ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी भलेही आयपीएल सीझन जास्त चांगला गेलेला नाही. दुसरीकडे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत संघाचा नेतृत्व करण्याची जबाबदारी असो...मात्र यापैकी कशाचंच दडपण विराट कोहलीवर आलेलं दिसत नाही. कोहली पहिल्यासारखीच मजा मस्ती करताना दिसत आहे. नुकतंच विराट कोहलीने अत्यंत वेगाने कार चालवत ताण दूर करण्याचा प्रयत्न केला. 
 
चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड दौ-याला जाण्याआधी विराट कोहली बुद्ध इंटरनॅशनल सर्किटच्या रेसिंग ट्रॅकवर पोहोचला. खांद्याच्या दुखापतीतून सावरलेल्या विराट कोहलीने यावेळी ऑडी R8 स्पोर्ट्स कार चालवली. विराट कोहलीने 280 किमी/प्रतीतास स्पीडने कार पळवली. इतक्या वेगाना कार चालवूनदेखील विराट आपल्या कामगिरीवर समाधानी दिसत नव्हता. 
 
कोहलीने सांगितलं की याआधी त्याने 290 किमी/प्रतीतास स्पीडने कार चालवली आहे. मात्र यावेळी शेवटच्या टप्प्यात थोडी भीती वाटल्याने स्पीड कमी झाला. आपण एखाद्या प्रोफेशनल ड्रायव्हरप्रमाणे शेवट करु शकत नव्हतो असंही त्याने सांगितलं. मात्र यावेळी बोलताना क्रिकेटसंबंधी कोणत्याही प्रश्नावर उत्तर देण्यास त्याने नकार दिला.