आगामी निवडणूकांचा फटका ऑलिम्पिक तयारीला बसू शकतो, वीरधवल खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 05:32 PM2018-10-21T17:32:51+5:302018-10-21T17:33:41+5:30

जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत थोडक्यात पदकाने हुलकावणी दिल्यानंतर भारताचा सर्वात वेगवान जलतरणपटू आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी कसून तयारी करत आहे.

The upcoming election can hit the Olympic preparations,say Veerdhawal Khade | आगामी निवडणूकांचा फटका ऑलिम्पिक तयारीला बसू शकतो, वीरधवल खाडे

छोट्या जलतरणपटूंनी आपल्या प्रमाणपत्रांवर वीरधवलची स्वाक्षरी घेण्यासाठी त्याला गराडा घातला.

Next

- रोहित नाईक
मुंबई : जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत थोडक्यात पदकाने हुलकावणी दिल्यानंतर भारताचा सर्वात वेगवान जलतरणपटू आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी कसून तयारी करत आहे. मात्र, २०१९ साली होणाऱ्या लोकसभा - विधानसभा निवडणूकांमुळे ऑलिम्पिक तयारीसाठी अडचण येऊ शकते, असे मुंबई उपनगरमध्ये तहसिलदार कार्यालयात कार्यरत असलेल्या वीरधवलने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

चेंबूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेल्या वीरधवलने सांगितले की, ‘आगामी निवडणूकांमुळे २०१९ वर्ष माझ्यासाठी ऑलिम्पिक तयारीच्या दृष्टीने अवघड ठरु शकतं. निवडणूकीचे काम सर्वांनाच करावे लागते. यासाठी मी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करेन. यावर कशाप्रकारे तोडगा काढता येईल हे पाहावे लागेल. माझ्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याला निवडणूकीचे काम करता आले, तर खूप चांगले होईल. गेल्यावर्षी मी सकारात्मक कामगिरी केली आहे. पदक मिळवण्यात मला यश आले नसले, तरी भविष्यातील स्पर्धांमध्ये मी नक्कीच पदक मिळवू शकतो. सर्वांनी जर माझी बाजू समजून घेतली, तर नक्कीच याचा मला फायदा होईल.’ 

आशियाई स्पर्धेविषयी वीरधवलने म्हटले की, ‘मला निश्चितच पदकाची अपेक्षा होती. मी हीट्समध्ये नोंदवलेल्या कामगिरीला पदक मिळू शकत होते. पण अंतिम फेरीत तसे झाले नाही आणि हे माझ्यासाठी खूप धक्कादायक होते. मला कामगिरीत सातत्य आणावे लागेल. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून मी सरावाला सुरुवात केली. फक्त १० महिन्यांच्या सरावात कामगिरीत सातत्य येणे कठीण होते. बाकीचे खेळाडू रिओ ऑलिम्पिकपासून सातत्याने खेळत होते. त्यामुळे त्यांच्याशी स्पर्धा करुन त्यांच्या बरोबरीला पोहचणे हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. यामुळे आगामी स्पर्धांमध्ये मी त्यांना नक्किच नमवू शकतो असा आत्मविश्वास आहे. जर मी खेळापासून दूर गेलो नसतो तर नक्कीच या वेळी आशियाई स्पर्धेत मी स्वत: दोन पदक आणले असते.’

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या ‘टार्गेट ऑन पोडियम स्कीम’मध्ये (टॉप्स) समावेश करुन घेण्याबाबत स्पीडो अ‍ॅथलिट वीरधवल म्हणाला की, ‘टॉप्स’साठी मी क्रीडा मंत्रालयाकडे शिफारस केली होती. सध्या जलतरणात सजन प्रकाश व श्रीहरी यांचा या योजनेत समावेश आहे. दोघेही चांगले खेळाडू आहेत यात वाद नाही आणि माझा त्यांना विरोधही नाही. पण यामध्ये माझाही समावेश करुन घ्यावा अशी माझी सरकार आणि संघटनेकडे विनंती होती. कारण, आशियाई स्पर्धेत पदकाच्या सर्वात जवळ मीच पोहचलो होतो. पण तरीही अजून माझा विचार झालेला नाही. जर यासाठी सरकारने माझा विचार केला, तर ऑलिम्पिक तयारी करणे माझ्यासाठी खूप सोपे होईल.’

ऑलिम्पिक पात्रतेसाठी २२.०१ सेकंद वेळ नोंदवण्याचे निकष आहे. मी आशियाई स्पर्धेत २२.४३ सेकंदाची वैयक्तिक वेळ नोंदवली मी ऑलिम्पिक पात्रतेच्या जवळपास आहे. गेल्यावर्षी झालेल्या गुडघ्याच्या शस्त्रक्रीयेनंतर थोड्या अडचणी येत आहेत. यासाठी अजून ५-६ महिने जातील. यातून पूर्ण सावरलो तर नक्कीच येत्या काही स्पर्धांतून मी सहजपणे ऑलिम्पिक पात्रता मिळवेल. यासाठी पुढील महिने परदेशात सराव करण्याची इच्छा आहे. अमेरिकन व यूरोपियन खेळाडू वेगवान सुरुवात करण्यात तरबेज असून मला त्यांची पद्धत जवळून पाहायची आहे, असे वीरधवल म्हणाला. 

Web Title: The upcoming election can hit the Olympic preparations,say Veerdhawal Khade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई