सायकलिंग!- तरुण जगात का बनतंय नवं ग्लॅमरस स्टाईल स्टेटमेण्ट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 07:00 AM2019-01-17T07:00:00+5:302019-01-17T07:00:12+5:30

तरुणांच्या आयुष्यात सायकल वेगानं परतली, तिला ग्लॅमर आलं आणि सायकलिंगचं व्यसन तरुणांना फिटनेससह थराराच्या नवीन जगातही घेऊन निघालं! पूर्वीच्या जुन्या साध्या सायकलची नवी ग्लॅमरस गोष्ट.

Cycling! - why cycle became the new glamorous style statement of youth? | सायकलिंग!- तरुण जगात का बनतंय नवं ग्लॅमरस स्टाईल स्टेटमेण्ट?

सायकलिंग!- तरुण जगात का बनतंय नवं ग्लॅमरस स्टाईल स्टेटमेण्ट?

Next
ठळक मुद्देसायकल? असं सिनिकपणे म्हणण्याचा काळ आता मागे पडला..फक्त पुढचा टर्न!

   समीर मराठे  

‘दूधवाला’ सायकल. माहितीये? आपले आजोबा, वडील, काका ज्यावेळी तरुण होते, त्याकाळी या सायकलची प्रचंड म्हणजे प्रचंड क्रेझ होती. ही सायकल प्रतिष्ठेचं लक्षण तर होतीच; पण त्यासाठी ते जीवही टाकत असत.
एकदम दणकट, ‘राकट’, वर्षानुर्वष काहीही न होणारी! ही सायकल अनेकांनी अक्षरशर्‍ पिढय़ान्पिढय़ा वापरली. जी सायकल मोठय़ा भावंडांनी वापरली, तीच नंतर त्यांच्या लहान भावंडांनी आणि नंतर त्यांच्या मुलांनीही! अक्षरशर्‍ वीस-वीस, पंचवीस-पंचवीस वर्षापेक्षाही जास्त आयुष्य या सायकलींनी पाहिलं. 
मुख्यतर्‍ दूधवाले ही सायकल वापरतात, वापरायचे, म्हणून त्यांना म्हटलं जातं ‘दूधवाला सायकल’! त्यावेळच्या तरुणांमध्ये या सायकलींची क्रेझ अफाट होती.
आजही तीन-चार हजारात मिळणारी आणि ‘आयुष्यभर’ चालणारी ही सायकल आता जवळपास हद्दपार झाली असली तरी नव्या रुपातील ‘गिअर्ड’ सायकलींनी तरुणांच्या आयुष्यावर गारूड केलं आहे. या सायकली त्यांना त्यांच्या जीवापेक्षाही प्यार्‍या झाल्या आहेत. 
मधली काही र्वष तरुणांच्या आयुष्यातून सायकल हद्दपार झाली होती. 
पण आता अचानक जबरदस्त वेगानं सायकल त्यांच्या आयुष्यात परत आली आहे.
नाशिक, पुण्यासारखी शहरं तर ‘सायकलींची शहरं’ म्हणून आता नावारुपाला येताहेत. या शहरांत सकाळच्या वेळी फक्त एक फेरफटका मारा. कुठल्याही रस्त्यावर किमान शे-दोनशे सायकलिस्ट दिसणारच!
इथे असे अनेक सायकलिस्ट आहेत, ज्यांच्याकडे एक नव्हे, दोन नव्हे, चार-चार, पाच-पाच सायकली आहेत आणि आपल्या सख्ख्या मित्रालाही ते या सायकलींना हात लावू देत नाहीत! 
कुणी मागितलीच सायकल तर सहज म्हणतात, यार, मेरी जान मांग, मगर सायकल मत मांग!
एक एमटीबी, दुसरी हायब्रिड, तिसरी रोडबाइक. प्रत्येक सायकलचं वैशिष्टय़ वेगळं आणि त्यांच्या किमतीही!
काहींच्या किमती तर स्मॉल सेगमेन्ट कारपेक्षाही महाग! 20 हजारांपासून ते लाख, दोन लाख, पाच पाच लाखार्पयत आणि त्यापेक्षाही महाग! पाहिजे तशी आणि अगदी कस्टमाइज्ड!
तुमची उंची किती, वजन किती, तुमचं पर्पज काय; म्हणजे तुम्हाला लॉँग डिस्टन्ससाठी सायकल हवीय, शॉर्ट डिस्टन्ससाठी हवीय, रेसिंगसाठी हवीय, ही सायकल फक्त गुळगुळीत रस्त्यावर पळवायचीय, थोडी ऑफरोडही चालवायचीय की डोंगरदर्‍यांतल्या खड्डय़ाखुड्डय़ांतही पिदडायचीय?
.एकदां नेमकं उद्दिष्ट ठरलं की मग त्यानुसार ज्याला जशी हवी तशी ‘टेलरमेड’ सायकल आता दारात येऊन उभी राहू लागली आहे. सायकल चालवण्याची खुमखुमी असेल तर ज्यासाठी चालवायची त्या प्रत्येक कारणासाठी आता वेगवेगळी सायकल मिळते.  
एवढंच नाही, कुठला आजार असेल, समजा  पाठदुखी आहे, मानेचं दुखणं आहे, गुडघेदुखी आहे, शोल्डर पेन आहे तर त्यानुसारही सायकलींची जुळणी केली जाऊ शकते! अर्थात या सार्‍यासाठी खिशात किती पैसे खुळखुळताहेत, यावर सारं काही अवलंबून असंतच.
मात्र तरुणाई सायकलकडे वळली, हा ट्रेन्ड तसा नवीन आहे.  ही क्रेझ मूळ धरू लागली त्याला फार र्वष नाही झाली; फार फार तर चार-पाच र्वष, पण या सायकलींनी एक झिंग तरुणाईत निर्माण केली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, या सायकली तरुणाईसाठी आज स्टाइल स्टेटमेन्टही झाल्या आहेत. तरुणांच्या आयुष्यात त्यांनी नवं ग्लॅमर आणलं आहे. 
अमेरिकेतली ‘रेस अक्रॉस अमेरिका’ (रॅम) ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि जगातील सर्वाधिक अवघड स्पर्धापैकी एक स्पर्धा. ही रेस जिंकलेले डॉ. हितेंद्र महाजन यासंदर्भात सांगतात, गेल्या चार-पाच वर्षात सायकलिंगच्या क्षेत्रात झालेली क्रांती, त्यात आलेली अत्याधुनिक टेक्नॉलॉजी, सायकलींची सहज उपलब्धता आणि सायकलिस्टना सर्वसामान्यांपासून ते उच्चभ्रूर्पयत; सार्‍यांकडून मिळणारा मान, रिकग्निशन यामुळे तरुणाईची सायकलिंग क्रेझ मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. 
त्यांच्या मते, सायकल हे असं पहिलं मशीन आहे, ज्यानं प्रत्येकाच्या मनात घर केलेलं असतं, त्याच्याशी त्यांचं लहानपणापासूनच नातं जुळलेलं असतं. त्यामुळेच सायकल ही स्टाइल स्टेटमेन्ट बनल्यानंतर अल्पावधीतच सायकली परत तरुणाईच्या आयुष्यात आल्या. शिवाय वेगाचा थरार, हेल्दी लाइफ स्टाइल आणि पर्यावरणाला हातभार या गोष्टीही सायकलीशी जोडल्या गेल्यामुळे तरुणाईसाठी ही सुवर्णसंधी ठरली. 
रतन अंकोलेकर हा मूळचा ठाण्याचा, पण नाशिकमध्ये स्थायिक झालेला एक तरुण सायकलिस्ट. काही वर्षापूर्वी डॉक्टरांनी त्याला सांगितलं, तुझ्या हृदयात शंभर टक्के ब्लॉकेज आहे. लवकरात लवकर बायपास करावी लागेल, नाहीतर तुझं आयुष्य केवळ काही दिवसांचं!
परिस्थितीमुळे एवढा खर्च करणं रतनला शक्य नव्हतं. त्यानं केवळ प्राथमिक उपचार घेतले. डॉक्टरांनी सांगितलेली औषधं काही दिवस घेतली आणि सायकलिंग सुरू केलं. त्याचा प्रचंड फरक पडला. रतन सांगतो, ‘काही महिन्यांनंतर मी पुन्हा त्याच डॉक्टरांकडे गेलो, तपासणी झाल्यावर त्यांनी विचारलं, तू कशासाठी आलास? त्यावेळी मीच त्यांना सांगितलं, काही महिन्यांपूर्वी तुम्ही मला बायपास करायला सांगितलं होतं!’
हाच रतन आज पूर्णपणे फिट आहे. गेल्या केवळ आठ महिन्यांत त्यानं दहा हजार किलोमीटर सायकलिंग केलं आहे. सलग तीनशे किलोमीटर, चारशे किलोमीटर, सहाशे किलोमीटर अशा सायकल राइड्सही त्यानं केल्या आहेत. अशी आणखीही काही उदाहरणं आहेत, ती अपवादात्मक आणि वैद्यकीय सल्लय़ाशिवाय असलं धाडस धोक्याचंच असलं तरी त्याचाही तरुणाईवर परिणाम होतोच.
सायकलची ही झिंग एकदा चढली की लवकर उतरत नाही. शहरातल्या तरुणांकडे पाहिलं की हे लक्षात येतं. केवळ तरुणाईच नाही, बर्‍याच ठिकाणी अख्ख्या कुटुंबालाच या सायकलींनी वेड लावलं आहे. आई, वडील, बहीण, भाऊ असे सारे एकाच वेळी, एकाच रस्त्यानं, सोबतीनं सायकल चालवताना आताशा  पाहायला मिळतात. 
सायकल ही फक्त गरिबांनीच चालवायची असते, त्यांच्यासाठीच ती असते हा ‘समज’च या नव्या सायकलींनी आणि सायकलस्वारांनी खोडून काढला  आहे. 
सायकल आता स्टाइल स्टेटमेन्ट बनू पाहते आहे! 

नवी सायकल विकत घेताना..


1. सायकलिंगला सुरुवात करण्यापूर्वी सायकलिंग करण्याचा आपला नेमका हेतू काय ते जाणून घ्या. म्हणजे सायकल आपल्याला फिटनेस म्हणून हवी आहे, सहज कधीतरी चालवायला म्हणून हवी आहे, डांबरी रस्त्यावरून आपण सायकल चालवणार आहोत की ऑफरोडला. त्यानुसार सायकलची निवड करा.
2. सुरुवातीलाच एकदम महागडी सायकल घेऊ नका. मित्राची किंवा कोणा नातेवाइकाची सायकल काही दिवस अगोदर चालवून बघा. आपली गरज आणि आपला खिसा किती गरम आहे, यावर शेकडो पर्याय आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत.
3. शक्यतो गिअर्ड सायकलच घ्या, कारण गिअरमुळे चढावावर आपले श्रम कमी होतात. अन्यथा अनेकजण हौसेनं सायकल विकत तर घेतात, पण काही दिवसांत ‘हौस’ फिटली की मग ती सायकल तशीच पडून राहाते. 
4. सायकलची गिअर सिस्टीम समजून घ्या. सध्या चांगल्या सायकली 21 गिअर्सपासून सुरू होतात. म्हणजे पुढे तीन आणि मागे सात. त्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे 21 गिअर्स. दोन-तीन राइडमध्येच तुम्हाला ही सिस्टीम लक्षात येईल आणि केव्हा, कुठले गिअर्स वापरायचे हे समजेल. ते समजलं की तुमची सायकलिंगची मजा कित्येक पटींनी वाढेल. 
5. सायकल जितकी दणकट, वजनदार तितकी ती चांगली असा पूर्वी समज होता; पण आताचं सूत्र आहे, सायकल वजनानं जेवढी हलकी तेवढी चांगली. कारण सायकलचं अनावश्यक ओझं आपल्याला ओढत बसावं लागत नाही. मात्र सायकल वजनानं जितकी हलकी तितकी तिची किंमतही जास्त असते.
7. खाली बघून कधीही सायकल चालवू नका. सायकल चालवताना नजर समाोर हवी. रॉँग साइडनं कार, मोटरसायकल्स चालवायच्या हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, अशा पद्धतीनं आपल्याकडे अनेकजण वाहनं चालवतात, त्यामुळे अ‍ॅक्सिडेन्ट होण्याचा धोका खूप वाढतो. 

नो. नाय.. नेव्हर!


1. सायकल चालवताना हेडफोन कधीच लावू नका. मागून येणार्‍या हॉर्नचे आवाज, गाडय़ा त्यामुळे आपल्याला कळत नाहीत. गाणी, म्युझिक ऐकायचेच असेल तर स्पीकर फोनवर ऐका.
2. सायकल चालवताना आपले डोळे आणि विशेषतर्‍ कान कायम उघडे ठेवा. मागून येणार्‍या आवाजाकडे लक्ष ठेवा. मागून येणारं वाहन नेमकं कुठे आहे, किती वेगानं येतं आहे, याचा अंदाज त्यामुळे आपल्याला येईल.
3. खूप वेळ हाय गिअरवर सायकल चालवू नका. त्यानं तुमच्या पायावर, गुडघ्यावर ताण येऊन गुडघेदुखी सुरू होऊ शकते. 
4. डोपिंग, उत्तेजक पदार्थापासून कायम दूर राहा. उत्तेजकांमुळे आपला परफॉर्मन्स वाढतोय, असं कदाचित तुम्हाला वाटेल; पण अंतिमतर्‍ सर्व दृष्टीनं ते घातक आहे.
5. ग्रुपनं सायकल चालवताना दोन सायकलींमध्ये योग्य अंतर ठेवा. शेजारी शेजारी न चालवता, एकापाठीमागे एक अशी सायकल चालवायला हवी.
6. जे नॉन सायकलिस्ट आहेत, त्यांनीही सायकल चालवणार्‍यांपासून किमान तीन फूट दूर राहायला हवं. परदेशात तर तसा नियमच आहे. अन्यथा त्या सायकलपटूला दुखापत करायचा तुमचा इरादा आहे, असं समजलं जातं आणि त्या व्यक्तीवर गुन्हाही दाखल होऊ शकतो. 


कुठली सायकल घ्यावी, हे कसं ठरवणार?
 

सायकलींचे मुख्यतर्‍ तीन प्रकार पडतात. 
एमटीबी (माउन्टन बाइक) - ही सायकल खडकाळ, मातीच्या, खड्डय़ाखुडय़ांच्या रस्त्यांवर चालवायला उत्तम. या सायकलींचे टायर बर्‍यापैकी जाड असतात. त्यामुळे सायकल पंक्चर होण्याचे प्रमाण कमी होते. मात्र ही सायकल चालवायला थोडी जड जाते. 
रोडबाइक - ही सायकल फक्त डांबरी, चांगल्या रस्त्यांवर चालवायला उत्तम. या सायकलचे टायर अतिशय बारीक असते आणि हॅन्डलही आतल्या बाजूला वळवलेले असते. सायकलचा शेप एरोडायनॅमिक असल्यानं या सायकलला अतिशय चांगला स्पीड मिळू शकतो. किमतीनेही ही सायकल महाग असते. 
 हायब्रिड सायकल - एमटीबी आणि रोडबाइक यांच्या मधला प्रकार म्हणजे हायब्रिड. तुम्ही डांबरी रस्त्यावर आणि थोडीफार ऑफरोडलाही सायकल चालवणार असाल तर ही सायकल सर्वोत्तम.


तुमच्या ‘मापाची’ सायकल


1. सर सलामत तो पगडी पचास. हे कधीही विसरू नका. आपली सेफ्टी सर्वात महत्त्वाची. कोणी काही म्हणायची लाज न वाटू देता, अगदी गल्लीतल्या गल्लीत जरी सायकल चालवायची असेल तरी हेल्मेट जरूर वापरा.
2. सायकल घेताना ज्या दुकानदाराकडून सायकल घ्याल, त्याच्याकडून ‘बाइक फिट’ जरूर करून घ्या. ‘माझ्या शरीराची उंची आणि ठेवण यानुसार मला बाइक फिट करून दे’, असं त्याला जरूर सांगा. गुडघेदुखी आणि इतर आजारांसाठी सायकलिंग अति उपयुक्त आहे; पण तुमच्या सायकलची उंची गरजेपेक्षा जास्त किंवा कमी असेल, हॅन्डल खूप दूर किंवा जवळ असेल तर गुडघेदुखी, पाठदुखीची समस्या तुम्हाला उद्भवू शकते. 
3. आपल्याला योग्य तोच गिअर वापरा. इतर कुणी हार्ड/हाय गिअरवर सायकल चालवतो, म्हणून तुम्हीही तसंच करू नका. सायकल चालवताना आपल्याला जास्त श्रम लागताहेत, असं वाटलं की लगेच सायकलचा गिअर कमी करा. सरावानं नंतर आपोआप तुमचा स्पीडही वाढेल. 
4. ‘सायकलचं सॅडल (सीट) जितकं मऊ, गुबगुबीत, तितकं चांगलं, त्यामुळे आपल्याला टोचणार नाही’, हा अनेकांचा सर्वात मोठा गैरसमज. खरं तर अनेक प्रोफेशनल सायकलिस्ट तुलनेनं थोडं कडक आणि स्लिक सॅडल पसंत करतात. तुम्ही जर लॉँग डिस्टन्स सायकलिंग करणार असाल तर सायकलचं सॅडल उत्तमच हवं, नाहीतर सॅडल सोअरचा त्रास होऊ शकतो.
5. सायकलचं प्राथमिक ज्ञान अत्यावश्यक. सायकलची जुजबी दुरुस्ती आपल्याला स्वतर्‍ला करता यायलाच हवी. पंक्चर काढता येणं तर मस्ट. ज्यावेळी तुम्ही कुठे बाहेर असता आणि सायकल पंक्चर झाली, चेन उतरली, ब्रेक लूज झाले तर ते तुमचं तुम्हाला करता आलंच पाहिजे. ती जुजबी दुरुस्ती करून तुम्ही निदान मेकॅनिककडे तरी जाऊ शकाल.
6. ट्रॅफिकचे सर्व नियम आवर्जून पाळायला हवेत. सायकलवाल्याला कोणी अडवत नाही, बोलत नाही म्हणून कुठेही, कशीही राइड करावी, रॉँग साइडनं चालवावी, सिग्नल तोडावेत असं नाही. असे प्रकार जीवावरही बेतू शकतात. 

Web Title: Cycling! - why cycle became the new glamorous style statement of youth?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.