चॅटबॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:52 PM2018-03-15T12:52:35+5:302018-03-15T12:52:35+5:30

भारतात ४० लाख लोकं आयटी सर्व्हिसमध्ये काम करतात. त्यातील २० लाख (म्हणजे निम्मे!) लोकं हे अजून ३-४ वर्षांत चॅटबॉट या विकसित तंत्रज्ञानानं ‘विस्थापित’ होण्याची शक्यता आहे!

Chatbot | चॅटबॉट

चॅटबॉट

googlenewsNext

- भूषण केळकर

आपण इंडस्ट्री ४.० चे नऊ मुख्य भाग बघितले. त्यातील रोबोटिक्स आणि सिम्युलेशन/इंटिग्रेशन हे पहिले दोन भाग आज आपण अधिक विस्तृतपणे समजावून घेणार आहोत. रोबोट हा शब्द मूळचा ‘रोबोटा’ या झेक शब्दावरून येतो. १९२० च्या सुमारास या शब्दाचा प्रथम वापर झाला. जोसेफ कॅपेक या झेक माणसाकडे रोबोट शब्दाचं जनकत्व जातं. जगात अनेक संस्कृतींमध्ये रोबोट या संकल्पनेची मुळं दिसतात. रोबोट म्हणजे गुंतागुंतीची एकसारखी कामे स्व-नियंत्रितपणे करू शकणारी प्रणाली वा यंत्र. प्रामुख्याने रोबोटमध्ये ‘यंत्र’ हा भाग महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृतीमध्येसुद्धा ‘लोकपन्नती’ याने बौद्ध अवशेष/ खुणांचे जतन करणारी यंत्रं ‘भूतवाहनयंत्र’ याचा उल्लेख केलाय. ‘समरांगण सूत्रधार’ या संस्कृत पुस्तकात यांत्रिक वाहक- नर्तक इत्यादींचा उल्लेख ११ व्या शतकात आहे. रोबोट्रिकचा इतिहास जेवढा रंजक आहे तेवढाच वर्तमान आणि विशेषत: भविष्यकाळ रोमहर्षक आहे यात शंकाच नाही.

इंडस्ट्री ४.० मध्ये रोबोट्सचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये होतो आहे. आपण आधीच्या लेखात गाड्या तयार करणाºया फॅक्टरीमध्ये होणारा त्यांचा वाढता वापर, विशेषत: युद्ध तंत्रज्ञानात होणारा वापर तसेच अगदी रेस्टॉरण्ट्समधील वेटर्स म्हणूनसुद्धा अगदी भारतातही होणारा वाढता वापर पाहिला. याच संकल्पनेत अजून दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बॉट्स व चॅटबॉट्स! बॉट ही एक संगणकीय प्रणाली/ सॉफ्टवेअर अप्लिकेशन असते की ज्यामुळे इंटरनेटवर स्वयंचलित कामं करता येतात. याची अनेक रुपं आहेत. नावं आहेत. उदा. इंटरनेट बॉट, वेब बॉट, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू रोबोट किंवा नुसताच बॉट. यांना एजंट असंही कधी कधी संबोधलं जातं.

यात एक विशेष रूप म्हणजे ‘चॅटबॉट’. आपल्या सगळ्यांना व्हॉइस चॅट माहिती असतं. याहू किंवा व्हॉट्सअ‍ॅप/ फेसबुकमुळे ‘चॅटिंग’ फंडा (संभाषण) आपल्याला नवीन नाही. जेव्हा रोबोट किंवा बॉट हाच चॅटिंग करतो त्याला म्हणतात चॅटबॉट!

भारताला हे चॅटबॉट का महत्त्वाचे आहेत? अहो, हेच बघा ना की, मेकॅन्सी या कंपनीच्या अहवालानुसार भारतात जे ४० लाख लोकं आयटी सर्व्हिसमध्ये काम करतात. त्यातील २० लाख (म्हणजे निम्मे!) लोकं हे अजून ३-४ वर्षांत या चॅटबॉटच्या विकसित तंत्रज्ञानानं ‘विस्थापित’ होण्याची शक्यता आहे! ज्याला सारं जग आणि विशेषत: भारत व फिलिपीन्स हे बीपीओ म्हणून ओळखतं, त्यात भारताची आयटीमधली खरी ताकद संख्येच्या पातऴीवर आहे. चॅटबॉट्सच्या प्रगतीमुळे बीपीओमध्ये मानवी सहभाग झपाट्यानं कमी होणार आहे हे नक्की.
इंडस्ट्री ४.० मधला दुसरा महत्त्वाचा भाग आहे. सिम्युलेशन आणि हॉरिझोंटल/ व्हर्टिकल इंटिग्रेशन. म्हणजे जे भौतिक जग आहे त्याची व्हिज्यूअल किंवा आभासी प्रतिमा करणं आणि या व्हर्च्युअल ट्विन किंवा ‘आभासी जुळे’ यांच्या सहाय्यानं अनेक कामं करणं.
आजकाल कंट्रोल रूममध्ये जगडव्याळ असणाºया कारखान्याचा ‘आभासी जुळा’ असतो आणि त्यामुळे नुसती माहिती मिळवणं एवढंच नव्हे तर कारखान्यातील विविध क्षेत्रांतील यंत्रांवर/ प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणंपण शक्य असतं. सिम्युलेशनचं अजून एक उदाहरण तुम्हाला देतो. अ‍ॅनटॉमॅग टेबल या नावानं सिम्युनेशनमुळे वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल झालाय. मानवी शरीराचे सर्व भाग आणि अस्थी, मांस, स्नायू, अवयव आणि त्वचा अशा सर्व पातळ्यांवर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी व डॉक्टर्स हे प्रत्यक्ष शवविच्छेदनाशिवाय प्रत्यक्ष शवाशिवाय ज्ञान मिळवू शकतात. अधिक माहितीसाठी जॅकचोई याचा ट्रेड कॉम वरील या विषयावरचा व्हिडीओ जरूर पाहावा.
रोबोट्स आणि सिम्युलेशनचा विचार करताना काही विचार मनात येतात. पुढे पुढे करून, खुशमस्करी करत लांगूलचालन करून वरिष्ठांची मर्जी सांभाळणाºया कर्मचाºयांना ‘रोबोट’ मॅनेजर बॉस म्हणून मिळाले तर त्यांची खैर नसेल आणि चांगले नेक काम करणाºयांना न्याय मिळेल हा भाग नक्की. परंतु, निदान आतातरी रोबोट मानवी भावविश्वात तोकडे आहेत हेही नक्की! आयक्यू पेक्षा इक्यू आणि कॉम्पिटिशनपेक्षा को- आॅपरेशनमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया फार प्रगत असतात. रोबोट ना आयक्यू असेल; पण इक्यू असणं आवश्यक आहे हेच जणू सांगायला नागरिकत्व मिळालेला पहिला रोबोट आहे सोफिया, एक स्त्री.
बदल आपल्यापासून असा फार लांब नाही.

( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)
bhooshankelkar@hotmail.com
 

Web Title: Chatbot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.