अन लाज न बाळगता गॅरेज टाकलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 05:40 PM2019-07-18T17:40:52+5:302019-07-18T17:49:08+5:30

नोकरी करायची नाही हे नक्की होतं; पण बिझनेस करायचा तर काय? पैसे नव्हते आणि घरात कुणी बिझनेस केल्याचा अनुभवही नव्हता. पण मला तेच करायचं होतं, त्यामुळे कोण काय म्हणेल याचा विचार न करता मी शेवटी ठरवलंच .

And start Garage ! | अन लाज न बाळगता गॅरेज टाकलं!

अन लाज न बाळगता गॅरेज टाकलं!

googlenewsNext

- स्वप्निल पठाडे

ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्याचा विचार डोक्यात नव्हता. पण तरीदेखील काही दिवसांसाठी कॉल सेंटरवर काम करून बघू असा विचार केला. काम करताना आनंद तर होता आणि सोबतचे सहकारीदेखील तितकेच जवळचे वाटत होते. पण तरीदेखील हे घड्याळ्याच्या काट्यावर पळणारं आयुष्य आणि बँक बॅलन्समध्ये वर्षाच्या शेवटीदेखील झालेली तुटपुंजी वाढ या दोन्ही गोष्टी नकोशा वाटू लागल्या. नोकरी करून एखाद्या धंद्याचं सेटअप लावू असं मनात होतं. पण जेव्हा नोकरीमध्ये गेलो तेव्हा कळालं की दोन्ही गोष्टी करायच्या म्हटलं तर एक काहीतरी फरफटत जाणारं हे नक्की. त्यामुळे दोघांपैकी एक काहीतरी हाच एक पर्याय समोर होता.

एकीकडे होती 8-5 ची नोकरी, महिन्याकाठी खात्रीशीर मिळणारी एक ठरावीक रक्कम, कुठलाही धोका नाही आणि अडचणीदेखील नाही अशी स्थिती. दुसरीकडे होतं धंद्यासाठी उभा करावं लागणारं भांडवल, धोका पत्करण्याची तयारी, ना ठरावीक काम, नफा किंवा तोटा यांचा नसलेला अंदाज, आजपर्यंत नातेवाईक किंवा जवळच्या लोकांमध्ये कोणालाही धंद्यात नसलेला अनुभव.

साहजिकच दुसरी बाजू धोक्याची होती.

काय करणार कसं करणार याचा काही नीटसा अंदाज नव्हता, कोणाची साथ मिळेल ना मिळेल याचादेखील काही अंदाज नव्हता. पण नोकरी करणं हे माझं कधी स्वप्न नव्हतं आणि केवळ मनात असलेल्या भीतीमुळे मी जे स्वप्न मनात होतं ते असं वार्‍यावर सोडू शकत नव्हतो. त्यामुळे ठरवलं, जे होईल ते बघता येईल. निर्णय मात्र ठाम ठेवायचा.

आता अजून यापुढचा प्रश्न होता, तो म्हणजे नेमकं करायचं काय?
आवड तर 2-3 गोष्टीमध्ये होती. खाद्यपदार्थ, कॅफे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आणि माझ्या बाइक्स..
मला माझं स्वत:च शोरूम काढायचं होतं; पण एकदमच मोठी सुरुवात करता येणार नाही हे तर उघड होतं. म्हणून मी स्टार्टअप सुरू करण्याचा विचार केला. पण नेमकं काय आधी सुरू करावं याचा प्रश्न पडला होता. मित्रांसोबत भागीदारीमध्ये फूड मार्केटमध्ये सुरू करण्याचा विचार केला; पण कोणी शेवटपर्यंत तग धरून राहील असं दिसेना. त्यामुळे जे करायचं ते स्वत:चं स्वतंत्र करू असं मनाशी ठरवलं. 
पण प्रश्न होताच, करणार काय?
जे मनात होतं तेच मी केलं, मी गॅरेज सुरू केलं.
भीती होतीच की, काम सुरू झाल्यावर लोक म्हणतील की गॅरेज टाकलंय, गाड्या धुण्याचं काम करतोय. पण म्हटलं जे ठरवलं, जे आहे जसं आहे ते आपलं आहे. आपल्या जिवावर आहे, मग कोण काय म्हणेल, काय विचार करेल याची पर्वा कशाला..
आणि कामाचा श्री गणेशा करायचं ठरवलं.
कामामध्ये पडल्यावर त्यातल्या बारीक बारीक अडचणी दिसू लागल्या, येणारे छोटे-मोठे अडथळे दिसू लागले आणि नाही काही झालं तर आजूबाजूचे लोक असतातच की खाली खेचायला. पण तरीदेखील शेवटपर्यंत जिद्द कायम ठेवण्याचं ठरवलं. प्रत्येक पावलावर येईल ती अडचण संधी समजून पुढे जात राहिलो. माझ्या आई-वडिलांनी मला प्रत्येक पावलावर साथ दिली हे मोलाचं आहे. कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी मला ढासळू दिलं नाही, कधी हताश झालेल्या मला मायेचा आधार तर कधी उदास असेल तर आनंदाच्या सरी बनून मला सतत भक्कम बनवत गेले. त्यांच्याकडून मिळालेला अजून एक वारसा म्हणजे काहीही झालं तरी शेवटपर्यंत आपण आपला सरळ मार्ग कधीही सोडायचा नाही. त्यांची हीच शिकवण मला आज आयुष्यात इथवर घेऊन आली आहे.

धंद्यातले बारकावे आता कळायला लागले आहे आणि प्रत्येक पावलावर लागणारी हुशारीदेखील अंगात भिनते  आहे. नफा-तोटा या गोष्टी तर आयुष्यभर चालूच  राहणार; पण त्यातून मार्ग कसा काढायचा याची पक्की जाणीव आता झाली आहे. धंद्याने गती पकडली आहे आणि दुसरीकडे अजून एका दुकानाचं कामदेखील सुरू झालं आहे. लवकरच फूड फ्रॅन्चाइझीदेखील घेण्याचा विचार चालू आहे. आणि या सगळ्या काळादरम्यान झालेली एक अमूल्य गोष्ट म्हणजे मी माझं एक पुस्तकदेखील लिहिलं आहे आणि लवकरच ते प्रकाशितदेखील होत आहे. मी माझ्यातल्या ज्या गोष्टी आवड म्हणून, छंद म्हणून जोपासल्या त्या गोष्टी आज मला एका लेखकाचं स्थान देताय हेदेखील माझं नशीबच.

आज वाटतंय, जर तेव्हा ती सरळमार्गी नोकरी करत बसलो असतो तर कदाचित मी अजूनदेखील तिथेच असलो असतो आणि ‘मला असं करायचं होतं’ हे माझ्या मित्रांना सांगत बसलो असतो.
त्यामुळे मला असं वाटतंय की आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघालं की, आपल्या स्वप्नांचा रस्ता आपल्यासाठी मोकळा होतो; पण हो त्या मार्गावर चालत राहण्याची हिंमतदेखील असायला हवी. कारण जे करताय त्यामध्ये जर यश आलं नाही तर आपला निर्णय चुकीचा कसा होता हे सांगण्यासाठी हजारो लोक उत्सुक होऊन वाट बघत असतात. ‘मी असं केलं असतं’ब चे सल्ले अगदी उत्तम देतात; पण जेव्हा ती गोष्ट प्रत्यक्षात करायची वेळ येते तेव्हा मात्र अंग काढून घेतात. त्यामुळे न घाबरता आपल्याला हवं ते विचारानं करावं. आपण चालायला लागलो की मार्ग आपोआप सापडतात.. आणि महत्त्वाचं म्हणजे, कधीही कुठल्याही कामाची लाज बाळगू नये, आपण आपलं काम चोख केलं की झालं !

swapnilpathade59@gmail.com

Web Title: And start Garage !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.