ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून प्रयत्न केलेत, मेहनत घेतलीत तर ती गोष्ट मिळवण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. मुंबई इंडियन्स संघात स्टार खेळाडूंच्या प्रकाशझोतात हरवलेला एक खेळाडू सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. जिद्दीच्या जोरावर या खेळाडूने संघात स्थान मिळवलं आहे. पण त्याचा हा प्रवास तितका सोपा नव्हता. एकेकाळी वेटर म्हणून काम करणा-या कुलवंत खेजरोलिया याने जिद्द आणि टॅलेंटच्या जोरावर भरारी घेतली आणि थेट मुंबई इंडियन्स संघात स्थान मिळवलं. त्याची ही यशोगाथा इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. 
 
कुलवंतने एक वर्षापुर्वीच ख-या अर्थाने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. पण त्याआधी गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून तो काम करत होता. कुलवंतमध्ये टॅलेंट आहे आणि त्याला वाव मिळाला पाहिजे या हेतूनं त्याच्या मित्राने त्याला दिल्लीला नेलं. विरोध होईल या भीतीने कुलवंतने आपण क्रिकेटसाठी दिल्लीला जात आहोत याची कल्पनाही कुटुंबाला दिली नाही. मित्राचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यासाठी अहमदाबादला आपण जात आहोत अशी खोटी माहिती त्याने घरी सांगितली. 
 
दिल्लीत आल्यानंतर कुलवंतने एल बी शास्त्री क्लबमध्ये प्रवेश घेतला. या क्लबने गौतम गंभीर, नितीश राणा आणि उन्मुक्त चंदसारखे खेळाडू दिले आहेत. एल बी शास्त्री क्लबमध्ये जाणं हा कुलवंतने घेतलेला अगदी योग्य निर्णय ठरला. कारण येथे त्याची भेट कोच आणि मेंटर संजय भारद्वाज यांच्याशी झाली, आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. साधे बूट घ्यायला पैसे नसणा-या कुलवंतसाठी संजय भारद्वाज यांनी इतर खेळाडूंसोबत हॉस्टेलमध्ये जागा मिळवून दिली. सोबतच त्याला गोलंदाजीचे धडे दिले. 
 
25 वर्षीय कुलवंतमधील टॅलेंट लक्षात घेत मुंबई इंडियन्सने 10 लाखात त्याला खरेदी केलं. 2017 विजय हजारे ट्रॉफीत खेळत कुलवंतने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण या आयपीएल सत्रात त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी दिलेला लढा आणि जिद्द नक्कीच कौतुकास्पद आहे. आतापर्यंत मिळालेल्या संधीचं सोनं केलेला कुलवंत मैदानात उतरल्यावरही त्याच जिद्दीने लढेल यात शंका असण्याचं कारण नाही.