नामदेव कुंभार/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - जगाच्या क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धेत गणना होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला आयपीएलनंतर सुरुवात होणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार 25 एप्रिलपर्यंत संभाव्य संघाची घोषणा करायची आहे. काल द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांनी आपल्या संभाव्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडमध्ये 1 जून ते 18 जून 2017 दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी 8 संघ निश्चित झाले आहेत. एकूण 15 सामने होणार आहेत. त्यासाठी 2 गट पाडण्यात आले असून, प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरी गाठतील. अंतिम सामना 18 जून रोजी ओव्हेल मैदानात होईल. ऑस्ट्रेलिया, यजमान इंग्लंड, बांगलादेश, आणि न्यूझीलंड यांचा अ गटात समावेश आहे. तर ब गटामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि द. आफ्रिका संघाचा समावेश आहे. स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात एक जून रोजी ओव्हल येथे होणार आहे.


धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. सध्याची कामगिरी पाहता 2017च्या स्पर्धेच्या विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे क्रिकेट रसिक पाहत आहेत. सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 28 मे रोजी भारताचा पहिला सामना न्यूझीलंड बरोबर आहे तर दुसरा सामना 30 मे रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे. आयसीसीच्या नियमाप्रमाणे 25 एप्रिलपर्यंत भारताला आपल्या संभाव्य संघाची यादी पाठवायची आहे. कोणत्याही क्षणी बीसीसीय भारतीय संघाची घोषणा करु शकते. आर. आश्विन आणि के. एल राहूल दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडले आहेत. तर जाडेजा, विराट, रोहित आणि धवनने दुखापतीतून सावरुन आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली आहे.

चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारतीय संघ कसा असेल यावर एक नजर टाकूयात.
गेल्या काही दिवसातील राहूलची फलंदाजीवर नजर टाकल्यास सलामीसाठी त्याची निवड जवळपास नक्की आहे. कर्णधार विराट कोहलीने अपयशी असतानाही राहूलला संधी दिली होती. त्या संधीचे त्याने सोनं करत खोऱ्याने धावा ओढल्या होत्याय राहूलची आक्रमक फंलदाजी हा त्याचा प्लस पाँईट ठरू शकतो.. दुखापतीतून सावरलेल्या रोहित शर्माचा दुसरा सलामीवीर म्हणून निवड होऊ शकते. रोहित शर्मा दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर होता. पण आयपीएलमध्ये खराब सुरुवातीनंतर तो पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे. तसेच गेल्या चॅम्पियन ट्रॉफीचा अनुभव त्याच्याकडे आहेच. रोहित शर्माला चांगली सुरुवात मिळाल्यास समोर कोणताही गोलंदाज आल्यास त्याच्याविरोधात मोठे फटके मारु शकतो. गेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या धवनला यावेळी संधी मिळेल का याबाबत सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. शिखर धवनला 16 खेळाडूंमध्ये संधी मिळाली तरी 11 मध्ये स्थान मिळवणं अवघड ठरणार आहे. याला कारणीभूत आहे त्याचा गमावलेला फॉर्म. कर्णधारने डाव्या आणि उजव्या हाताचे फंलदाज सलामीला लावायचे ठरवल्यास शिखऱ धवनची निवड होऊ शकते. उपकर्णधार अजिंक्य रहाणेची निवड होण फिक्स आहे. पण त्याला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवायचे हा संघ व्यवस्थापक आणि कर्णधाराला पडलेला प्रश्न असू शकतो. रहाणे सलामीला तसेच चार आणि पाच क्रमांकावर फलंदाजी करु शकतो. तिसऱ्या क्रमांकावर फंलदाजी करण्यासाठी कर्णधार विराट कोहली सक्षम आहे.


चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचा विचार केल्यास येथे अधिक दावेदार ठरु शकतात. चौथ्या क्रमांकावर युवराज सिंग प्रमुख दावेदार आहे. त्याशिवाय मनिष पांडे, युवा नितिश राणा आणि अजिंक्य रहाणे आपली दावेदारी ठोकू शकतात. पाचव्या स्थानावर एम. एस. धोनी फलंदाजीसाठी येऊ शकतो. सहाव्य क्रमांकाचा विचार केल्यास केदार जाधव, रिषभ पंत, सुरेश रैना, कृणाल पांड्या आणि संजू सॅमसन यांचा विचार केला जाऊ शकतो. सातव्या स्थानावर अष्टपैलू हार्दिक पांड्याची निवड निश्चित आहे.
गोलंदाजीचा विचार केल्यास दुखापतीतून सावरलेल्या मोहमद्द शमीची निवड होऊ शकते. बॉर्डर-गावसकर मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उमेश यादव, भुवनेश्वर कुमारची संघातील निवड निश्चित आहे. भारताचा डेथ ओव्हरमधील स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराहयाची निवडही फिक्स आहे. तसेच भारताचे फरकी अस्त्र जाडेजा-अश्विन जोडीची निवड होणार यात कोणतेही दुमत नाही. जाडेजा-अश्विन जोडीच्या मदतीला यजुवेंद्र चहलची निवड होऊ शकते. यजुवेंद्र चहलाला अक्षर पटेलचा सामना करावा लागेल. अश्विन-जाडेजामुळे भारतीय संघाची फलंदाजी अधिक खोलवर जाते. इंग्लडमधील उसळ्या घेणाऱ्या खेळपट्टीवर भारत चार वेगवान गोलंदाजासह मैदानात उतरु शकतो. यामध्ये मोहमद्द शमी, बुमराह, उमेश यादव आणि हार्दिक पांड्याचा समावेश असू शकतो. भुवनेश्वर कुमारला बेंचवर बसावे लागू शकते.

चॅम्पियन ट्रॉफीसाठी असा असेल भारतीय संघ?
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल राहुल, युवराज सिंग, एम.एस. धोनी, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहमद्द शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन, मनिष पांड्या आणि यजुवेंद्र चहल

भारत-पाक सामन्याचे आकर्षण -
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटचा थरार पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. हे दोन्ही संघ एकाच गटात असून त्यांच्यात 4 जून रोजी एजबॅस्टन येथे सामना होणार आहे. दोन्ही देशातील क्रिकेट मालिका बंद असल्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धामध्येच हे दोन संघ आमनेसामने येतात.

तर चॅम्पियन्स ट्रॉफीतून भारत घेऊ शकतो माघार -

आयसीसी बीसीसीआयला देण्यात येणारा महसुलातील हिस्सा कमी करण्याच्या तयारीत आहे. यामुळे बीसीसीआय नाराज असल्याची चर्चा आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन देशांना आयसीसीकडून महसुलातील सर्वाधिक हिस्सा मिळतो. तसंच या तिन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाला कोणताही निर्णय घेताना महत्त्व दिलं जातं. आयसीसीनं जर या निर्णयात बदल केला तर या तिन्ही बोर्डांचे पंख कापले जाणार आहेत. यामुळे बीसीसीआयनं आक्रमक भूमिका घेतली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक
1 जून - इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (ओव्हल)
2 जून - न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन)
3 जून - श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल)
4 जून - भारत विरुद्ध पाकिस्तान (एजबॅस्टन)
5 जून - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (ओव्हल)
6 जून - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (कार्डीफ)
7 जून - पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (एजबॅस्टन)
8 जून - भारत विरुद्ध श्रीलंका (ओव्हल)
9 जून - न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (कार्डीफ)
10 जून - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (एजबॅस्टन)
11 जून - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (ओव्हल)
12 जून - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (कार्डीफ)
14 जून - सेमीफायनल १ (कार्डीफ)
16 जून - सेमीफायनल २ (एजबॅस्टन)
18 जून - फायनल मॅच (ओव्हल)