारचं बोलू शकू असं आपल्या दोघांचं जग आपण निर्माण करायला हवं. तरी एक पाऊल एकमेकांच्या दिशेने पुढे येण्यासाठीचेच प्रयत्न करायला हवेत.

Dear, what i am saying is difficult, please be with me.. | प्रिय, मी जे सांगतेय, ते पोहोचेल ना तुझ्यापर्यंत ?

प्रिय, मी जे सांगतेय, ते पोहोचेल ना तुझ्यापर्यंत ?

Next
ठळक मुद्देतो माणूस म्हणून नेहमीच आवडलाय मला. पण जेव्हा त्याला मी आवडतेय हे माझ्या लक्षात आलं तेव्हा मला ती भावनाच हवीहवीशी वाटू लागली.

- श्रुती मधुदीप

 

प्रिय अभी,
 कुठून बोलायला सुरुवात करावी, मला कळत नाहीये. पण बोललं पाहिजे असं वाटत राहातं. खूप घालमेल होते रे, मी कुठे उभी आहे, तेच कळेनासं होतं कधी कधी. तुला भेटायला आले ना परवा मी, तेव्हाही असं राहून राहून कसंसं होत होतं. तू म्हटलास की काहीतरी मिसिंग वाटतंय माझ्यात; पण मला ते नव्हतं सांगता येत किंवा असं आहे की मला माझीच भीती वाटत होती अभी! अभी कसं सांगू! एक प्रकारचं गिल्ट घेऊन वावरतेय मी सध्या. मोकळंच वाटत नाही. काय खरं, काय खोटं तेच कळेनासं होतंय. अभी मी तुला म्हणून लिहायला घेतलंय खरं; पण तुझ्यार्पयत हे सगळं पोहोचविण्याचं धाडस होईल की नाही, मला माहीत नाही. मी प्रयत्न करतेय. तूच म्हणतोस ना, आपण सगळ्या प्रकारचं बोलू शकू असं आपल्या दोघांचं जग आपण निर्माण करायला हवं, त्नास झाला तरी एक पाऊल एकमेकांच्या दिशेने पुढे येण्यासाठीचेच प्रयत्न करायला हवेत. म्हणूनच हे सगळं! 
        अभी, सध्या मी आणि प्रयाग इंटर्नशिपच्या ठिकाणी एकत्न काम करतो. आमची बरीच कामं एकाच सेक्टरमध्ये असतात. इन फॅक्ट, कधी कधी तर केस स्टडी घेताना मी माहिती काढत असते आणि तो लिहित असतो. सो, आम्ही सतत एकमेकांसोबत काम करतो. मला एकूणच या कामात खूप मजा येते. या ‘वेडय़ा’ म्हणवणार्‍या लोकांना भेटून अजून अजून शहाणं होता येतं असं वाटतं. पण अभी! परवा असं झालं की, मी आणि प्रयाग शेवटचं काम करून निघायच्या तयारीत असताना मी माझी बॅग भरत होते आणि प्रयाग त्याचं आवरायचं सोडून माझ्याकडे टक लावून बघत होता. एकदम माझं लक्ष गेलं तर हृदयात काहीतरी थंड वाहून गेल्यासारखं वाटलं. मला कळलंच नाही काय करू ते! मी अचानक गमतीने त्याची नजर हालवण्यासाठी माझा हात त्याच्या डोळ्यांसमोर हालवून ‘ए! प्रयाग!’ असं म्हणत हसून म्हणाले, ‘‘चलो! निघते मी.’ तर तो एकदम भानावर आला आणि ‘बाय’ म्हणाला. त्यानंतर एकदा मी त्याच्याशी बोलता बोलता म्हणाले, ‘प्रयाग, या सगळ्या माणसांना आपला आधार वाटतो की नाही माहीत नाही; पण मला ही वेडी माणसं खूप खूप आधार देतात. वाटतं माझ्यातल्या वेडेपणाला समजून घेऊन माझ्याच डोक्यावर हात फिरवतात. खरं तर मीच सायकॅट्रिक पेशंट आहे.’ तर तो लगेचच म्हणाला, ‘पण माझ्यातल्या सायकॅट्रिक पेशंटला तुझ्यासारख्या माणसांच्या आधाराची गरज आहे’ आणि काही क्षण त्याने माझ्या डोळ्यांत पाहिलं. मी क्षणात डोळे खाली केले. माहीत नाही का, पण हे असं बघणं, अशी वाक्यं काहीतरी जास्त सांगायचा प्रयत्न करत होती असं वाटलं. अभी! असे खूप सारे क्षण आले की ज्यात प्रयाग मला जास्त काहीतरी सांगू पाहात होता आणि मला ते नको होतं. मला ते ऐकायचं नव्हतं. नव्हे! ऐकायचं नव्हतं असं नव्हतं खरं तर. मला ते एका बाजूला खूप सुखावत होतं अभी! आणि दुसर्‍या बाजूला मला हे असं तुझ्यासोबत असताना नाही वाटलं पाहिजे असं वाटतं होतं. पण वाटतं तर होतं अभी.  
    आणि मग एकेदिवशी बसमधून घरी परतताना मला रडूच कोसळलं. मी खूप वेळ स्टोल बांधून आत रडत राहिले. तितक्यात तुझा मेसेज आला, ‘‘आय लव्ह यू! कधी भेटू या गं? आठवण येतेय’ आणि मला असं वाटलं की मी तुझ्याशी खूप चुकीचं वागतेय. मी काहीतरी धोका देत होते का तुला? नाही खरं तर. पण मग मला तुला त्या इन्टेन्सिटीने रिप्लाय नाही करता आला त्यावेळी. असं का झालं? मी खूप विचार करत गेले. अभी! मला प्रयागचं ते वागणं एकावेळी हवंहवंसं आणि दडपण का आणत होतं? खरं तर मी माझ्या बाजूने काहीच निर्माण करत नव्हते. प्रयागही काही वाईट मुलगा नव्हता. चांगला माणूस आहे तो एक. पण त्याला मी हवीहवीशी वाटत होते. त्याला मी आवडत होते आणि तो तसं माझ्यासमोर इनडायरेक्टली व्यक्त होत होता. आणि माझ्या लक्षात आलं अभी की मला माझ्यावर लोकांनी प्रेम करणं हवं आहे. म्हणून तर प्रयागला मी आवडत होते हे मला खूप आवडत होतं. म्हणजे तो मला आवडत नाही असं नाही. तो माणूस म्हणून नेहमीच आवडलाय मला. पण जेव्हा त्याला मी आवडतेय हे माझ्या लक्षात आलं तेव्हा मला ती भावनाच हवीहवीशी वाटू लागली. मला प्रयाग ही पूर्ण व्यक्ती हवी नव्हती खरं तर. आणि मग माझ्यातल्या सनातन इच्छेचा परिचय मला झाला ! 
    अभी ! तू सोबत असताना अनेक व्यक्ती मला आवडल्या आहेत, आवडू शकतात हे मी स्वीकारू लागलेय. पण तुझी जागा तुझीच जागा आहे हे ही कळत चाललंय मला. अशी तुझी जागा पॉइंट आउट करून नाही दाखवता येणार कदाचित; पण मला या सगळ्यामुळे आपलं नातं आणखीच सुंदर वाटू लागलंय अभी. बघ! बसच्या गर्दीत रडतानाही स्टोल काढून माझं रडणं- माझी घालमेल मला तुझ्यासमोर व्यक्त करता येते. इतकं  सगळं तुझ्याशिवाय कुणाकडे मोकळं होऊ शकणार आहे मी ! बघ मी तुझ्याजवळ येण्याकरताचं एक पाऊल टाकलंय.मला माहीत आहे तुझे हातदेखील माझ्याकडेच झेपावताहेत. 
                                                                                                                                                     तुझीच! 

 

 

Web Title: Dear, what i am saying is difficult, please be with me..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.