लाखो ‘क्लाउड’ सांभाळण्यासाठी हार्डवेअरवाल्यांना मोठा स्कोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 07:00 AM2019-01-03T07:00:00+5:302019-01-03T07:00:08+5:30

माहितीनं गच्च भरलेल्या ढगांचं एक मोठं जाळं. त्या जाळ्याची देखभाल आणि त्यांची व्यवस्था पाहणारं वेगानं वाढतं काम.

cloud computing- a new job for hardware industry | लाखो ‘क्लाउड’ सांभाळण्यासाठी हार्डवेअरवाल्यांना मोठा स्कोप

लाखो ‘क्लाउड’ सांभाळण्यासाठी हार्डवेअरवाल्यांना मोठा स्कोप

Next
ठळक मुद्देक्लाउड कम्प्युटिंगच्या क्षेत्रात प्रोग्रॅमिंग करण्याच्या आशेनं अजिबात उतरू नये. हार्डवेअर, नेटवर्किग, सव्र्हरशी संबंधित असलेली कामं करणारे लोक यांना थोडंफार प्रशिक्षण घेऊन क्लाउड कम्प्युटिंगमध्ये शिरता येतं. 

अतुल  कहाते  

इंटरनेट जसं प्रगत होत गेलं तसतशा अनेक नव्या संकल्पना जन्मल्या. त्यामधली एक संकल्पना ‘क्लाउड कम्प्युटिंग’ची होती. यातला ‘क्लाउड’ हा शब्द कुठून आला? तर तो खरोखरच आपण मराठीत ज्याला ढग म्हणतो तोच क्लाउड! याचा संगणकशास्त्राशी काय संबंध? तर जसं आपल्या दृष्टीनं ढग ही एक संकल्पना असते आणि आपल्याला दुरून फक्त त्याविषयीच्या कल्पनांच्या भरार्‍या मारता येतात तसंच इथे घडतं. संगणकाच्या दुनियेत आपण आपल्याला हवी असलेली माहिती संगणकामध्ये थेट न साठवता ‘ढगांमध्ये’ म्हणजेच अज्ञात ठिकाणी साठवून ठेवतो आणि गरज असेल तेव्हा ती मिळवतो. म्हणून याला क्लाउड कम्प्युटिंग असं म्हणतात. 
ढगाची ढोबळ संकल्पना समजून घेणं जसं पुरेसं असतं तसं इथे ‘कुठेतरी’ आपल्याला हवी असलेली माहिती साठवलेली आहे आणि आपल्याला हवं तेव्हा ती मिळू शकते एवढं आपल्या दृष्टीनं पुरेसं आहे. म्हणजेच आपली माहिती आता आपल्या संगणकाच्या हार्ड डिस्कवर साठवलेली नसेल किंवा ती आपल्या पेन ड्राइव्हवरही नसेल. ही माहिती अ‍ॅमेझॉन, गूगल, मायक्रोसॉफ्ट यांसह इतर अनेक कंपन्यांनी पुरवलेल्या ‘क्लाउड’वर साठवलेली असेल. तिथून ती आपल्याला हवं असेल तेव्हा उपलब्ध करून दिली जाईल. तसंच आपण नवी माहिती भरली किंवा असलेल्या माहितीमध्ये बदल केले तर त्याच ठिकाणी म्हणजे क्लाउडमध्ये त्यानुसार बदल केले जातील. याचा मुख्य फायदा म्हणजे आपण कुठूनही आणि कुठल्याही संगणकावरून किंवा स्मार्टफोनवरून आपली माहिती सहजपणे मिळवू शकू.

हे भविष्यात महत्त्वाचे का ठरेल?

जगभरात माहितीच्या साठय़ाचं प्रमाण विलक्षण वेगानं वाढत चाललेलं असल्यामुळे आणि माहितींचे साठे एकमेकांशी जोडले गेलेले असल्यामुळे ते विखुरल्यासारखे ठेवण्यापेक्षा कुठूनही केव्हाही एकत्रितरीत्या मिळवण्याची सोय असली पाहिजे या संकल्पनेतून क्लाउड कम्प्युटिंगचा जन्म झाला. या तंत्रज्ञानाचा वापर यानंतर अनेक कारणांसाठी करण्याची टूमही निघाली. 
उदाहरणार्थ एखाद्या बॅँकेचं मुख्य काम आपल्या व्यवसायाकडे लक्ष देण्याचं असतं. अलीकडच्या काळात संगणकाशी संबंधित असलेल्या अत्याधुनिक सुविधा पुरवल्याशिवाय हे साध्य होणं अशक्य होऊन बसतं. म्हणून या बॅँकेला आपल्या संगणकीय कामासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांच्याशी संबंधित असलेले तंत्रज्ञ नेमावे लागतात. तसंच कुठलं हार्डवेअर विकत घ्यायचं, कुठलं सॉफ्टवेअर वापरायचं वगैरे गोष्टींमध्येही बॅँकेला नाक खुपसावं लागतं. हे काही प्रमाणात टाळून बॅँकेला क्लाउड कम्प्युटिंगचं तंत्रज्ञान वापरता येतं. म्हणजेच तंत्रज्ञानविषयक कंपनीला आपल्या कामाचं कंत्राट देऊन बॅँकेला आपल्या मुख्य व्यवसायाकडे आपलं लक्ष केंद्रित करता येतं. तंत्रज्ञानविषयक कंपनीकडे क्लाउड कम्प्युटिंगशी संबंधित असलेली सगळी कौशल्यं असल्यामुळे ती बॅँकेच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांचं काम सहजपणे करू शकते. छोटय़ा उद्योगांना तसंच वेबसाइट्सना तर ही संकल्पना खूपच आकर्षक वाटते. खर्चीक हार्डवेअर खरेदी करणं, त्याची निगा राखणं, माहितीचा बॅकअप नियमितपणे घेणं, सव्र्हर व्यवस्थितपणे सुरू आहे याची सातत्यानं काळजी घेणं ही कामं आता क्लाउड कम्प्युटिंग वापरून या विषयांमधल्या तज्ज्ञांच्या हाती सोपवणं शक्य झालं आहे. स्वाभाविकपणे भविष्यात अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर खूप वाढत राहील हे नक्की. आपण ‘गूगल डॉक्स’ किंवा ‘फ्रीस्पेस’ यांच्यासारख्या सुविधा वापरतो हेही क्लाउड कम्प्युटिंगच असतं!

हे शिकण्यासाठी कोणती कौशल्यं लागतात?

क्लाउड कम्प्युटिंगच्या तंत्रज्ञानामध्ये अनेक उपप्रकार असतात. क्लाउड सव्र्हर तयार करणं, त्याची निगा राखणं, क्लाउड सुरिक्षत ठेवणं, तो अद्ययावत ठेवणं, त्याच्यामध्ये वेळेनुसार भर टाकणं, नव्या तंत्रज्ञानानुसार त्यात सुधारणा करणं अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश होतो. ही कामं करू शकणार्‍या लोकांची भविष्यात खूप गरज भासणार आहे. यासाठी संगणकाची जाळी कशी चालतात, सव्र्हर संगणकाचं काम कसं चालतं, त्यांची निगा कशी राखायची, त्यामधल्या अडचणी कशा सोडवायच्या, यासारख्या गोष्टींची माहिती असावी लागते. मायक्रोसॉफ्ट विंडोज किंवा लिनक्स सव्र्हर अ‍ॅमिनिस्ट्रेशन अशा अभ्यासक्रमांमध्ये या विषयांचा समावेश असतो. 
अर्थात हे प्रशिक्षण घेणं पुरेसं नसतं. प्रत्यक्षात या गोष्टी वापरून बघणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणजेच अशा प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर किमान दोन-तीन र्वष हे तंत्रज्ञान वापरलं जात असलेल्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष अडचणींचा सामना करत अनुभव घेणं ही क्लाउड कम्प्युटिंगमध्ये शिरण्यासाठीची तयारीच असते. त्यानंतर क्लाउड कम्प्युटिंगशी निगडित असलेले विशिष्ट विषय शिकायला हरकत नसते. सर्वसाधारणपणे ज्यांना प्रोग्रॅमिंगची फार आवड नसते; पण सव्र्हरशी संबंधित असलेली कामं करणं, नेटवर्क्‍सची निगा राखणं अशी कामं आवडतात त्या लोकांसाठी हे आदर्श क्षेत्र आहे. म्हणजेच ‘सिस्टीम अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ची काम करू इच्छिणार्‍या लोकांना क्लाउड कम्प्युटिंगमध्ये शिरणं खूप सोपं आहे. आता तर त्यांच्यासाठी क्लाउड कम्प्युटिंग हे जणू पुढचं पाऊलच बनलेलं आहे. यासाठी इंजिनिअरिंग करणंही गरजेचं नसतं. संकल्पनांपेक्षा इथं प्रत्यक्षात काम करण्याची तयारी जास्त कामाला येते.

रोजगाराच्या संधी कोणत्या?

1. क्लाउड कम्प्युटिंगच्या क्षेत्रात प्रोग्रॅमिंग करण्याच्या आशेनं अजिबात उतरू नये. त्यांच्यासाठी इथे खास काही नसतं. हे क्षेत्र हार्डवर्क नेटवर्किग, सिस्टीम अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अशा विषयांमध्ये रस असलेल्या लोकांसाठी आहे. कारण क्लाउड कम्प्युटिंगमध्ये प्रोग्रॅमिंग करणं हे नेहमीच्या प्रोग्रॅमिंगपेक्षा फार काही वेगळं नसतं. त्यासाठी काही क्लृप्त्या शिकणं पुरेसं असतं. हार्डवेअर, नेटवर्किग, सव्र्हरशी संबंधित असलेली कामं करणारे लोक यांना थोडंफार प्रशिक्षण घेऊन क्लाउड कम्प्युटिंगमध्ये शिरता येतं. 
2. निरनिराळ्या कंपन्यांची क्लाउड कम्प्युटिंगच्या संदर्भातलं तंत्रज्ञान बर्‍याच प्रमाणात वेगवेगळी असतात. आपण नेमकं कुठल्या कंपनीच्या क्लाउड कम्प्युटिंगचं कौशल्य आत्मसात करायचं हे ठरवून त्यानुसार प्रशिक्षण घेणं गरजेचं ठरतं. उदाहरणार्थ अ‍ॅमेझॉन क्लाउड, गूगल क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट क्लाउड  यांच्यामध्ये खूप फरक आहेत. यामुळे हे सगळंच शिकण्याचा अट्टाहास बाळगण्यात काही अर्थ नाही. यामधलं एकच तंत्रज्ञान शिकून त्यामध्ये प्रावीण्य मिळवण्याचं ध्येय नजरेसमोर ठेवणं जास्त चांगलं. 
3. प्रशिक्षित लोकांना या सॉफ्टवेअर कंपन्या, मोठय़ा कंपन्या, सरकारी संस्था अशा ठिकाणी मुबलक प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. भविष्यात अशा संधींमध्ये मोठी वाढ होणार आहे. 

Web Title: cloud computing- a new job for hardware industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.