विश्वनाथन आनंदने जिंकली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 05:51 PM2017-12-29T17:51:23+5:302017-12-29T17:54:03+5:30

रियाधमध्ये सुरु असलेली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली.

Viswanathan Anand won the World Rapid Chess Championship! | विश्वनाथन आनंदने जिंकली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा!

विश्वनाथन आनंदने जिंकली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा!

googlenewsNext

केदार लेले, लंडन

रियाधमध्ये सुरु असलेली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली.

आनंदची विजयी वाटचाल !
पंधरा फेऱ्या असणाऱ्या वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत सहा विजय, नऊ बरोबरी अशा उत्कृष्ट कामगिरीमुळे साडेदहा गुणांसह विश्वनाथन आनंद याने अग्र स्थानी झेप घेतली. पण सुरुवाती पासून आघाडीवर असणाऱ्या रशियाच्या व्लादिमिर फेडोसिव आणि नेपोम्नियाची यांनी आनंद ला गाठलेच! उत्तम टायब्रेक असल्यामुळे आनंद आणि फेडोसिव यांच्यात टायब्रेकर खेळवण्यात आला.

आनंदने टायब्रेकर वर फेडोसिवला हरवले! 
तब्बल पंधरा फेऱ्या संपल्यानंतर विश्वनाथन आनंदला विजेतेपद मिळविण्यासाठी टायब्रेकर प्रकारात व्लादिमिर फेडोसिव वर विजय मिळवणे आवश्यक होता. आनंद जिंकतो का फेडोसिव ही एकच उत्सुकता सर्व बुद्धिबळप्रेमींना होती! आनंदने पहिला डाव जिंकत व्लादिमिर फेडोसिव वर एक गुणाने आघाडी घेतली.  आपले आव्हान टिकवण्यासाठी फेडोसिवला दुसरा  डाव जिंकणे अनिवार्य होते. पण आनंदने दुसरा डाव जिंकला आणि फेडोसिवचा टायब्रेकर मध्ये २-० असा पराभव करत वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ जगज्जेतेपदास गवसणी घातली.

आक्रमक आनंद! 
बुद्धिबळ जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने पहिल्याच डावात अकोबियन याला काळ्या मोहऱ्यांनिशी पराभूत केले! दुसऱ्या डावात पीटर लेको विरुद्ध बालीदानांची शृंखला रचली आणि मोठ्या दिमाखात दुसरा डाव सुद्धा जिंकला! चौथ्या डावात डेमचेंको विरुद्ध आपल्या वजिराचा बळी देत आनंदने त्याच्यावर मात केली!
सातव्या डावात ल्युक मॅकशेन विरुद्ध काळ्या मोहऱ्यांनी खेळताना आनंदने मात करण्याचा सापळा रचला! या सापळ्यात ल्युक मॅकशेन अडकला आणि या स्पर्धेत आनंदने दुसऱ्यांदा काळ्या मोहऱ्यांनी डाव जिंकला!

आनंदने केला मॅग्नस कार्लसनचा खेळ खल्लास
सुरुवातीच्या आठ फेऱ्यांमधील चार सामने आनंदनं जिंकले होते, तर चार बरोबरीत सोडवले होते. कार्लसनचं आक्रण तो कसं रोखणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती.

नवव्या फेरीत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसन विरुद्ध काळ्या मोहऱ्यांनी खेळताना आनंदने 
गुंतागुंतीची व्यूहरचना केली! सर्वशक्तिमान वजीर आणि पांढऱ्या घरातील तिरप्या चालीचा उंट या दोघांचा खुबीने वापर करत त्यानं कार्लनसची कोंडी केली! काळ्या मोहऱ्यांनी खेळताना ३४ चालींमध्ये कार्लसनवर आनंदने खळबळजनक विजय मिळवला!    

वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत चुरस!
जगज्जेत्या मॅग्नस कार्लसन विरुद्ध नववी फेरी जिंकल्या नंतर आनंदला नंतरच्या ४ फेऱ्यांमध्ये बरोबरीवर समाधान मानावे लागले! दहावी ते तेरावी या चार फेऱ्यांमध्ये मध्ये मुसंडी मारून कार्लसनने आनंदवर अर्ध्या गुणाची निसटती आघाडी मिळवली!  फेरीगणिक गुणतक्ता बदलत होता ज्यामुळे कार्लसन, आनंद, स्वीडलर, फेडोसिव, नेपोम्नियाची आणि वँग हावो यांच्यात चांगलीच चुरस दिसून येत होती! 

मौक्याच्या क्षणी आनंदने केला ग्रीश्चुकचा पराभव! 
आनंदच्या हातून वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद निसटतं की काय असं वाटतं असताना चौदाव्या फेरीत आनंदने ग्रीश्चुकचा पराभव केला!  पंधराव्या फेरीत आपला डाव बरोबरीत सोडवत आनंदने साडेदहा गुणांसह अग्र स्थानी झेप घेतली! वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा टायब्रेकर वर नेण्यासाठी कार्लसनला ग्रीश्चुक विरुद्ध किमान बरोबरेची आवश्यकता होती पण ग्रीश्चुक ने कार्लसनला पराभवाचा धक्का दिला आणि आनंदचा मार्ग मोकळा झाला!

टायगर जिंदा है!
लहानपणी 'लाइटनिंग किड' ह्या नावाने प्रसिद्ध असलेला आनंद बुद्धिबळाच्या नकाशावर झळकला आणि तेव्हां पासून 'द टायगर ऑफ मद्रास' ह्या नावाने ओळखला जाऊ लागला. 

विश्वनाथन आनंद साठी सन २०१७ काहीसं कठीण आणि निराशापूर्ण गेल होतं! लंडन चेस क्लासिक २०१७ मध्ये झालेली सुमार कामगिरी आणि तीन पराभवांमुळे आनंद ('द टायगर ऑफ मद्रास') चांगलाच डिवचला गेला होता! 

वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही... तो काही काळ थांबतो, वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो... घेऊन, तीच दहशत... अन तोच दरारा !!! 
(लंडन चेस क्लासिक २०१७ नंतर) ज्या लोकांनी आनंद संपला अशी वक्तव्यं केली होती, त्या सर्वांना आनंदने वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकून, ‘टायगर जिंदा है’ असा ईशाराच दिला आहे!
 

Web Title: Viswanathan Anand won the World Rapid Chess Championship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.