चल यार, धक्का मार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:56 PM2017-07-19T16:56:40+5:302017-07-19T17:13:07+5:30

आपल्याला व्हायचं बरंच काही असतं.पण प्रत्यक्ष आपण कोणीच होऊ शकत नाही.मग आपण स्वत:लाच सांगतो,नाहीच जमत मनासारखं काही करायला!

Come on, shove. | चल यार, धक्का मार..

चल यार, धक्का मार..

Next

- प्राची पाठक

आपल्याला व्हायचं बरंच काही असतं.
पण प्रत्यक्ष आपण कोणीच 
होऊ शकत नाही.
मग आपण स्वत:लाच सांगतो,
नाहीच जमत 
मनासारखं काही करायला!
अशी मलमपट्टी करत 
पुन्हा स्वत:लाच बजावतो की, 
एक दिवस ना 
मी काहीतरी करूनच दाखवीन.
पण तो दिवसही कधीच उजाडत नाही.
आपण काहीच करत नाही.
असं का?

‘ढकलगाडी’ बघितली आहे?
शब्द तर माहीत आहे? 
आपण जेवढे ढकलू तेवढी ती गाडी पुढे जाते. आपण धक्का द्यायचे थांबलो, तर ती पण जिथे असेल तिथे, जशी असेल तशी थांबते. धक्का दिला की चालणार, धक्का देणं थांबलं की थांबणार. तिच्यात तिचे स्वत:चे पेट्रोल टाकायचीदेखील सोय नसते. म्हणून ढकलगाडी! चावी देऊन चालणारं खेळणं बघा. जितकी चावी दिली, तितकं ते चालतं. चावीचा पीळ संपला की एका जागी ठप्प!
आता आपल्या आयुष्याचा विचार करा. 
अशा किती गोष्टी आहेत, ज्या आपण स्वत:हून करतो. 
कोणत्या गोष्टी करतो? कुणासाठी का करतो? त्यात आपल्या स्वत:च्या आयुष्यासाठी काय आणि कसं करतो? का करतो? आपल्या आयुष्यात आपल्याला जे मिळवायचं असतं, त्यासाठीचे प्लॅन्स एकीकडे असतातच; पण ‘नाहीच जमत मनासारखं काही करायला’ हा मंत्र आपण येता जाता जपत राहतो. मंत्र म्हणण्यात वेळ गेला की ‘मला ना करायचं आहे एक दिवस’ याच टेपवर कॅसेट अडकते. आपल्या मनाला ते खूप अडकलं असल्याचा सततचा संदेश मिळतो. काही करण्यापेक्षा ‘करीन की एक दिवस’ मध्ये सगळी एनर्जी संपून जाते. होत काहीच नाही.
हे झालं करिअर गोल्सचं. 
घरातदेखील अनेक कामे असतात. अनेक छोट्या मोठ्या कामात आपण लक्ष घालावं अशी घरातल्या मंडळींची अपेक्षा असते. नुसती तात्पुरती जबाबदारी कोणीतरी किंवा ते काम गळ्यात कुणी टाकल्यावर करायचं म्हणून नाही तर स्वत:हून काही कामं करावीत, असं म्हणणं असतं. पण तो तर फार दूरचा टप्पा होऊन जातो मग. त्यात डोक्यात खुंट्या ठोकून पक्के केलेले जेंडर रोल्स असतात. हे काम मुलींचं, हे काम मुलांचं असला बकवास खेळ वर्षानुवर्षे सुरू असतो. आपल्या सोयीनुसार आपण त्या लेबलच्या मागे लपूनदेखील काही कामं ‘माझी नाहीत’ म्हणून सोयीस्कर टाळतो. 
मुलगा आहे, भांडी कशी घासणार? ‘तो’ घरात स्वयंपाक कसा करणार? ‘तो’ घर कसे टापटीप ठेवणार? आणि मुलगी आहे, गाडी दुरुस्त कशी करणार? एकटी कशी जाणार? अमुक काम थोडीच मुलीच्या जातीचं आहे? असं सगळं वर्षानुवर्षे होत राहिलेलं मनाचं फिक्सिंग आपण आपल्या आळस आणि सोयीनुसार वापरणार.
आयत्या हातात येणाऱ्या गोष्टी टाळणं सहज शक्य नसतं, मग पुरु ष असो की स्त्री की थर्ड जेंडर. स्वत:हून काही करायची ऊर्मी हीच ‘आयतं हातात’ सवय मारत असते. सतत छोटी मोठी कामं काहीतरी कारण काढून आपण टाळणार, पुढे ढकलणार. दुसऱ्यानं परस्पर ते काम करून टाकायची वाट पाहणार. पुरुष म्हणून जन्माला आल्यावर घरातल्या कितीतरी कामांमध्ये लक्ष घालणं कमीपणा समजून घेणार. बाहेरची कामं, दुरुस्ती कामं, एकट्यानं काही करणं माझं काम नाही, या टेपवर मुली अडकणार. असे गट करून टाकले की त्या-त्या कौशल्यापासून, शिकण्यापासून, कामातल्या आनंदापासून आपण दूर राहतो, हेदेखील लक्षात येत नाही. त्यामुळे आपलंतुपलं करण्यात, चालढकल करण्यात वेळ घालवून अगदीच गळ्यात पडलं तर जितकी चावी फिरवली, तितकंच काम आपल्याकडून होतं. कधी कधी तर चार वेळा सांगूनही एक काम अर्धंच होतं. सुरुवात करून परत काहीतरी कारणं काढून लांबणीवर पडतं. लांबणीवर पडलं की फसलंच. चावीचा फोर्स संपला की आपलं स्पिरिट संपलं. कोणी अगदीच गयावाया करून खूपच चावी मारली असेल, तशी इमर्जन्सी असेल तरच ते काम पूर्ण होतं. 
आपली चावी कायम दुसऱ्यानं मारायची अशी सवय घरातच होते आपल्याला. असं असूनही आपण मोठाल्या गप्पा झोडायला मोकळे. ‘अमुक ठिकाणी ना लोक काही कामच करत नाहीत,’ ‘अमक्याला घरात काही करायला नको’ वगैरे..
ते सारं आपल्या बाबतीतही तितकंच खरं आहे. आपलीही ढकलगाडीच झाली आहे, हे मात्र आपण मान्य करत नाही.
आणि मग ढकलत राहतो दिवस.. फक्त!

(मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)


ढकलगाडी
जोरात पळवायची आहे?
- हे करून पाहा!

एकदा का ढकलगाडी व्हायची सवय झाली की ती मोडता मोडली जात नाही. 
स्वयंप्रेरणा - शून्य! 
नवीन काही करायची ऊर्जा - शून्य. 
कामातलं सातत्य तर मायनस स्केलवर! 
रोज उठून काही करणं म्हणजे जणू शिक्षा. करतंय ना घरातलं कोणीतरी ते काम रोज, हे काम मुलीचं, हे काम मुलाचं या कप्प्यात. तर गुपचूप त्याचा लाभ घ्यायची सवय होऊन जाते.
हीच सवय आपल्या ध्येय गाठण्याच्या टप्प्यातदेखील मारक ठरते हे समजणं दूरच! आपल्याला व्हायचं बरंच काही असतं, पण प्रत्यक्ष आपण कोणीच होऊ शकत नाही. ‘आयुष्याच्या धकाधकीत’ असा डायलॉग मारायचा पर्याय असतोच नंतर! म्हणूनच आपली ढकलगाडी सवय घरातली वेगवेगळी कामं स्वत:हून काढून, करून जाते का असा प्रयोग करून बघायला हवा. जे घरातलं काम आपलं नाही असं आपल्यावर बिंबवलेलं असतं ते काम मुद्दाम करून बघायला हवं. त्यातली नजाकत शोधायला हवी. त्यात काय शिकण्यासारखं आहे ते मनात नोंदवायला हवं आणि काम करत करत प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेऊन बघायला हवा. रोज एखादी छोटी जबाबदारी घ्यायला हवी.
स्वयंप्रेरणेचे धडे गिरवायला हा प्रयोग घरच्याघरी, शून्य खर्चात, मोटिव्हेशनल भाषणबाजी ऐकायला न जाता करता येतो! करून बघायची ऊर्मी कमवावी लागते त्यासाठी. आपली ढकलगाडी होऊ न देण्यासाठी हे गरजेचंच आहे.
धक्का आपल्या आतून आणि आपला आपल्यालाच बसला पाहिजे. बाहेरून नाही! 
धक्का मार के तो देखो यार!

Web Title: Come on, shove.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.