थ्रीडी प्रिंटिंग- इंजिनिअरिंगनंतरची नवी वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 07:00 AM2019-01-03T07:00:00+5:302019-01-03T07:00:11+5:30

साधी खुर्ची असो, इमारत असो की मोठ्ठा पूल, हे सगळं आता थेट ‘छापता’ येऊ शकतं!

3D printing - New job after engineering | थ्रीडी प्रिंटिंग- इंजिनिअरिंगनंतरची नवी वाट

थ्रीडी प्रिंटिंग- इंजिनिअरिंगनंतरची नवी वाट

Next
ठळक मुद्देएकंदरीतच उत्पादन क्षेत्रामधल्या अनेक पारंपरिक समजुती एका फटक्यात दूर करण्याची ताकद थ्रीडी प्रिंटिंगमध्ये आहे

अतुल  कहाते  

आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची रचना संगणकावर करायची आणि त्यानंतर ती वस्तू प्रत्यक्षात तयार करायची या संकल्पनेला ‘थ्रीडी प्रिंटिंग’ म्हणतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वस्तू त्रिमितीय असते. तसंच सर्वसाधारणपणे संगणकामध्ये कशाचीही रचना करून झाल्यावर ती छापली की कागदावर काहीतरी उमटणार असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. इथे मात्र आपण कागदी छपाईविषयी बोलत नसून प्रत्यक्षात एखादी वस्तू ज्यापासून तयार करणं अपेक्षित असतं त्यापासूनच ती बनते. 
 उदाहरणार्थ आपण प्लॅस्टिकच्या खुर्चीबद्दल बोलत असलो तर थ्रीडी प्रिंटिंगचा वापर करून आपल्याला अशी प्लॅस्टिकची खुर्चीच ‘छापता’ येईल म्हणजे तयार करता येईल. हे ऐकायला जरा विचित्र असलं तरी म्हणूनच या तंत्रज्ञानाची क्षमता भल्याभल्यांना चक्रावून सोडणारी आहे असं आपण म्हणू शकतो. तांत्रिक भाषेत थ्रीडी प्रिंटिंगला ‘अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग’ असंही म्हणतात. याचं कारण म्हणजे यात तयार होणार्‍या त्रिमितीय वस्तूमध्ये सातत्यानं थोडीशी भर घालणार्‍या प्रक्रिया केल्या जातात आणि याचा शेवट वस्तूच्या निर्मितीत होतो. म्हणजे काय तर या वस्तूमध्ये वापरल्या जाणार्‍या गोष्टींचे थर एकावर एक लेपले जातात आणि असं करत करत शेवटी ती वस्तू तयार होते. यामुळे क्लिष्ट वस्तूसुद्धा नेहमीच्या उत्पादनप्रक्रियेच्या मानानं कमी कच्चा माल वापरून तयार करता येतात.  मानवी श्रमांचीसुद्धा बचत होते. या ‘वस्तू’ म्हणजे फक्त खुच्र्यासारख्या सोप्या गोष्टी नसून अख्ख्या इमारती किंवा पूल अशा प्रकारच्या अतिक्लिष्ट गोष्टीही असू शकतात! संगणकाचा वापर करून आपण त्या अक्षरशर्‍ ‘छापू’ शकतो!

हे भविष्यात महत्त्वाचं का ठरेल?


औद्योगिक  क्रांतीमुळे  जग  बदललं असं आपण  नेहमीच  म्हणतो.  अशा  क्रांतीची वाटचाल  सुरूच  राहिली आणि आता अनेकजण चौथ्या औद्योगिक  क्रांतीविषयी बोलत आहे. या क्रांतीमध्ये थ्रीडी प्रिंटिंगचा मोठा वाटा आहे. कुठल्याही वस्तूची निर्मिती करण्यासाठीची प्रक्रि या आमूलाग्रपणे बदलण्याची कमाल या तंत्रज्ञानामध्ये साधली जाते. आपण  परंपरागत  शब्दप्रयोगानुसार  जिला  औद्योगिक क्रांती म्हणतो तिला आता पहिली औद्योगिक क्रांती असं म्हणतात. यात अर्थातच वाफेच्या शक्तीचा वापर करण्यात आला. यानंतर विजेचा वापर उत्पादनामध्ये  केला जाण्याला सुरुवात झाली आणि यातून दुसरी  औद्योगिक क्रांती घडली. यामुळे एकाच वेळी मोठय़ा  संख्येनं वस्तू तयार करणं म्हणजेच मास प्रॉडक्शन शक्य  झालं. तिसर्‍या औद्योगिक क्रांतीमागे डिजिटल तंत्रज्ञान  होतं. याचं पुढचं पाऊल म्हणजे अत्याधुनिक  सॉफ्टवेअरचा वापर आणि यंत्रांनी एकमेकांशी संवाद  साधण्यातून उत्पादनाच्या दुनियेत नवे चमत्कार घडवून  आणणं. हीच आपली चौथी औद्योगिक क्रांती असेल. 
थ्रीडी प्रिंटिंगचा वापर करून भविष्यात उत्पादन क्षेत्रामधल्या अनेक अडचणी दूर करणं शक्य होईल. तसंच उत्पादनावरचा खर्च कमी होईल. जेव्हा हव्या असतील तेव्हाच वस्तू तयार करता येतील. अर्थातच पुन्हा एकदा याचा फटका अकुशल मनुष्यबळाला बसेल. उपलब्ध असलेल्या कामांच्या संधींमध्ये घट होईल. एकंदरीतच उत्पादन क्षेत्रामधल्या अनेक पारंपरिक समजुती एका फटक्यात दूर करण्याची ताकद थ्रीडी प्रिंटिंगमध्ये आहे; हे नक्की!

हे शिकण्यासाठी कोणती कौशल्यं लागतात?

थ्रीडी प्रिंटिंगमध्ये वापरल्या जाणार्‍या प्रिंटर्सचे अनेक प्रकार असतात. काहीजण याला एकत्रितपणे ‘थ्रीडी प्रिंटिंगचं तंत्रज्ञान’ असंही म्हणतात. आपण तयार करत असलेल्या वस्तू मूळ मटेरिअलचे एकावर एक थर सावकाशीनं रचून त्यांना योग्य प्रकारे जोडणी देण्याची किमया थ्रीडी प्रिंटिंग करतं. यासाठी अर्थातच संगणक आणि विशिष्ट प्रकारचं ‘थ्रीडी मॉडेलिंग सॉफ्टवेअर’ यांचा वापर केला जातो. याची सुरुवात पूर्वीपासून लोकप्रिय असलेल्या ‘कॉम्प्युटर एडेड डिझाइन (कॅड)’पासून होते. कॅडमध्ये आपण जी वस्तू तयार करू इच्छितो त्याचा एक नमुना तयार केला जातो. हा नमुना किंवा हे मॉडेल वाचून थ्रीडी प्रिंटिंग पुढची प्रक्रिया सुरू करते. म्हणजेच कॅड सॉफ्टवेअरनं तयार केलेल्या नमुन्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य त्या मटेरिअलचे एकावर एक थर रचण्याची प्रक्रि या सुरू होते. हे मटेरिअल म्हणजे प्लॅस्टिक, एखादा द्रवरूप पदार्थ, पावडर, कागद आणि इतर असंख्य धातू असं काहीही असू शकतं. 
साहजिकच थ्रीडी प्रिंटिंगच्या उद्योगात शिरायचं असेल तर या सगळ्या गोष्टींमधले बारकावे समजून घ्यावे लागतात. त्यासाठी इंजिनिअरिंगशी संबंधित असलेली ड्रॉइंग्ज करणार्‍या एखाद्या कंपनीत अनुभव घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामधले बारकावे शिकल्यानंतर थ्रीडी प्रिंटिंगकडे वळणं शक्य होईल. त्याचबरोबर थ्रीडी प्रिंटिंगमधल्या अनेक तंत्रज्ञानांमधलं नेमक्या कुठल्या तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर करायचा आहे हेसुद्धा ठरवावं लागेल. याचं कारण म्हणजे यात स्टिरिओलिथोग्राफी, डिजिटल लाइट प्रॉसेसिंग, फ्युज्ड डीकॉम्पोझशिन मॉडेलिंग असे आणि इतर अनेक प्रकार असतात. नेमकं काय तयार करायचं आहे आणि किती खर्चीक प्रक्रिया करण्याची आपली तयारी आहे त्यानुसार हे ठरतं. त्यानुसार त्यातल्या एकामध्ये घुसणं ही यामधली पुढची पायरी म्हणता येईल.

रोजगाराच्या संधी कोणत्या?

1. अगदी सुरुवातीलाच महत्त्वाचा मुद्दा. इथे आपण थ्रीडी प्रिंटर तयार करण्याविषयी बोलत नसून अशा तयार प्रिंटरचा वापर करत असताना कोणती कौशल्यं उपयोगाची ठरतात याविषयी बोलत आहोत. कारण थ्रीडी प्रिंटिंगसाठीचा प्रिंटर तयार करणं ही काही विशिष्ट कंपन्यांचीच मक्तेदारी आहे. हे काम अजिबातच सोपं नाही. त्यासाठी लागणारं भांडवल आणि प्रशिक्षित मनुष्यबळ या गोष्टी सर्वसामान्यांच्या पार आवाक्याबाहेरच्या आहेत. 
2. थ्रीडी प्रिंटिंगचा वापर आता वाहननिर्मिती, रचनाकारांची कामं, हवाई क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स, उत्पादन क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, दागिने आणि सजावट करणारे, पॅकेजिंग उद्योग, आपल्या नेहमीच्या वापरातल्या वस्तूंची निर्मिती अशा असंख्य कामांमध्ये केला जातो. हे काम भारतासारख्या देशामध्ये करण्याचे खूप फायदे आहेत. एक तर आपल्याकडे कुशल कारागिरांची कमी नसते. शिवाय तुलनेनं इथे स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध असतं. अशा लोकांना नेहमीच्या पद्धतीनं थ्रीडी प्रिंटरचा वापर करून वस्तूंची निर्मिती कशी करायची याचं प्रशिक्षण दिलं तर हे मनुष्यबळ अत्यंत कुशलतेनं या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतं. 

Web Title: 3D printing - New job after engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.