धडका, खेड्यापाड्यातल्या लव्हस्टोरीतले व्हिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 04:34 PM2018-02-07T16:34:03+5:302018-02-08T08:47:46+5:30

कितीही बंधनं घाला, जातिपातीचे काच आवळा तरु ण मुले-मुली परस्परांच्या प्रेमात पडतच राहतात. किंबहुना त्यांनी प्रेमात पडावेच एकमेकांच्या. फक्त त्याआधी किंवा त्यासोबत एक करावं.. छाती बुलंद करावी आणि मन निर्भय. पोट भरण्यासाठी इतरांवर भार टाकावा लागणार नाही याची काळजी घ्यावी. मग बेभान झोकून द्यावे प्रेमात. निसर्गाला सर्वंकषपणे रोखण्याची शक्ती कुणाही जातीत, कुठच्याही धर्मात नसतेच.

Dahlka, the villain from the village of Lovestor | धडका, खेड्यापाड्यातल्या लव्हस्टोरीतले व्हिलन

धडका, खेड्यापाड्यातल्या लव्हस्टोरीतले व्हिलन

Next


- बालाजी सुतार

हॉस्टेलच्या रूममध्ये तो रोज अधल्यामधल्या वेळीसुद्धा शंभर जोर मोजून काढायचा. मला म्हणायचा, ‘निदान दहा तरी काढ. चांगलं असतंय. मन शुद्ध राहतंय’. ज्ञानयोग, भक्तियोग, राजयोग वगैरे विवेकानंदांचे ग्रंथ त्याने संग्रही ठेवून वाचूनसुद्धा काढलेले होते. ‘आरोग्य आणि चारित्र्य जोपासणे हीच खरी संपत्ती’ असं सुभाषित त्याच्या खोलीच्या दाराच्या आतल्या बाजूवर कायम लिहिलेलं होतं. तो व्यायाम करायचा आणि मी टाइमपास करायचो. कुणाला हे वाचताना आश्चर्य वाटेल; पण त्या अडनिड्या वयात कॉलेजमध्ये एवढे मोह आजूबाजूला असतानाही तो सहसा शील, चारित्र्य आणि आरोग्यसंपदा असल्याच गोष्टींबद्दल बोलायचा. एखाद्या दिवशी मात्र त्याचं हे ‘बेअरिंग’ सुटायचं आणि जोर काढता काढता भान न राहून तो म्हणायचा, ‘‘आयला ती सेकंड इयरमधली अमकीढमकी कस्सली भार्री दिसतीय नं! कायतरी करून तिच्यासंगट बोलाय मिळाया पाह्यजे राव यकदातरी!’’ मी न हसता हेही ऐकून घ्यायचो म्हणून त्याला माझ्याबद्दल फार ‘आदर’ वाटायचा. त्याला ती मुलगी त्याकाळात मनापासून आवडायची. नुसतीच आवडायची. त्यानं कधी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. पुढे काही वर्षांनी तो प्राध्यापक झाला आणि मग गडगंज हुंडा घेऊन त्याने त्याच्या जातीतल्या पोरीशी लग्न केलं.
त्याची-माझी मैत्री अजून कायम आहे. आम्ही अधूनमधून भेटत राहतो. एकदा मी त्याला विचारलं, ‘‘ती अमकीढमकी आठवते का रे तुला? तुला आवडायची तेव्हा, ती?’’
तो म्हणाला, ‘‘आठवते. खूप.’’
मी म्हणालो, ‘‘तेव्हा तू सांगायला पाहिजे होतंस तिला. मला तू आवडतेस असं. कदाचित तुमचं जमूनही गेलं असतं.’’
तो म्हणाला, ‘‘खुळा आहेस की काय? तिची जात कोणती, आपली जात कोणती. नसतं जमलं ते. पण मला आवडायची लैच ती.’’
मी मनाशी म्हणालो, हा कित्येक लाखांव्या कहाणीचा अत्यंत चाकोरीबद्ध साहजिक शेवट आहे.
तोच, तसाच, जो असंख्यांच्या कहाणीचा शेवट असतो. ही अशीच कहाणी लक्षावधींच्या आयुष्यात घडते आणि अत्तरासारख्या सुगंधी स्मृतींचे विरूप दर्प मागे ठेवून विरून जाते.
वयाच्या एका टप्प्यावर भिन्नलिंगी व्यक्तीबाबत उत्कट प्रेमभावना निर्माण होणं, हा निव्वळ निसर्गाचा भाग असतो. निसर्गाचा असतो म्हणून अत्यंत शुद्ध आणि साहजिकही असतो. या अवस्थेचा अगदी आदर्श शेवट म्हणजे जिच्यासंबंधी ही भावना मनात तरारून येते, रुजते आणि पुढेही आयुष्यभर मनात खोलवर टवटवीत राहते त्या व्यक्तीला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडून तिच्यासोबत जगण्याचा उत्सव करून घेणे.
पण हा शेवट ‘आदर्श’ असतो म्हणूनच तो प्रत्यक्षात उतरवणे बहुतेकवेळा अशक्यही होऊन जाते. कारणं काहीही असोत, माणसं अगदी तरु णपणीही निसर्गधर्माला न्याय देत नाहीत किंवा तो देण्यासाठी आवश्यक असलेलं मानसिक बळ त्यांच्यात नसतं, हे विदारक सत्यच शेवटी बाकी उरलेलं पाहायला मिळतं.
तारु ण्यात कुणावर तरी जीव जडणं ही गोष्ट वैश्विक असते. मात्र या वैश्विक भावनेचं रूपांतर आयुष्यभराच्या एका सुंदर नात्यात होणं-न होणं हे संबंधितांच्या भोवतालातल्या कठोर व्यवहारवादावर अवलंबून असतं. भोवताल म्हणजे केवळ शहरी-ग्रामीण असा नाही, भोवतालातल्या माणसांसकट, ती माणसं ज्यांना घट्ट लगटून असतात त्या जात-धर्म-प्रथा-परंपरांसकट, सामाजिक-आर्थिक स्थितींसकट असलेला त्यांच्या आसमंतातला कोरडा व्यवहारवाद.
अर्थात, माझं कॉलेज संपून आता दोन दशकं सरली आहेत. आताच्या मुलांच्या बाबतीत प्रेम या विषयात काय चाललेलं असतं हे या लेखाच्या निमित्तानं तपासून पाहायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की, निदान माझ्या अर्धग्रामीण-अर्धनागरी भागात तरी परिस्थितीत फारसा काही बदल झालेला नाहीच. सुमारे पंधराएक हजार वस्तीच्या माझ्या गावाच्या सबंध इतिहासात रीतसर कायदेशीर मार्गाने आंतरजातीय प्रेमविवाह केलेला कदाचित मी पहिलाच असेन. माझ्यानंतर मागच्या पंधरा वर्षात आणखी दोन-तीन आंतरजातीय विवाह गावात झाले. माझ्यासकट ही सगळीच आंतरजातीय लग्नं गावातल्या गावातली आहेत. म्हणजे मुलगा आणि मुलगी हे दोघेही आमच्याच गावातले, अशी. माझ्या विवाहाच्या वेळी बºयावाईट चर्चांनी आमचं गाव ढवळून निघालं होतं. माझ्यानंतरही अशा चर्चा झाल्याच; पण त्यात फारशी तीव्रता नव्हती. या नंतरच्या विवाहांनी माझ्या गावाने हा प्रकार स्वीकारला असेल का?
स्वीकारामागची कारणं शोधायचा प्रयत्न केला तर लक्षात येतं की, आमच्या गावाने हे स्वीकारलं त्यामागचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की ही लग्नं करणारी आम्ही सगळी मुलं गावात संख्येनं अतिशय अल्प असलेल्या जातींतून आलो होतो. आमच्यापैकी केवळ एकजण गावात मोठं संख्याबळ असलेल्या जातीतला होता. पण तो ‘मुलगा’ होता. त्याच जातीतली ती मुलगी असती तर कदाचित जोरकस (आणि हिंसकही) प्रतिक्रि या उमटू शकली असती. बाकीची आम्ही सगळीच मंडळी गावातल्या बाहुबली लोकांच्या फारशा खिजगणतीत नसलेल्या जातींतून आलेली. आमच्यामुळे गावाच्या मुख्य अस्मितेला धक्का लागण्याचं काही कारण नव्हतं. जेव्हा बलशाली लोकांच्या पारंपरिक जातीय अस्मितेला आणि अब्रूच्या कथित प्रतिष्ठेला असा धक्का बसतो तेव्हा काय होतं? तेव्हा सोनई किंवा खर्डासारखी जबर हिंसक प्रतिक्रि या उमटते. निसर्गाच्या साहजिक ऊर्मींना काल्पनिक जातीय प्रतिष्ठांची धारदार काटेरी कुंपणं लावून रोखण्याचा प्रयत्न निदान गावखेड्यात तरी मोठ्याच प्रमाणात यशस्वी ठरतो.
मुळात प्रेमात पडण्यासाठी आवश्यक असतो तो किमान मुक्त असा सामाजिक अवकाश ग्रामीण भागात अजिबातच नसतो. जवळच्या शहरातल्या कॉलेजात जाणाºया तरु ण मुलींनाही गावात खालमानेनेच चालावं लागतं, किंबहुना तसं चालत राहण्याचंच त्यांचं कंडिशनिंग बालपणापासून केलेलं असतं. त्यातूनही कुणी एकमेकांकडे आकृष्ट झालेच तरी त्यांना मोकळेपणाने भेटता-बोलता येईल अशा जागा नसतात. कुणाला कुणकुण जरी लागली तरी भयावह परिणामांना तोंड द्यावं लागण्याची रास्त धास्ती मनात कायम ठाण मांडून असते. अर्थात हल्ली प्रत्येकाजवळ फोन असतो. बोलण्यासाठी रोजच्या रोज एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याची फारशी आवश्यकता उरलेली नाही; पण तरीही बहुतेक मुलींच्या हालचालींवर घरच्या लोकांची काटेकोर नजर असतेच. त्यातूनही आपापले जोडीदार निवडून त्यांच्याशी विवाहबद्ध होणारे जिगरबाज असतातच कुठे कुठे; पण त्यांच्याकडे अपवाद म्हणूनच पाहावं लागतं.
गावातल्या-कुटुंबातल्या रिवाजांना ठोकरू शकणारी ग्रामीण मुलं प्रेमविवाहात जेवढी यशस्वी झालेली दिसतात, त्यात गावातल्या मुलींचं प्रमाण अगदीच विषम स्वरूपाचं आहे. आपल्या मुलीचं असं काही प्रकरण आहे अशी नुसती शंका जरी आली तरी झपाट्याने मिळेल तसा, जातीतला मुलगा शोधून तिचं लग्न लावून मोकळं होण्यात आईबाप अजिबात कसूर करत नाहीत.
देहामनात धडका मारत असलेला निसर्ग आणि अनुषंगिक तरल भावनांना ठोकरून लावल्यावर काय होऊ शकतं याचे एक माझ्यासमोर घडलेलं उदाहरण आहे. माझ्या माहितीतल्या एका मुलीचे एका मुलावर प्रेम होते. त्याचा सुगावा लागल्यावर पटकन तिचे शिक्षण बंद करून लगेचच महिनाभराच्या आत तिचे लग्न लावून टाकण्यात आले. लग्नानंतर मुलीने अर्थातच ‘आपलं नशीब’ असं म्हणून पदरात पडलेला संसार नेकीने स्वीकारला. पण तिच्या नवºयाला या तडकाफडकी लग्नसंबंधाने काही शंका आल्या. त्याने अतिशय उदार असल्याचा आव आणून अतिशय प्रेमाने तिला हळूहळू बोलते केले आणि जेव्हा तिचे पूर्वायुष्य माहीत झाले तेव्हा तिला गळफास लावून तो मोकळा झाला. अर्थात नंतर त्यालाही शिक्षा झालीच; पण त्या भोवºयात दोन कोवळी तरु ण आयुष्ये बरबाद होऊन गेली.
अर्थात, या असल्या उदाहरणांनी काळ थांबत नाही. निसर्गही गोठत नाही. तरु ण मुले-मुली परस्परांच्या प्रेमात पडतच राहतात. किंबहुना त्यांनी प्रेमात पडावेच एकमेकांच्या. फक्त त्याआधी किंवा त्यासोबत एक करावं :-छाती बुलंद करावी आणि मन निर्भय. पोट भरण्यासाठी इतरांवर भार टाकावा लागणार नाही याची काळजी घ्यावी. मग बेभान झोकून द्यावे प्रेमात. निसर्गाला सर्वंकषपणे रोखण्याची शक्ती कुणाही जातीत, कुठच्याही धर्मात नसतेच.
 

Web Title: Dahlka, the villain from the village of Lovestor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.