कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पदक जिंकायचेय... - जिम्नॅस्ट राकेश पात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:57 PM2018-03-21T23:57:28+5:302018-03-21T23:57:28+5:30

स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आणि आर्थिक सुबत्तेसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या जिम्नॅस्टिक प्रकारात पदक जिंकण्याची इच्छा राकेश पात्रा याने व्यक्त केली.

 Win a medal to prove his worth ... - Gymnast Rakesh Patra | कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पदक जिंकायचेय... - जिम्नॅस्ट राकेश पात्रा

कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पदक जिंकायचेय... - जिम्नॅस्ट राकेश पात्रा

googlenewsNext

कोलकाता : स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आणि आर्थिक सुबत्तेसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या जिम्नॅस्टिक प्रकारात पदक जिंकण्याची इच्छा राकेश पात्रा याने व्यक्त केली.
भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) तसेच भारतीय जिम्नॅस्टिक महासंघादरम्यान सुरू असलेल्या तणावपूर्ण संबंधांमुळे गोल्ड कोस्ट राष्टÑकुलसाठी २६ वर्षांचा कलात्मक जिम्नॅस्ट राकेशला आधी भारतीय संघातून वगळण्यात आले होते. त्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेताच न्यायालयाच्या आदेशामुळे राकेशला संघात स्थान मिळाले.
ओडिशाचा रहिवासी असलेला विश्वचषकाचा फायनलिस्ट पात्रा याचा आतापर्यंतचा खेळातील प्रवास फारच अडथळ्याचा राहिला. तो पाच वर्षांचा असताना घर आगीत खाक झाले. प्राथमिक शाळेचे शिक्षक असलेल्या त्याच्या वडिलांनी मुलाच्या सरावात मात्र कुठलाही खंड पडू दिला नाही.
भारतीय नौदलाचा कर्मचारी असलेला पात्रा म्हणाला, ‘वडिलांना ४०० रुपये वेतन मिळायचे. त्यातील अर्धा खर्च माझ्यावर व्हायचा. मी वडिलांना उपाशीपोटी झोपताना पाहिले आहे. ते दु:ख आठवले की मन भरून येते. माझे काका आणि कोच यांनी वडिलांना जिम्नॅस्टिकमध्ये माझे भविष्य असल्याची जाणीव करून दिली होती. त्यांनी माझी प्रत्येक गरज पूर्ण केली.’
पात्रा २०१० च्या राष्टÑकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघात होता. तो पाचवेळा विश्व स्पर्धेत सहभागी झाला, पण पदकाची झोळी अद्यापही रिकामीच आहे. यावर तो म्हणतो, ‘पदकापासून वंचित राहिल्याचा खेद आहे; पण पुढील दोन वर्षांत नवी उभारी घेईन, याबद्दल आशावादी आहे. विश्वचषकात पात्रा हा चीन आणि जपानच्या खेळाडूंपाठोपाठ चौथ्या स्थानावर राहिला होता. गोल्ड कोस्टमध्ये हे
दोन्ही देश सहभागी होत नसल्याने पात्राच्या पदकाची आशा वाढली आहे.
‘स्पर्धेच्या दिवशी चांगली कामगिरी झाली तरच पदक मिळेल, याची मला जाणीव आहे. पुढील २० दिवस आणखी कठोर सराव करीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करेन. इंग्लंड आणि कॅनडाच्या खेळाडूंंकडून मिळणारे आव्हान मोडून काढावे लागेल,’ असे गेल्या वर्षभरापासून घरापासून दूर असलेल्या पात्राने सांगितले. (वृत्तसंस्था)

‘सराव आणि तयारीत व्यत्यय येऊ नये यासाठी वर्षभरापासून घरी गेलो नाही. आई-वडिलांनादेखील भेटलो नाही. माझ्या वडिलांकडे सायकल आहे. त्याऐवजी मी त्यांना स्कूटर देऊ इच्छित होतो. पण वडिलांनी ती नाकारली. पदक जिंकूनच घरी ये, असा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या कठोर तपस्येला फळ यावे,असे मनोमन वाटते.’
- राकेश पात्रा, जिम्नॅस्ट

Web Title:  Win a medal to prove his worth ... - Gymnast Rakesh Patra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा