MBBS चा बॉण्ड : ‘सक्तीची सेवा’ करायला ग्रामीण भागात जावे... की न जावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 11:13 AM2017-11-16T11:13:24+5:302017-11-16T11:13:50+5:30

सरकारी सवलती घेऊन शिकलेल्या तरुण डॉक्टरांनी एक वर्षाची ‘सक्तीची सेवा’ करायला ग्रामीण भागात जावे... की न जावे?

Bond of MBBS: To make 'compulsory service' to rural areas ... should not it? | MBBS चा बॉण्ड : ‘सक्तीची सेवा’ करायला ग्रामीण भागात जावे... की न जावे?

MBBS चा बॉण्ड : ‘सक्तीची सेवा’ करायला ग्रामीण भागात जावे... की न जावे?

Next

महाराष्ट्रातील शासकीय व महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएसचे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य कोट्यातून पीजी अर्थात पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी एक वर्षाची बंधपत्रित सेवा पूर्ण केली असली पाहिजे अथवा १० लाख रुपये सरकारकडे भरले पाहिजेत असा निर्णय १२ ऑक्टोबर २०१७ रोजी महाराष्ट्र सरकारने जाहीर केला.
विद्यार्थी आणि पालक या निर्णयानं धास्तावले. ग्रामीण भागात जाऊन वर्षभर सेवा देऊ असा बॉण्ड अर्थात बंधपत्रित सेवेची हमी देणारा वायदा मेडिकलला प्रवेश घेताना आपण लिहून दिला होता हेच खरंतर अनेकांच्या लक्षात नव्हतं... त्यांचं तर धाबंच दणाणलं.
अर्थात हा प्रश्नच मुळात शासकीय महाविद्यालयांत एमबीबीएसचं प्रशिक्षण घेणाºया आणि पुढे शासकीयच महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यास करू इच्छिणा-यांचा आहे..
पण तसं असलं तरी या एका निर्णयाच्या निमित्तानं राज्यातील वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित अनेक प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत. मुख्य प्रश्न आहे तो राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची हेळसांड. तरुण तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा आणि अतिसामान्य आरोग्य सुविधा यामुळे उपचारांपासून वंचित समाज. या साºयाची बीजं वैद्यकीय शिक्षणाच्या प्रक्रियेत आहेत का? निदानकेंद्री शिक्षणाऐवजी पुस्तकी घोकंपट्टी परीक्षांमुळे स्पेशलायझेशन करू पाहणारे तरुण डॉक्टर ग्रामीण भागात जात नाहीत का? आणि जे जातात त्यांना ही व्यवस्था काय अनुभव देते? कसं स्वीकारते वा नाकारते?
वैद्यकीय शिक्षणविषयक प्रश्नांची मूलभूत मांडणी करणारा आणि उत्तरांची दिशा शोधू पाहणारा हा विशेष अंक.
यात एमबीबीएस करणाºया आणि ‘आम्ही अवश्य बॉण्ड पूर्ण करूच’ असं म्हणणाºया विद्यार्थ्यांची मनोगतं आहेत. ज्यांनी बॉण्ड पूर्ण केले, ग्रामीण-दुर्गम भागात जाऊन आरोग्यसेवा दिली अशा तरुण डॉक्टरांचं अनुभवकथनही आहे..
आणि आहे एक रोखठोक चर्चा... बॉण्डपूर्तीच्या विविध बाजूंची, मतांची आणि संभाव्य परिणामांचीही!


जाणार? का नाही जाणार?
शासकीय खर्चानं सवलतीच्या दरात शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्यावर एक वर्षभरही ग्रामीण भागात जाऊन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत काम करावं असं या तरुण डॉक्टरांना का वाटत नाही?
एमबीबीएस असलेला, ग्रामीण भागात जाऊन बॉण्ड पूर्ण करून आता केईएम हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणारा डॉ. आकाश तायडे म्हणतो, ‘तरुण डॉक्टरांना ग्रामीण भागातच जायला आवडत नाही, ते जातच नाहीत, हे गृहीतकच गैरवाजवी आहे. ग्रामीण भागात जायला विरोध नाही, विरोध आहे तो दीर्घकाळ चालणाºया शिक्षणप्रक्रियेला. साधारण १५ वर्षे लागतात एक स्पेशालिस्ट डॉक्टर व्हायला. इतकी वर्षे आर्थिक ताणासह वाढत्या वयाचं प्रेशर तरुण डॉक्टर कसं पेलतात हे जरा पाहा!’


तरुण डॉक्टरांना प्रॉब्लेम काय?
‘निर्माण’ या कृतिशील शिक्षण उपक्रमाद्वारे अनेक तरुण डॉक्टरांना सार्वजनिक आरोग्यसेवेशी जोडून देणाºया, दुर्गम आदिवासी भागात काम करण्यासाठी तरुण डॉक्टरांना प्रोत्साहन देणाºया अमृत बंग आणि डॉ. विठ्ठल साळवे यांचं मात्र स्पष्टच म्हणणं आहे.
ते लिहितात, जर शासकीय महाविद्यालयांत, सवलतीत उच्चशिक्षण घेता तर जिथं तुमची गरज आहे, तिथं जायला का कचरता? कारणं सांगता, आधी ग्रामीण भागात जा, मग बोला ! ग्रामीण भागात सेवापूर्तीचा हा बॉण्ड पूर्ण करावा लागेल हे जर फर्स्ट इअरलाच माहिती होतं, तर खासगी कॉलेजात जाण्याचा पर्याय खुला होताच. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला त्यापायी का आजारी करता?’


खासगी कॉलेजांना आयतं कुरण?

वैद्यकीय शिक्षणाबाबत निश्चित भूमिकाच नसलेल्या सरकारच्या ढिसाळ धोरणांचा पाठपुरावा ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी यांनी दीर्घकाळ केला आहे. महाराष्टÑाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा आणि वैद्यकीय शिक्षणप्रक्रियेचा त्यांचा दीर्घकाळाचा अभ्यास आहे.
ते लिहितात, परीक्षेला जेमतेम दोन महिने उरलेले असताना शासन नवीन फतवा काढतं, आणि काही हजार विद्यार्थ्यांना म्हणतं सेवापूर्ती करा, नाहीतर पैसे भरा! खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची कुरणं खुली व्हावी असा हेतू तर नाही या सा-यामागे?

 
- ऑक्सिजन टीम oxygen@lokmat.com

डॉक्टर, तुमचं काय? हा अंक वाचलात, तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेत असाल किंवा ते पूर्ण करून स्पेशलायझेशन करत असाल, तर तुमच्या प्रश्नांचं काही निदान या अंकात आहे असं वाटलं तुम्हाला? की याहून वेगळे काही प्रश्न, काही अनुभव आहेत तुमचे? ते काय?

तुम्ही पीजीची तयारी करत असाल, तर नेमक्या काय अडचणी आहेत त्यात? खरंच प्रवेशपरीक्षेचं टेन्शन पुस्तकाच्या चार भिंतीत वर्ष-वर्ष कोंडून घेतलं का? तुम्ही असं कोंडून घेतलं आहे का स्वत:ला? त्यात आर्थिक गरजा, वाढतं वय, घरच्यांच्या अपेक्षा या साºया समस्यांवर काय इलाज शोधलात? स्पेशलायझेशनची अत्यावश्यकता आणि वाढत्या वयाचा ताण याबाबत तुमचे अनुभव काय आहेत?
***
तुम्ही केला का बॉण्ड पूर्ण? केला तर तो अनुभव कसा होता? प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या अनुभवाने काय शिकवलं तुम्हाला?
***
...की अजून बॉण्ड पूर्ण केलाच नाही? का? करायची इच्छाच नव्हती, की सक्ती नव्हती म्हणून केला नाही?
***
वैद्यकीय शिक्षणप्रक्रियेत काय बदल झाले तर ते विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्याही सोयीचे असतील असं तुम्हाला वाटतं?
***
तुमच्या अनुभवांचं, मतांचं आम्हाला महत्त्व वाटतं. त्यातून शासकीय धोरणकर्त्यांनाही कदाचित काही मार्ग दिसू शकेल. ...तेव्हा अवश्य लिहा! शिक्षण आणि वय यांचा उल्लेख आवश्यक. नाव प्रसिद्ध होऊ नये अशी इच्छा असल्यास तसा स्वतंत्र उल्लेख अवश्य करा. तुमची ओळख गुप्त राहील!

आमचा पत्ता- या पानावर तळाशी आहेच. ईमेलही करता येईल oxygen@lokmat.com
-ऑक्सिजन टीम

Web Title: Bond of MBBS: To make 'compulsory service' to rural areas ... should not it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर