- डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे

आमच्या हेल्पलाइनला मुलं फोन करतात. किंवा कौन्सिलिंगसाठी अगदी शाळकरी वयातली मुलंही आमच्याकडे येतात.. सांगतात, तसल्या साइट्स पाहतो. नेहमी पाहतो. पाहते. त्यातून वाटलं की, तसं काही करून पाहू.. मग परिचयातल्या, प्रेमातल्या कुणाबरोबर करतात हे मुलंमुली तसलं काही. (अर्थात मुलीही!) खास करून हॉस्टेलला राहणारी, आपापला ग्रुप असलेले मुलंमुली लहान मुलींना तसा सेक्शुअली त्रास देतात. म्हणजे त्यांच्याबरोबर तसलं काही करून पाहण्याचा प्रयत्न करतात. ते शूट करतात. त्यातली गंमत पाहतात. त्यांच्यासाठी हे सारं सेक्स कमी, एक खेळ असतो. मनाचा खेळ, त्यात त्यांना मजा येते. आणि मुख्य म्हणजे हे सारं प्रचंड अ‍ॅडिक्टिव्ह असतं त्यांच्यासाठी. त्यात वयात येतानाचे हार्मोेन्स कामाला लागलेले असतात. ते मागणी वाढवतात, वेड आणि उत्सुकता वाढवतात. लहान मुलांना त्रास देणारे त्यांच्यापेक्षा वयानं अगदी थोडे मोठे- म्हणजे दहा-बारा वर्षांची मुलंमुली पकडली जातात तेव्हा आमच्यासमोर एकच गोष्ट वारंवार येते. एक म्हणजे, त्यांना असा त्रास कुणीतरी दिलेला असतो, किंवा त्यांनी पाहिलेलं असतं ते. अनेकांना हे बॅड टच-गूड टच सुद्धा कळत नाही. कारण सुरुवातीला ते सारं हवंसं, चांगलंही वाटलेलं असतं. अनेक टीनएजर मुलं पोर्न पाहून ते सारं प्रयोग स्वत:वर करू पाहतात किंवा मग आपल्यापेक्षा लहानग्या मुलांवर ते सारं दमदाटी करून करतात. काहीजण स्वेच्छेने, एकमेकांच्या मदतीनं ते करून पाहतात, तसा प्रयत्न करतात. त्यातून नुस्तं व्यसन वाढत नाही. तर अनेकजण मारामारी करतात. अनेकदा मारामाऱ्या, शिवीगाळ केली जाते. दादागिरी करतात. दहशत माजवतात. ते मिळालं नाही पहायला तरी वेडीपिशी होत पुन्हा पुन्हा मिळवून मिळवून पाहतातच. दुसरा एक वर्ग आहे, तो प्रेमात पडणाऱ्यांचा. अगदी टीनएजच्या आधीच्या टप्प्यातसुद्धा प्रेमात पडणारे आज आहेत. प्रेमात पडण्याचा रोमान्स, त्यातली मजा, थ्रिल त्यांनी सिनेमात आणि सीरिअल्समध्ये तर पालकांसोबत बसून पाहिलेलं असतं. शारीरिक लगटही त्यांना फार चुकीची वाटत नाही, कारण ती ते रोज पाहतात. आणि आपण प्रेमात पडलेलो आहोत तर आपल्या प्रत्येक क्षणांचे फोटो काढून ठेवणं, व्हिडीओ करणं हे सारं या मुलांमध्ये आम आहे. ते सर्रास हे सारं करतात. शेअर करतात. ग्रुपवर टाकतात. फेसबुकवर टाकतात. शेअरिंग मोठ्या प्रमाणात असतं. आणि मग आपल्या जवळकीचे, नाजूक वाटलेल्या क्षणांचेही काहीजण फोटो/व्हिडीओ काढतात. आणि मग पुढं भांडण झालं, बिनसलं की मग एकमेकांना ब्लॅकमेलिंग करतात. एमएमएस बनवून पाठवतात. पोस्ट करण्याच्या धमक्या देतात. आणि मग या साऱ्यात अनेकदा मुली फार घाबरून जातात. अनेकदा घरी सांगतात. सांगत नाहीत. किंवा मग एखादी मैत्रीण हिंमत करून चाइल्ड हेल्पलाइनला फोन करते. किंवा मग पालकांनी पोलिसांत तक्रार केलीच तर केसेस आमच्यापर्यंत येतात. अगदी आत्महत्त्येच्या टोकापर्यंत जाऊन येतात मुलंमुली अनेकदा या प्रवासात हे पालकांना माहितीही नसतं. या मुलांच्या जगात अनेक वादळं आहेत. त्यांच्या शरीरात अनेक वादळं निर्माण होत आहेत. त्यांना लैंगिक शिक्षण, त्यातली शास्त्रीय माहिती योग्य वयात कुणी सहज देत नाहीत. त्याविषयी बोलत नाही. आणि दुसरीकडे त्यांची एक्साईटमेण्ट लेव्हल तर इतकी जास्त असते की ते मिळेल ते पाहतात. आपण काय करतो आहोत हे माहिती होण्याच्या आत त्यांचं ते करून झालेलं असतं.. अशा वादळी काळात आपण आहोत.. नुस्तं पोर्न नाही तर लैंगिक विषयाची खुलेआम उपलब्धता एकीकडे आणि त्याविषयीची चिडीचूप गुप्तता, संवादाचा अभाव दुसरीकडे हे असं चित्र आहे. आणि मुलं मात्र त्यांना जमतील तसे मार्ग काढत आहेत.. त्यातले काही अर्थातच चुकीचे आहेत.

(लेखिका पुण्याच्या चाइल्डलाइन हेल्पलाइनच्या संयोजक आहेत.)