bhalu: a must watch shortfilm | तिला भालू म्हणून का चिडवत मित्रमैत्रिणी?
तिला भालू म्हणून का चिडवत मित्रमैत्रिणी?

- माधुरी पेठकर

सुंदर दिसण्याची हौस तरुण मुलींनाच असते असं कुठंय, शाळकरी वयातही ‘आपण सुंदर दिसावं’ ही इच्छा प्रबळ असते. उलट या वयात सुंदर दिसण्याचं  प्रेशरच आलेलं असतं.  पूर्वी निदान मुलांना असं प्रेशर नव्हतं, हल्ली तर मुलं आणि मुली दोघांनाही सुंदर दिसण्याचं टेन्शन येतं. आपण जसे आहोत तसं न स्वीकारता इतरांच्या नजरेत आपण छान दिसावं याचा नको इतका ताण मनावर येतो.
वयात येताना शरीरात बदल घडत असतात. त्याचा परिणाम शरीरावर आणि चेहर्‍यावर दिसू लागतो. ¨पंपल्स, पुटकुळ्या तात्पुरत्या आहेत हे उघड असतं; पण हे समजून घेण्याइतका समजूतदारपणा त्या वयात नसतो. आरशात बघताना स्वतर्‍तलं काहीही चांगलं दिसत नाही. स्वतर्‍ला कमी लेखणारे विचार मनात येतात हे इतरांना कळूही द्यायचं नसतं. आणि स्वतर्‍कडे बघून मनात जे चालेलं असतं ते रोखताही येत नाही. नकळत्या वयात असा दुहेरी झगडा वाटय़ाला येतो. आणि मग काहीबाही उपाय करून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. 
  ‘भालू’ या शॉर्ट फिल्ममधली 13-14 वर्षाची  आर्या. तिचं एकच स्वप्न असतं, तिला ब्यूटिपार्लरमध्ये जायचं असतं. शाळेतली मुलं तिला भालू चिडवत असतात. हाता-पायावर जरा प्रमाणापेक्षा जास्त उगवलेल्या केसांमुळं आर्या शाळेत गमतीचा विषय झालेली असते. ही थट्टा-मस्करी आर्याच्या मनाला लागते. तिला काही करून हाता-पायावरचे हे केस काढायचे असतात. पण, अजून शाळेतच असलेल्या आर्यानं बारावीर्पयत पार्लरचं नावच काढू नये असं तिच्या आईचं म्हणणं असतं. आरशापेक्षा जरा पुस्तकात डोकं घातलं तर प्रश्न मिटेल असं आईला वाटत असतं. मुलीला हे असं वाटण्यामागे सतत ब्यूटिट्रीटमेंट घेणारी बायकोच जबाबदार आहे असं आर्याच्या बाबांना वाटत असतं. आणि आर्याला कसंही करून फक्त पार्लर गाठायचं असतं.
सुखवस्तू घरातली असूनही आर्यासाठी पार्लरला जाणं इतकं सोपं नसतं. एकतर आई-वडिलांना आर्याची इच्छा कळत नाही. आणि आपल्या पॉकेटमनीतून आर्याला काही पार्लरचा खर्च करणं शक्य नाही. हाता-पायावरचे केस आणि मुलांची टिंगल यामुळे वैतागलेली आर्या मग लपून-छपून आपलं सेव्हिंग्ज वाढवते. तोर्पयत काही अघोरी उपायही करून पाहते. कधी वडिलांचं रेझर ब्लेड वापरून बघते. आईचं हेअर रिमूव्हल क्रीम वापरून बघते. पण होतं भलतंच. ती करत असलेले हे उपाय आईच्या लक्षात येतात. ओरडा खावा लागतो. पण, आर्या तिचे प्रयत्न काही सोडत नाही. 
एक दिवस आर्याचा पैशांचा गल्ला  भरतो. पार्लरला जाण्याचं स्वप्न आवाक्यात आलेलं असतं. ती पार्लरला जाते. पहिल्या वहिल्या व्हॅक्सिंगच्या जळजळीत वेदनाही  हसत हसत सहन करते. आता शाळेचा ड्रेस घालताना तिला संकोच वाटणार नसतो. किती दिवसांनी तिला छान शांत झोप लागते. पण, दुसर्‍या दिवशी आर्याला छळणारी आणखी एक दुसरीच समस्या  उभी राहिलेली असते.. 
शुभांशी मिश्राची ही शॉर्ट फिल्म.   तिच्या कल्पनेतून म्हणण्यापेक्षा तिच्या अनुभवातूनच तिनं आर्याचं कॅरेक्टर उभं केलं आहे. नकळत्या वयात सुंदर दिसण्याचा अतिताण शुभांशीलाही आला होता. पण, या ताणाशी दोन हात कसं करावं हे तिलाही कळलेलं नव्हतं. तिनेही स्वतर्‍वर अघोरी उपाय करून पाहिले. पुढे वय वाढत गेलं  तसे हे प्रश्न कधी संपले ते तिचं तिलाच कळलंही नाही. आज हसायला लावणारे ते प्रश्न शुभांशीसाठी त्या वयात अणुयुद्धाइतके गंभीर होते. 
शुभांशी म्हणते, वयाच्या एका टप्प्यात सुंदर दिसण्याचं प्रेशर प्रत्येकानं अनुभवलेलं असतं. आणि प्रत्येकाच्या ते वाटय़ालाही येतं. या वयात नुसता एकच एक प्रश्न कधीच नसतो. एक प्रश्न सोडवायला गेला की दुसरा उगवतो. दुसरा मिटला की तिसरा. असं चक्र एका विशिष्ट काळार्पयत चालूच असतं. हे सर्व धीरानं घ्या असं सांगणारं,  स्वानुभावानं मार्गदर्शन करणारं कोणी भेटलं तर  ‘आपल्यात का हे असं?’ असा न्यूनगंड वाटत नाही. वयात येताना शरीरात होणार्‍या बदलांविषयी जागरूकता येते. स्वत:ला स्वीकारण्याची वृत्ती विकसित होऊ शकते. आणि मग वयाला न पेलवणारे मार्ग स्वीकारण्याचीही गरज वाटत नाही. शुभांशीला हाच संदेश आपल्या ‘भालू’ या  शॉर्ट फिल्ममधून द्यायचा होता. 
संदेश देणारी फिल्म जरी शुभांशीला  बनवायची होती तरी तिला ती  रटाळ आणि प्रचारकी अशी करायची नव्हती. संदेश देणारी फिल्मही रंजक असू शकते या विचाराच्या शुभांशीनं ही फिल्म तयार केली. आणि म्हणून ती फिल्म पाहताना आपणही आपल्या अडनिडय़ा वयातले आपण आठवू लागतो. 
 
चौदा मिनिटांची ही  फिल्म पाहण्यासाठी लिंक. 
https://www.youtube.com/watch?v=WPqi8i1Ibhc

 


Web Title: bhalu: a must watch shortfilm
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.