जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा : भारताच्या महिला संघाला सांघिक जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 10:36 AM2019-02-18T10:36:44+5:302019-02-18T10:37:15+5:30

पहिल्या जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला संघाने सांघिक विजेतेपदाचा मान पटकावला.

World Mallakhamb Championship : India's women's won the team title | जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा : भारताच्या महिला संघाला सांघिक जेतेपद

जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा : भारताच्या महिला संघाला सांघिक जेतेपद

googlenewsNext

मुंबई : पहिल्या जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला संघाने सांघिक विजेतेपदाच्या प्रथम क्रमांकावर २४४.७३ गुण मिळवून आपले नाव नोंदवले आहे.  ४४.४५ गुण मिळवून सिंगापूरने आणि ३०.२२ गुण मिळवून मलेशियाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये जवळपास १५० हुन अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या संपूर्ण स्पर्धा बघण्यासाठी  भारतभरातील विविध राज्यांमधून आजी-माजी मल्लखांब पटूंनी हजेरी लावली होती. विश्व मल्लखांब फेडरेशनच्या विद्यमाने आणि भारतीय मल्लखांब महासंघ तसेच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना यांच्या वतीने संपन्न झालेल्या  मुंबई मधील श्री. समर्थ व्यायाम मंदिर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये जगभरातून इराण, मलेशिया, सिंगापूर, व्हिऐतनाम, जपान, इंग्लंड, भारत, नॉर्वे, बहारीन, फ्रान्स, इटली, स्पेन, झेक रिपब्लिक, अमेरिका, जर्मनी  अशा १५ देशांनी सहभाग घेतला आहे. विविध देशातून आलेल्या स्पर्धकांचे दोरी आणि पुरलेल्या मल्लखांबावरचे सादरीकरण बघण्यासाठी साधारण तीन-चार हजार प्रेक्षक उपस्थित होते. सांघिक विजेतेपदाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक संघामध्ये सहा खेळाडू असणे आवश्यक होते. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी प्रत्येक खेळाडूला दोरी आणि पुरलेला मल्लखांब अशा दोन साधनांवर दोन लहान आणि दोन मोठे असे चार संच करणे अनिवार्य होते.  महिला आणि पुरुष वयोगटातून निवडल्या गेलेल्या सर्वोत्तम सर्वोत्तम दहा खेळाडूंमध्ये वैयक्तिक अजिंक्यपदासाठी स्पर्धा क्रमांक दोनमध्ये सुरस रंगली. तर स्पर्धा क्रमांक तीनचे विजेतेपद साधनांवर केल्या जाणाऱ्या लहान आणि मोठ्या संचांमधील सर्वोत्तम कामगिरी साठी देण्यात आले.

महाराष्ट्राची संस्कृती जपणारा मल्लखांब महाराष्ट्रातील अनेक जिल्यांमध्ये मोठ्या कुशलतेने खेळला जातो. या स्पर्धेच्या निमित्ताने साताऱ्यामधील कारी मल्लखांब संघ, विले-पार्ले मधील पार्लेश्वर व्यायामशाळा यांनी मल्लखांबाचे सादरीकरण केले. ओरिसा मधून आलेल्या श्रीलताने केलेल्या पुरलेल्या मल्लखांबावरच्या सादरीकरणाने  भारतामध्ये विस्तरलेल्या मल्लखांबाचे प्राबल्य दिसून आले. 
स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने महिला विभागात द्वितीय आलेल्या इटलीच्या डेलिया सेरुटीने दोरी मल्लखांबावर तर जपानच्या कोइको टाकेमोटोने पुरलेल्या मल्लखांबावर आपले संच सादर केले. पुरुष विभागातून दीपक शिंदे आणि सागर ओहळकर यांनी दोरी आणि पुरलेल्या मल्लखांबावर आपले कौशल्य सादर केले. नुकतंच जीवन गौरव पुरस्कराने सन्मानित केलेल्या श्री. उद्य देशपांडे यांच्या जर्मनी मधील मल्लखांब खेळाडूंनी संगीताच्या चालीवर आपले मनोरे सादर केले. श्री समर्थ व्यायाम मंदिरात प्रशिक्षण घेणाऱ्या दोन योगासन पट्टुनी योगासनाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक केले.

मल्लखांबामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कर मिळवलेल्या आदित्य अहिरे ( सातारा), यशवंत साटम( मुंबई उपनगर), राजेश राव( मुंबई उपनगर), रवींद्र पेठे(पुणे), महेंद्र चेंबूरकर(मुंबई उपनगर), शांताराम जोशी(रत्नागिरी), नंदा शिंदे(मुंबई शहर ), चित्रा खवळे( मुंबई शहर), पंकज शिंदे( पुणे), सत्यजित शिंदे ( पुणे), विक्रांत दाभाडे ( सातारा) , कल्पेश जाधव( मुंबई उपनगर), प्रदीप चेंबूरकर( मुंबई उपनगर ) या तेरा खेळाडूंकडून स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.  

Web Title: World Mallakhamb Championship : India's women's won the team title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई