Chocolate gift, try a romantic case! | चॉकलेट गिफ्ट, रोमॅण्टिक मामला नक्की ट्राय करा!
चॉकलेट गिफ्ट, रोमॅण्टिक मामला नक्की ट्राय करा!


- भक्ती सोमण

व्हॅलेण्टाइन्स डेला गिफ्ट काय द्यायचं? मोठा प्रश्न. हटके हवं, स्पेशल हवं, खास हवं. ट्रेण्डी हवं पण देणार काय? अनेक वर्षे या साऱ्यावर जालीम तोडगा म्हणून चॉकलेट्स दिली जातात. कधी मोठ्या ब्रॅण्डचे, कधी हॅण्डमेड. कधी स्वत: बनवूनही दिले जातात;  पण त्याहून वेगळं असं काही कसं सुचावं?
त्यावर तोडगा काढायचा तर सध्या बाजारात अनेक चॉकलेटी गोष्टी उपलब्ध आहेत. त्यात उद्या चॉकलेट डे. पर्याय अनेक आहेत, फक्त जरा डोकं चालवायला हवं.

काय देता येईल ‘चॉकलेट’ गिफ्ट?
* केक आवडत असेल तर सध्या केकमध्ये चॉकलेट ट्रफल केक चलतीत आहेत. मस्त क्रिमी केक कापून हा आनंद द्विगुणीत करता येईल.
* तुम्हाला एकमेकांबरोबर गप्पा मारायच्या आहेत. गच्च पोट भरून खाण्यापेक्षा हलके आणि तेही चॉकलेटचे पदार्थ मागवता येतील. चीज फोण्ड्यू हमखास मिळतो. त्याप्रमाणे चॉकलेट फोण्ड्यूही मिळतो. या फोण्ड्यूबरोबर मार्शमेलोज, स्ट्रॉबेरी, केळ, चॉकलेट केक, ब्राउनी, कुकीज असे प्रकार देतात. स्टीकने ते या चॉकलेट सॉस (फोण्ड्यू)मध्ये घोळवून खायचे. हा प्रकार आरामात खाता येतो. कुणाला खास चॉकलेट ट्रीट द्यायची असेल तर हा पर्याय उत्तम आहे.
* चॉकलेट पॅनकेक , वफल्स विथ चॉकलेट, चॉकलेट सॅण्डविच हे प्रकारसुद्धा खाता येऊ शकतात.
* सिझलिंग ब्राउनी तर आॅल टाइम हीट. गरमागरम सिझलर्स प्लेटवर आलेली ती ब्राउनी आणि वरून ओतलेला गरमागरम सॉस. प्रेमळ गप्पांमुळे आनंदलेल्या मनाला या ब्राउनीमुळे आणखी तजेला येईल.
* काहीतरी भन्नाट पेय पिण्याचा पर्यायही आहे बरं का! तो म्हणजे फ्रीकशेक. यात आतमध्ये पाहिजे त्या फ्लेवरचं मिल्कशेक असतो. त्यावर आइस्क्रीमचा भलामोठा स्कूप, व्हीप क्रीम, वर ऑरियो बिस्कीट, चॉकलेटचा स्ट्रो, कॅडबरी, मार्शमेलोज, वफल्स, केक असं वाट्टेल ते भरपूर भरलेलं असतं. एवढा मोठ्ठा भरलेला जार दोन माणसं सहज पिऊ शकतात. दोघं मिळून पिण्याचा हा रोमॅण्टिक मामला आहे.
* चॉकलेट बुके तर मिळतातच; पण मोठ्ठा चॉकलेट बार द्यायचा असेल तर असं कुठलंही चॉकलेट देऊ नका बरं. यासाठी आता फ्लेवर आहेत. सुप्रसिद्ध शेफ विवेक ताम्हाणे सांगतात, मुलांना जर चॉकलेट गिफ्ट करायचं असेल तर कॅश्युनट, ट्रफल चॉकलेट गिफ्ट करा. आवडीप्रमाणे लिक्युअर चॉकलेट देण्याचाही ट्रेण्ड आहे. आणि मुलींना देताना हेझलनट, पिस्ता, व्हाइट चॉकलेट या फ्लेवरला पसंती द्या.
 


Web Title: Chocolate gift, try a romantic case!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.