तुम्ही आळशी आहात की बेजबाबदार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 02:51 PM2019-04-19T14:51:46+5:302019-04-19T14:51:58+5:30

आपण ज्या संगणकावर काम करतो, त्यावर साचलेली धूळही अनेकजण पुसत नाहीत, यातून काय दिसतं?

Are you lazy or irresponsible? | तुम्ही आळशी आहात की बेजबाबदार?

तुम्ही आळशी आहात की बेजबाबदार?

Next
ठळक मुद्देआपल्या कामाकडे पाहण्याची ही नजर आपलं करिअर घडवू शकते.

- विकास बांबल 

मार्चचा शेवटचा आठवडा. टार्गेट डोक्यावर. बरंच बाकी.
रोजच्या पेक्षा थोडं सकाळी लवकर निघायचं होतं.
म्हणून ड्रायव्हरला सांगितलं उद्या सकाळी 
6 वाजताच या म्हणजे लवकर निघता येईल.
सकाळी सांगितल्याप्रमाणे गाडी तयार होती.
गाडीत बसलो प्रवास सुरू झाला आणि त्याचबरोबर आमचा संवाददेखील सुरू झाला.
मी- गाडी सकाळीच पुसून तयार केली वाटते.
तो- हो साहेब. तरी आज लवकर लवकर कपडा मारला. मनासारखी पुसता आली नाही.
मी- अरे नाही खरंच नेहमीच गाडी स्वच्छ असते तुझी.
तो- साहेब ठेवावीच लागते. तिच्या भरवशावर रोजीरोटी आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा तिची जास्त काळजी घ्यावी लागते. आमच्या कुटुंबाचा गाडा ही गाडीच तर हाकते. हिच्याच भरवशावर आहे..
तो बोलत होता आणि त्याचे शब्द आता पुसट पुसट ऐकू येऊन विरून गेले. मी कुठं हरवलो काय माहिती.
ते शब्द सारखे पुन्हा पुन्हा माझ्या कानावर येत होते.
‘साहेब, या गाडीच्या भरवशावरच तर जीवन आहे, हिची काळजी मी स्वतर्‍पेक्षाही जास्त घेतो.’
मीसुद्धा नोकरी करतो. माझं जीवनदेखील मी ज्या कंपनीत काम करतो तिच्या अस्तित्वावर, त्या कामावरच अवलंबून आहे.
जेवढी ड्रायव्हर त्याच्या गाडीची काळजी घेतो, तेवढी काळजी मी घेतो का माझ्या कंपनीची. अर्थातच नाही.
ड्रायव्हरला सकाळी बोलावलं हजर, रात्री उशीर होतो तरी तोंडातून साधा ब्रदेखील नाही. आणि मला सुटीच्या दिवशी कामाला बोलावलं की मी लगेच कुरकुर करतो.
बोलून दाखवत नाही; पण मनात कुठेतरी दुर्‍ख असतं की आज सुटीच्या दिवशीदेखील बोलावलं.
केवढा मोठा फरक आमच्या दोघांत होता. 
आपल्या कामावर, आपण जिथं काम करतो त्या संस्थेवर आपण जिवापाड प्रेम करतो का? आज सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठय़ा प्रमाणावर खासगीकरण होत आहे. नुकतीच भारतीय दूरसंचार निगम कंपनीची बातमी वाचली ज्यात ती कंपनी आर्थिक दुष्काळात सापडली. कर्मचार्‍यांचे पगार देण्याची ताकदही आता कंपनीची राहिली नाही हे आपण वाचलं.
नवीन जागांची भरती तर दूरच उलट आहेत  त्या सरकारी नोकर्‍या कमी होत आहेत. 
उद्या माझ्या कंपनीवरदेखील ही परिस्थिती ओढावू शकते तर त्या परिस्थितीला किमान मी तरी जबाबदार राहू नये एवढी तरी काळजी मी घ्यायला हवी.
प्रश्न हा आहे की ती मी घेतो का?
आज या कंपनीमुळे समाजात मला वेगळं स्थान आहे, या नोकरीने मला मान, सन्मान आर्थिक स्थैर्य, उज्ज्वल भविष्य दिलं,
त्याबदल्यात मी माझे शंभर टक्के देतो का?
हे प्रश्न आपणच आपल्याला विचारले पाहिजेत.
माझ्या वडिलांनी मला सांगितलेली एक गोष्ट आठवली, मनुष्य जेवढा त्याच्या हक्काबद्दल जागरूक असतो तेवढाच तो आपला कर्तव्याविषयी असला तर त्याला हक्क मागण्यासाठी ओरड करावी लागत नसती.
एक घटना आठवतेय. एकदा मी वैयक्तिक कामानिमित्त एका सरकारी ऑफिसमध्ये गेलो असता, संगणकावर धूळ साचलेली होती, ज्या संगणकावर आपण रोज काम करतो ती संगणकसुद्धा स्वच्छ, व्यवस्थित ठेवू नये एवढी उदासीनता कर्मचारी यांची का असावी?
एखाद्या ठिकाणी मला माझ्या कंपनीचे चार पैसे वाचवता येत असेल तर का वाचवू नयेत? उलट आपल्या घरचं काय जातं, आपण कशाला करा या वृत्तीचंच दर्शन जास्त घडतं. गाडी जसा ड्रायव्हर स्वच्छ ठेवतो, तिला जपतो तसा मी माझ्या कंपनीच्या प्रतिमेला जपतो का? माझ्यामुळे कंपनीचे नाव खराब होणार नाही याची काळजी मी घेतो का?
आपल्याच ऑफिसच्या भिंतींवर पान-गुटखा खाऊन पिचकार्‍या मारणारे दिसतात, त्यांना काय म्हणावे?
कार्यालय सोडण्यापूर्वी जाताना दिवे, पंखे, संगणक, सर्व ऊर्जेची उपकरणे व्यवस्थित बंद करून जाणं ही कुणाची जबाबदारी? आपली नव्हे का? की तेवढय़ासाठी शिपायाची वाट पाहायची?
जवळ जवळ अर्धा तास मी विचार करत होतो.
तेवढय़ात साहेब ऑफिस आलंय, या आवाजानं माझी विचारांची तंद्री तुटली.
आणि मी गाडीतून उतरलो.
पण त्यादिवशी ड्रायव्हरने बरंच काही शिकवलं होतं. आपल्या कामाकडे पाहण्याची ही नजर आपलं करिअर घडवू शकते, आपल्याला समाधान आणि आनंद देते, हे लक्षात ठेवलं तरी बदल घडेल!

 

Web Title: Are you lazy or irresponsible?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.