विश्वचषक कॅरम : प्रशांत मोरे आणि अपूर्वा यांना विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 01:25 PM2018-09-06T13:25:42+5:302018-09-06T13:26:38+5:30

यापूर्वी २०१६ मध्ये युकेमध्ये झालेल्या विश्व् अजिंक्यपद स्पर्धेमध्यही प्रशांत व अपूर्वाने भारताला एकेरी गटात सुवर्ण पदक मिळवून दिले होते.

World Cup carrom: Prashant More and Apurva win the title | विश्वचषक कॅरम : प्रशांत मोरे आणि अपूर्वा यांना विजेतेपद

विश्वचषक कॅरम : प्रशांत मोरे आणि अपूर्वा यांना विजेतेपद

Next
ठळक मुद्देसांघिक गटातही भारताने जेतेपद पटकावले आहे.

मुंबई : चुनचीऑन, दक्षिण कोरीया येथे झालेल्या विश्वचषक कॅरम स्पर्धेत भारताच्या प्रशांत मोरे आणि एस. अपूर्वा यांनी जेतेपदाला गवसणी घातली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये युकेमध्ये झालेल्या विश्व् अजिंक्यपद स्पर्धेमध्यही प्रशांत व अपूर्वाने भारताला एकेरी गटात सुवर्ण पदक मिळवून दिले होते. त्याबरोबर सांघिक गटातही भारताने जेतेपद पटकावले आहे.


  विश्वचषक कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत भारताच्या प्रशांत मोरेने भारताच्याच कर्णधार रियाझ अकबरअलीला  तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत २५-५, १९-२५, २५-१३  असे पराभूत करून विजेतेपद मिळविले. पहिला सेट प्रशांतने सहज जिंकून सुरुवात छान केली होती. परंतु दुसरा सेट रियाझने जिंकला व सामना बरोबरीत आणला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये प्रशांतने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि विजयश्री खेचून आणत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. रियाझला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.


महिला एकेरी गटात भारताची एस. अपूर्वा विजयी ठरली. तिने अंतिम सामन्यात आपली प्रतिस्पर्धी भारताची काजल कुमारी हिचा २५-५, २५-१४ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला.उपांत्य सामन्यात काजलने अनुक्रमे आयेशाला २५-९, २५-२१ तर अपूर्वाने रश्मीला २५-१२, १८-२५, २५-३ असे पराभूत केले होते. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये भारताच्या आयेशा मोहम्मदने संघातील सहकारी कर्णधार रश्मी कुमारीला ५-२५, २५-१७, २५-१० असे तीन सेटमध्ये पराभूत करत कांस्य पदक पटकाविले. 


 पुरुष दुहेरीत अंतिम सामन्यात भारताच्या रियाझ अकबरअलीच्या साथीने प्रशांत मोरे जोडीने भारताच्या झहीर पाशा व सगायभारती जोडीवर १०-२५, २५-४,२५-८      असा विजय मिळविला. त्यामुळे भारताने सुवर्ण व रौप्य पदकाची कमाई केली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये श्रीलंकेच्या निसांथा फर्नांडो व चामील कुरे जोडीने त्यांच्या संघातील शाहीद व उदेश जोडीला १६-७, २५-१४ असे पराभूत केले व कांस्य पदक पटकाविले.


महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात कर्णधार रश्मी कुमारीच्या व आयेशा महम्मद या भारताच्या जोडीने आपल्या संघातील सहकारी एस. अपूर्वा व काजल कुमारी जोडीवर  २-२५, २५-७, २२-२० अशी मात केली व अनुक्रमे या जोडीने सुवर्ण व रौप्य पदक पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये श्रीलंकेच्या रोशिथा व याशिका जोडीने श्रीलंकेच्याच चलानी व मदुका जोडीवर २५-०, १०-६ अशी सहज मात करत कांस्य पदक मिळविले.

 
महिला सांघिक गटात भारतीय संघाने श्रीलंकेला ३-० असे सहज पराभूत करून सुवर्ण पदक पटकाविले. भारताच्या विजयात रश्मी कुमारीच्या, एस. अपूर्वा व काजल कुमारीचा महत्वाचा वाटा होता. तिसऱ्या क्रमांकावर कांस्य पदकाची कमाई करताना मालदीवजने जपानच्या संघाला ३-० अशी धूळ चारली. पुरुष सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा संघ पुन्हा एकदा वरचढ ठरला. २०१६ सालच्या विश्व चषकाची पुनरावृत्ती करताना यावेळीही श्रीलंकेने भारतावर २-१ असा निसटता विजय मिळविला. कर्णधार रियाझ अकबरअली आजारी असल्यामुळे सगायभारतीला खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु नवोदित सगायभारती व प्रशांत मोरेच्या पराभवामुळे भारताला सुवर्ण पदकास मुकावे लागले. झहीर पशाचा एकमेव विजय भारताने मिळविला.

 
या स्पर्धेदरम्यान झालेल्या स्वीस लीग स्पर्धेमध्ये भारताच्या काजल कुमारीने कमाल केली. तिने साखळीतील सातही सामने जिंकले. यात तिने श्रीलंकेचा चामील कुरे, प्रशांत मोरे व रियाझ अकबरअली सारख्या मातब्बर खेळाडूंना मात दिली. केवळ ४० मिनिटांच्या १ सेटचा फटका या खेळाडूंना बसला. काजलने एकंदर १०७ गुणांची कमाई  केली. दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानणाऱ्या श्रीलनेच्या चामील कुरेने ८३ गुण मिळवून दुसरे स्थान पटकाविले. तर सगायभारतीने ७३ गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला.


भारताने या स्पर्धेमध्ये ५ सुवर्ण पदके, ५ रौप्य पदके व २ कांस्य पदकांची कमाई केली. यजमान कोरिया व्यतिरिक भारत, श्रीलंका, अमेरिका, मालदीवज, कतार, जपान, पाकिस्तान, पोलंड, झेक रिपब्लिक, फ्रांस, जर्मनी, स्वीत्सेर्लंड, इटली, मलेशिया, सर्बिया, यु. के. अशा एकंदर १७ देशांनी या विश्व् कप स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदविला होता.

Web Title: World Cup carrom: Prashant More and Apurva win the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.