अंब्रेला- ही शॉर्टफिल्म पाहिली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:36 PM2018-10-04T16:36:29+5:302018-10-04T16:37:15+5:30

पैसे फेका नि सेवा घ्या असं नव्या जगण्याचं चक्र. पण मग त्या चक्रात फिरणार्‍या माणसांच्या मनात, जगात कधी डोकावणार आपण?

Ambrella - did you watch the short film? | अंब्रेला- ही शॉर्टफिल्म पाहिली का?

अंब्रेला- ही शॉर्टफिल्म पाहिली का?

Next
ठळक मुद्दे वरवर असंवेदनशील वाटणार्‍या या वास्तवाच्या आत मात्र हाडामासाचं एक जग आहे, एक गोष्ट आहे. ती समजून घेण्याची उसंत आपल्याला आहे का, हा प्रश्न आहे. 

- माधुरी पेठकर

सध्या आपलं जगणं खूप धावपळीचं झालंय. कोणाला कोणाकडे बघायला फुरसत नाही. त्यात रोज वाढत जाणारे व्याप जरा म्हणून उसंत घेऊ देत नाही. त्यानं हाडामासाच्या माणसांचं पार यंत्र केलंय. वरवर असंवेदनशील वाटणार्‍या या वास्तवाच्या आत मात्र हाडामासाचं एक जग आहे, एक गोष्ट आहे. ती समजून घेण्याची उसंत आपल्याला आहे का, हा प्रश्न आहे. 
 ‘अवधूत’ ही उसंत घेतो. एका फूड डिलेव्हरी बॉयशी तो भरपावसात थांबून बोलतो. त्याला हवा असलेला रस्ता दाखवतो आणि त्याला उपयोगी पडेल न पडेल यांचा अंदाज नसताना भरपावसात कस्टमरचं घर शोधत फिरणार्‍या त्या डिलेव्हरी बॉयला आपल्या हातातली छत्री देतो. 
ओल्या काळजाचा हा अवधूत भेटतो तो  ‘अंब्रेला’ या शॉर्ट फिल्ममध्ये. मुंबईतल्या भर पावसातल्या रात्री अवधूत कानात इअर फोन अडकवून, हातात छत्री धरून आपल्या रूमवर चाललेला असतो. कानात गाण्याचा आवाज आणि सभोवताली कोसळणारा पाऊस. तेवढय़ात आपल्याला मागून कोणीतरी हाका मारतंय, हे अवधूतच्या लक्षात येतं. तो मागे वळतो. थांबतो. त्याच्यासमोर भांबावलेला डिलेव्हरी बॉय उभा असतो. त्याला मुंबईच्या गल्ल्यांमध्ये हरवलेला एक पत्ता हवा असतो. एक तासापासून पत्त्याअभावी भरपावसात खोळंबलेला हा डिलेव्हरी बॉय. कस्टमरने 15  मिनिटात मागवलेली ऑर्डर एक तास उलटूनही त्याच्याचकडे पडून असते. पत्ता सापडत नाही म्हणून माघारी फिरलं तर हॉटेलमालक कच्चा खाईल ही भीती आणि पत्ता सापडूनही ग्राहक शिव्या घालील ही धास्ती. पण त्याला दुसराच पर्याय योग्य वाटतो. म्हणून भरपावसात कोणी फिरकायलाही तयार नसलेल्या वाटेवर तो तासभर थांबून राहातो. त्या वाटेवर त्याला अवधूत भेटतो. अवधूत त्याला पत्ता तर सांगतोच; पण पावसानं आणि पत्ता सापडत नसल्याच्या भीतीनं थिजून गेलेल्या त्या डिलेव्हरी बॉयची तो काळजीनं आणि आपुलकीनं चौकशीही करतो.
बोलण्यात भोजपुरी झाक असलेला तो डिलेव्हरी बॉय बिहारमधल्या सिवान गावातला. तिकडे घरी आई-वडील आणि तीन लहान भावंडं असलेला तो काम शोधत मुंबईत आलेला. कामाला लागून पाच दिवसच झालेल्या या मुलाला तिकडे गावाकडे पैसे पाठवण्याची चिंता लागलेली. पण अजून पगाराला 25 दिवस बाकी असतात ही त्याची व्यथा. पगार म्हणून महिन्याच्या शेवटी त्याला अवघे 2200 रुपये मिळणार असतात. पण खाण्याराहण्याची सोय हॉटेलमालकानं केलेली असल्यानं स्वतर्‍कडे अवघे 200 रुपये ठेवून गावाकडे 2000 रुपये पाठवण्याची त्याची तयारी असते. आपल्यापेक्षा गावाकडे असलेल्या पाच माणसांची गरज मोठी असते. या गरजेची जाणीव अवधूतशी बोलताना त्याच्या डोळ्यातून वाहत असते. अवधूत सुन्न होतो. आपली छत्री त्याच्याकडे सोपवून भिजत रूमवर पोहोचतो. इकडे रूममेट फोनवर खाण्याची ऑर्डर देऊन जेवण घेऊन येणार्‍या  डिलेव्हरी बॉयची चडफडत वाट पाहात असतो. तोंडानं लाखोली वाहात असतो. अवधूत त्याला भेटलेला डिलेव्हरी बॉयचा अनुभव मित्राला सांगतो. जेवण घेऊन येणार्‍या डिलेव्हरी बॉयची खटीया खडी करू इच्छिणार्‍या त्या मित्राला डिलेव्हरी बॉयकडे बघण्याची एक माणुसकीची नजर भेटते.
ही माणुसकीची नजर प्रेक्षकांर्पयत पोहोचविण्यासाठीच प्रियशंकेर घोष आणि त्याचा मित्र कुंदन रॉय यांनी 11 मिनिटांची  ‘अंब्रेला’ ही हिंदी शॉर्ट फिल्म बनवली. 
एकदा मुंबईच्या गर्दीत बसमधून उतरल्यावर कुंदनला असाच एक डिलेव्हरी बॉय भेटलेला. कुंदननं हा अनुभव प्रियशंकेरला सांगितला. प्रियशंकेरला हा अनुभव फिल्मद्वारे मांडावासा वाटला. मित्रांची गॅँग जमवली. ज्या कंपनीत काम करत होता तिथला कॅमेरा घेऊन शूटिंग करायचं ठरवलं. महिनाभर मग सकाळी 9 ते 6 डय़ूटी आणि पुढे मग रात्रभर फिल्मच शूटिंग.  
रट्टा मारू शिक्षणात टप्पा खाल्लेला  प्रियशंकेर फिजिक्सचा नाद सोडून मास कम्युनिकेशनच्या मार्गावर आला. तिथे फोटोग्राफी शिकला. मग एका कंपनीत लागला. फूड फोटोग्राफी करू लागला. पण काम आवडीचं असलं तरी रूटीन मात्र रटाळ वाटू लागलं. या रूटीनमधून बाहेर पडण्याची संधी त्याला  ‘अंब्रेला’या फिल्मनं दिली.
 
***
   ‘अंब्रेला’ ही हिंदी शॉर्ट फिल्म या लिंकवर पाहता येईल.

https://www.youtube.com/watch?v=NrIpXkuusus 

Web Title: Ambrella - did you watch the short film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.