ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - भारतीय क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणा-या युवराज सिंगने क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा टी 20 मधील आपल्या ऐतिहासिक खेळीची आठवण करुन दिली. वानखेडेवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान नॉर्थ झोनकडून खेळणा-या युवराज सिंगने तीन चेंडूवर सलग तीन सिक्स मारत प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपल्या विस्फोटक फलंदाजीचा अनुभव देत चांगलंच मनोरंजन केलं. युवराजच्या या दमदार खेळीनंतरही नॉर्थ झोनचा मात्र सेंट्रल झोनकडून पराभव झाला. 
 
वानखेडे स्टेडिअमवर सेंट्रल झोन आणि नॉर्थ झोनदरम्यान सामना सुरु होता. सेंट्रल झोनने यावेळी 167 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. नॉर्थ झोनला विजयासाठी 18 चेंडूत 52 धावांची गरज असताना युवराज सिंग मैदानात आला. यावेळी युवराज सिंग मैदानात आला आणि सर्वांच्या आशा उंचावल्या. 
 
युवराजने विस्फोटक फलंदाजी करत अनिकेत चौधरीच्या गोलंदाजीवर सलग तीन चेंडूवर तीन सिक्स मारत संघाला विजयाच्या दिशेने नेलं. युवराजने झंझावती खेळी करत 20 चेंडूत 33 धावा केल्या. पण नॉर्थ झोनचा फक्त चार धावांनी पराभव झाला. संघाचा पराभव झाला तरी प्रेक्षकांसाठी मात्र युवराज सिंग हिरो ठरला.